कोल्हापूर ते इटलीपर्यंतचा 'आतिशी' प्रवास

    दिनांक  13-Sep-2019 19:23:11   मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या डॉ. अतीश दाभोलकर यांची नुकतीच इटलीस्थित
'आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्रा'च्या संचालकपदी निवड झाली. त्यांच्या या प्रवासाविषयी थोडक्यात...


'
भारतीय अवकाश संशोधन संस्थे'ने (इस्रो) 'चांद्रयान २' मोहीम राबवत जागतिक अंतराळ क्षेत्रामध्ये भारतीयांची मान सर्वार्थाने उंचावली आहे. या मोहिमेमुळे सर्व जगाचे लक्ष आता भारताच्या अंतराळ आणि विज्ञान क्षेत्रातील कामगिरीकडे लागले आहे. सध्या जगभरात भारतीय तसेत भारतीय वंशांचे अनेक शास्त्रज्ञ-संशोधक हे विविध वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत आहेत. 'नासा'सारख्या जगातील महत्त्वाच्या अंतराळ संशोधन केंद्रामध्येदेखील भारतीय शास्त्रज्ञांच्या कामगिरीची विशेष दखल घेतली जाते. मूलभूत संशोधनाबरोबरच जगभरात वैज्ञानिक क्षमता विकसित करण्यात 'इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स' (आयसीटीपी) या संस्थेची मोठी भूमिका आहे.इटली सरकार
, आंतरराष्ट्रीय परमाणू ऊर्जा संस्था, संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार कार्यरत असणारी 'आयसीटीपी' ही 'युनेस्को'ची प्रथम श्रेणीची संस्था आहे. अनेक देशांतील वैज्ञानिक धोरण ठरवणे, तसेच त्यासंबंधी प्रशासकीय निर्णयांमध्ये 'आयसीटीपी' महत्त्वाची भूमिका बजावते. अशा संस्थेच्या संचालकपदी कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. अतीश दाभोलकर यांची निवड झाल्याने भारताचा झेंडा अटकेपार रोवला गेला आहे. अत्यंत ग्रामीण आणि तळागाळातून आलेल्या व्यक्तीला इतक्या मोठ्या संस्थेत अधिकारपदावर काम करण्याची संधी मिळणे ही बाब मराठी माणसासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची आहे. दाभोलकरांचा कोल्हापूर ते इटालीपर्यंतचा प्रवास हा तरुण वैज्ञानिकांना नक्कीच प्रोत्साहन देणारा आहे.डॉ. अतीश दाभोलकर यांचा जन्म १९६३ मध्ये कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे झाले. महाराष्ट्रातील सर्वार्थाने आधुनिक असलेल्या या कुटुंबातील कृषिशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोलकर यांचे ते पुत्र
, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे ते पुतणे. १९८५ मध्ये विज्ञानाची आणि मूलभूत संशोधनाची आवड असलेल्या अतीश यांनी कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) पदवी घेतली. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्रात 'डॉक्टरेट' पदवी मिळविली. परदेशातील रटगर्स विद्यापीठ, हॉवर्ड विद्यापीठ आणि कॅलटेक येथे संशोधनकार्य केल्यानंतर अतीश १९९६ मध्ये भारतात आले.२०१० पर्यंत त्यांनी मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर अतीश यांनी फ्रान्समधील
'सोरोबोन विद्यापीठ' आणि 'नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च'मध्ये २००७ पासून संशोधन संचालकपद सांभाळले. अतीश हे 'स्ट्रिंग सिद्धांत' आणि 'क्वांटम कृष्णविवरां'वरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. कृष्णविवरातून ऊर्जा सतत बाहेर टाकली जाते, असा सिद्धांत स्टीफन हॉकिंग यांनी मांडल्यानंतर कृष्णविवराच्या तापमानाबद्दल प्रश्न निर्माण झाला. त्यावर संशोधन करणार्यांमध्ये डॉ. अतीश दाभोलकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. कृष्णविवरांची पुंजकीय (क्वांटम) संरचना हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. 'स्ट्रिंग थिअरी'वरही त्यांनी संशोधन केले, ते 'मूलभूत' मानले जाते.जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. स्टीफन हॉकिंग हेदेखील डॉ. अतीश दाभोलकर यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. १९९५ साली डॉ. दाभोलकरांनी
'स्ट्रिंग थिअरी'वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी हॉकिंग यांनी कॅलिफोर्नियात चक्क 'व्हीलचेअर'वरून दाभोलकर यांच्या कार्यालयात येऊन त्यांची भेट घेतली होती. डॉ. दाभोलकर यांच्या प्रयत्नांतून डॉ. स्टीफन हॉकिंग २००१ साली मुंबईत झालेल्या 'स्ट्रिंग'ला उपस्थित झाले होते. यावेळी त्यांचे शीव येथील षण्मुखानंद सभागृहात व्याख्यानदेखील झाले होते. संशोधन संस्था हव्यातच, पण विज्ञान जनमानसात झिरपण्यासाठी विज्ञानाची संस्कृती रुजवावी लागते, असा त्यांचा विश्वास आहे.भारतीय विज्ञान अकादमीचे ते सदस्य आहेत. डॉ. अतीश दाभोलकरांना २००६ मध्ये
'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच २००७ मध्ये अतीश यांना 'आयआयएम नॅशनल लीडरशिप अवॉर्ड' देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. २००७ मध्येच त्यांना फ्रान्समधील 'नॅशनल रिसर्च एजन्सी' (एएनआर) कडून 'चेअर ऑफ एक्सलन्स अवॉर्ड' दिला गेला. ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांची 'आयसीटीपी'मध्ये संचालकपदी निवड करण्यात आली. २०१४ पासून ते 'आयसीटीपी'मध्ये कार्यरत होते. या संस्थेच्या लवकरच चार नव्या शाखा स्थापन होणार आहेत. दरवर्षी, जगभरातील सहा हजारांहून अधिक शास्त्रज्ञ 'आयसीटीपी'ला त्याच्या शैक्षणिक, प्रशिक्षण आणि सबबॅटिकल संधींसाठी भेट देतात. अशा जागतिक संस्थेच्या संचालकपदी नेमणूक होऊन डॉ. अतीश दाभोलकरांनी जगासमोर एक नवा आयाम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या भविष्यातील कामगिरीसाठी संपूर्ण भारतीयांकडून शुभेच्छा...!