टिळकांचा राजीनामा : भ्रम आणि वास्तव (भाग-१)

    दिनांक  14-Sep-2019 20:19:16
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’मधील भांडणे किरकोळ नव्हती. या वादाच्या मुळाशी अनेक कारणे होती. टिळक, आगरकर, गोखले यापैकी प्रत्येकाच्या मताला एक वेगळे अस्तित्व होते. महाराष्ट्रातल्या मात्तब्बर विद्वानांमधील हा वाद होता. ही मोठ्या माणसांची भांडणे होती. म्हणूनच महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली. या वादाचे परिणाम महाराष्ट्रमानसावर झाल्याखेरीज राहिले नाहीत. त्यामुळे या वादाची चर्चा करताना सावधगिरी बाळगून सखोल अभ्यास करावा लागतो. तशी तयारी ठेवूनच या वादाची तर्कशुद्ध मांडणी करण्याचे योजिले आहे.२६ ऑक्टोबर, १८८२ रोजी डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये म्हणजेच २८ ऑक्टोबर, १८८२ पासून टिळक-आगरकर पुन्हा शाळेत रुजू झाले. त्यांना १०१ दिवसांची शिक्षा झाली खरी, पण या शिक्षेचे अनुकूल परिणाम लवकरच दिसू लागले. महाराष्ट्रात टिळक-आगरकरांची संस्था म्हणून ‘न्यू इंग्लिश’ शाळेचे नाव गाजत होते. शाळेला देणग्या मिळू लागल्या. शाळेकडे उत्तम ग्रंथसंग्रह नाही म्हणून २२ डिसेंबर, १८८२ रोजी चार वकिलांनी (पांडुरंग वकील, रघुनाथ मुधोळकर, देवराव दिगंबर, दत्तात्रय बापट) यांनी प्रत्येकी ३०० म्हणजेच एकूण १२०० रुपये देणगी ग्रंथखरेदीसाठी पाठवली. या प्रकरणात सरकार विरुद्ध संस्थानिकांची बाजू मांडल्यामुळे शाळेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. कागल संस्थानचे आबासाहेब घाडगे ज्यांचे पुत्र ‘यशवंतराव’ यांना पुढे कोल्हापूरच्या गादीसाठी दत्तक घेण्यात आले. त्यामुळे घाडगे यांनी नंतरच्या काळात टिळक-आगरकरांच्या संस्थेला भरघोस मदत केली. दरम्यानच्या काळात सयाजीराव गायकवाड यांनी शाळेला भेट दिली, सोबत देणगीसुद्धा दिली. टिळक-आगरकरांच्या डोंगरी वास्तव्याच्या अनुकूल परिणामांची यादी देताना न. चि. केळकर म्हणतात, “कोल्हापूर प्रकरणामुळे टिळक-आगरकरांना प्रसिद्धी लाभली. सामान्य लोकांची सहानुभूती मिळाली. थोरामोठ्यांच्या ओळखी झाल्या. मॅट्रिक्युलेशन परीक्षेत पास होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण इतर हायस्कूलच्या मानाने विशेष पडू लागले. ‘जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप’ मिळणे हा ‘न्यू इंग्लिश स्कूल’चा मक्ता होऊन बसला.” टिळक-आगरकर हे लोकांचे हक्काचे नेते झाले. या अनुकूलतेच्या जोरावर लवकरच ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना करण्यात आली.१८८४च्या शाळेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रांताचे राज्यपाल महामहीम जेम्स फर्ग्युसन उपस्थित होते
. एखाद्या खासगी शाळेच्या कार्यक्रमाला गव्हर्नर उपस्थित राहावे, असे होण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यांनी रुपये १,२५० इतकी देणगी शाळेला दिली आणि ते या संस्थेचे पहिले आश्रयदाते झाले. जेम्स फर्ग्युसन आपल्या भाषणात म्हणाले, “जास्त मोठे पाठबळ मिळणार्‍या संस्थांच्या मानाने या शाळेने थोड्या वर्षातच उत्कृष्टतेचा दर्जा मिळवला आहे आणि सरकारी मदतीचा अधिकार प्रस्थापित केला आहे.आता आम्ही मदतीचा हात पुढे केला नाही आणि या शाळेच्या प्रवर्तकांनी मिळवलेल्या यशाला हातभार लावला नाही तर ते केवळ अन्यायकारकच नव्हे, तर आम्हाला कमीपणा आणणारे ठरेल.” या मदतीच्या आणि सहानुभूतीच्या बळावर डेक्कन सोसायटीच्या महाविद्यालयाचे नाव ‘फर्ग्युसन कॉलेज’ असे ठरले त्यावर वादही झाले, त्याची कारणमीमांसा याआधीच्या काही प्रकरणात केली आहेच.महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी भिंतीवर संस्थेचे ब्रीदवाक्य अभिमानाने झळकत होते ते म्हणजे ‘
UNION IS STRENGTH’ हे ब्रीदवाक्य वरवर आकर्षक वाटत असले तरी इथून पुढे एका नव्या वादाचा आरंभ होणार होता. गेली पाच-सहा वर्षं टिळक-आगरकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एक शाळा आणि दोन वृत्तपत्रे यशस्वीपणे चालवून दाखवली होती. पण, आता त्यात महाविद्यालयाची भर पडल्यानंतर नवी माणसे त्यांना येऊन मिळाली आणि नवे बेबनाव सुरू असे अनेकांचे मत आहे. न. र. फाटक यांनी त्यांच्या टिळकचरित्रात उल्लेख केला आहे, “त्या वर्षीच या संघटनेच्या चालकांच्या अंतरंगात दबा धरून असलेल्या मतभेदाच्या कलीने डोके वर काढून पुढील फाटाफुटीचा पाया घातला.” डोंगरीच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभापर्यंतचा काळ म्हणजेच १८८३, १८८४ आणि १८८५ ही तीन वर्ष हा ‘संघटना काळ’ आहे, असे खुद्द टिळकांनी त्यांच्या राजीनाम्यात नमूद केले आहे. या काळात मतभेद नव्हते, असे नाही. पण, त्याचे स्वरूप अगदीच किरकोळ असावे. १८८५ नंतर मात्र या मतभेदांनी उग्र स्वरूप धरण केले. याचमुळे आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून एकमेकांचे सख्खे मित्र, सख्खे शेजारी असलेले टिळक-आगरकर एकमेकांचे पक्के वैरी झाले आणि टिळकांनी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चा राजीनामा दिला.टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा का दिला?’ याबद्दल टिळक आणि आगरकर यांच्या चरित्रकारांनी बरीच मांडणी केली आहे. परंतु, हे लेखन अनेकदा दिशाभूल करणारे, पुराव्यांची आणि ऐतिहासिक दस्तावेजांची छाननी न करत केलेले आहे, याची जाणीवसुद्धा सामान्य वाचकांना नसते. या संपूर्ण प्रकरणावर आजवर तपशीलवार खुलासे करण्याचा प्रयत्न फार थोड्या इतिहासकारांनी केलेला आहे. तात्यासाहेब केळकरांनी त्यांच्या टिळकचरित्रात तर कबुलीच दिलेली आहे. ते म्हणतात, “टिळकांच्या राजीनाम्यातील मुख्य मुद्द्यासंबंधाने साधकबाधक अशी चर्चा कोठे झालेली आढळत नाही. टिळकांच्या पक्षपाती लोकांनी त्यांना चांगले म्हणावे व आगरकरांच्या पक्षपाती लोकांनी आगरकरांना चांगले म्हणावे!” (लो. टिळक यांचे चरित्र, खंड पहिला, १९२३ पृष्ठ- २१३)टिळक
, आगरकर, गोखले यांच्या चरित्रकारांनी प्रस्तुत वादाची उपलब्ध ऐतिहासिक साधनांच्या आधारे योग्य मांडणी केली नाही, असे दिसते. य. दि. फडके यांनी त्यांच्या ‘शोध बाळ-गोपाळांचा’ या पुस्तकात अशा त्रोटक माहितीच्या आधारे केलेल्या मांडणीचा चांगलाच समाचार घेतलेला दिसतो. फडके म्हणतात, “१८८१ ते १८९५ या कालखंडातील ‘केसरी’, ‘मराठा’ व ‘सुधारक’ याबरोबर अन्य वृत्तपत्रांचे उपलब्ध अंक कालक्रमानुसार समग्र वाचल्याखेरीज टिळक-आगरकरांच्या बेबनावाची समग्र चिकित्सा करता येत नाही. अर्थात, ही सर्व उपलब्ध अस्सल साधने कसोशीने तपासून पाहण्याचे प्राथमिक काम नेहमीच वेळ खाणारे व जिकिरीचे असते. त्यापेक्षा पुस्तकरूपाने हाती लागणार्‍या टिळक-आगरकरांच्या निवडक लेखांच्या आधारे, संदर्भ लक्षात न घेता शेरेबाजी करणे हे कमी कष्टाचे व कमी वेळात करण्यासारखे काम असते. साहजिकच टिळक, आगरकर, रानडे, गोखले वगैरेबद्दल व्याख्याने झोडणारे व लेख खरडणारे महाराष्ट्रातील बहुतेक विद्वान व विचारवंत ‘केसरी,’ ‘मराठा’ व ‘सुधारक’ वगैरे मूळ पत्रांचे मूळ अंक वाचण्याची तसदी घेत नाहीत.तपशिलाच्या जंजाळात न शिरता तत्त्वाबाबत किंवा फक्त संकल्पनाबाबत आपल्याला रस आहे, असा सोयीस्कर पवित्रा घेऊन आजवर अनेकांनी आगरकर- टिळकांबाबत लंबीचौडी मते बेलाशक ठोकून दिली आहेत.” य. दि. फडके यांनी ऐतिहासिक साधनांच्या आधाराने टिळक-आगरकर वादाची मीमांसा केली आहे. त्यामुळे फडक्यांचे हे मत परखड वाटत असले तरी या मतामध्ये तथ्य मात्र आहे.टिळकांनी डेक्कन सोसायटीचा राजीनामा देण्यापूर्वीची त्यांची ११ वर्षे
(१८८० ते १९९०) ही मुख्यत्वे न्यू इंग्लिश स्कूल, ‘केसरी,’ ‘मराठा’ वृत्तपत्रे आणि डेक्कन सोसायटी यांच्या स्थापनेत व त्यांची योग्य घडी बसवण्यात गेली असेच म्हणावे लागेल. सुरुवातीच्या काळातील टिळक-आगरकरांची पक्की मैत्री आणि नंतरचे मतभेद यामुळे टिळक-आगरकरांमध्ये असलेल्या निकटच्या मैत्रीचे रुपांतर एकमेकांचे अव्वल प्रतिस्पर्धी असे झाले. त्यामुळे एकीकडे आगरकरांना ‘केसरी’ सोडवा लागला आणि गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सहकार्‍याने ‘सुधारक’ वृत्तपत्र सुरू करावे लागले, तर दुसरीकडे टिळकांना सोसायटीचा राजीनामा देऊन शिक्षण संस्थेशी असलेले आपले सर्व संबंध तोडावे लागले. टिळक-आगरकरांच्या चरित्रकारांनी या सगळ्या घटनांची दखल घेतली आहे. मात्र, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या वादाची मीमांसा मात्र केलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर टिळक-आगरकर यांच्यातील वाद हा आधी सामाजिक सुधारणेकडे लक्ष द्यावे की राजकीय स्वातंत्र्याकडे लक्ष द्यावे यावर बेतलेला होता, असे सांगितले जाते. पण, या वितुष्टाचा सखोल अभ्यास केला तर केवळ आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य हे एकच कारण या वादामागे नसून याहूनही अनेक कारणे टिळक-आगरकरांच्या मैत्रीमध्ये बेबनाव निर्माण होण्यास कारणीभूत झाली होती हे लक्षात येते. पण, दुर्दैवाने त्याची मांडणी केली जात नाही. टिळकांचे चरित्रकार या प्रकरणात आगरकरांना दोष देतात, तर आगरकरांचे चरित्रकार टिळकांना खलपुरुष ठरवतात. टिळक-आगरकरांबद्दलचा अपार भक्तीभाव किंवा टोकाचा द्वेष या सगळ्या भावनांच्या गदारोळात नेमका सत्याचा अपलाप होण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे टिळक-आगरकर यांच्यात नेमके कशामुळे मतभेद झाले? या वादाची नेमकी कारणे कोणती? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वादाचा नव्याने परामर्श घेणे गरजेचे झाले आहे.

(क्रमशः)

- पार्थ बावस्कर