कच्च्या तेलाच्या किमती २० डॉलर्सने गडगडणार

13 Sep 2019 18:42:52


 



नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ६० डॉलरवरून घसरु शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या मागणीतील घट लक्षात घेता या किंमती प्रतिबॅरल ४५ डॉलर इतक्या खाली उतरण्याची चिन्हे आहेत. ही स्थिती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली मानली जात आहे. रिअल व्हिजन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊल पाल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना हा अंदाज व्यक्त केला आहे. कच्च्या तेलाच्या बाजारातील मानक ब्रेंट क्रुडनुसार प्रतिबॅरल ६० डॉलर इतका दर सुरू आहे तर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटनुसार, हा दर प्रतिबॅरल ५५ डॉलर इतका आहे.

 

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट

राऊल पेन म्हणाले, "जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. येणारा काळ हा आव्हानात्मक असेल. आर्थिक महासत्ता असलेले देशही मंदीच्या तणावाखाली आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्थाही मंदीच्या दिशेने झुकत आहे. व्यापारयुद्धामुळे चीनची अर्थव्यवस्थाही सुस्त झाली आहे. जगभरात मंदीचे सावट जाणवत आहे."

 

कच्च्या तेलातील घसरण भारताला फायदेशीर

कच्च्या तेलातील दरांची घसरण भारताच्या पथ्यावर पडणार असल्याचे मानले जात आहे. भारत आजही ८० टक्के कच्चे तेल आयात करतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो. कच्च्या तेलाच्या दरांची घसरण भारताला काहीशी फायदेशीर ठरेल, असे मत राऊल पाल यांनी व्यक्त केले आहे.

 
Powered By Sangraha 9.0