'आप्पा आणि बाप्पा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

13 Sep 2019 12:12:03


 

महाराष्ट्रभर गणेशाच्या आगमनाचा जितका उत्साह असतो, तितकाच त्याला निरोप देताना भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि विश्वास झळकतो की, बाप्पा पुढच्या वर्षीदेखील अशा धुमधडाक्यात पुन्हा एकदा अवतरेल. याच पार्श्वभूमीवर 'सन ऑफ सरदार' आणि 'अतिथी तुम कब जाओगे' या चित्रपटाच्या दिग्दर्शक अश्विनी धीर पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. 'प्पा आणि बाप्पा' या त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. 

पोस्टरमधील दोन्ही चेहरे बघून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. प्रसिद्ध कलाकार सुबोध भावे आणि भारत जाधव या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत, तर त्यांच्याबरोबर या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे आदी कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

गरिमा धीर व जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्विनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचे आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्युसर अजितसिंग आहेत. पॅनोरमा स्टुडिओज् डिस्ट्रीब्यूशन एलएलपीतर्फे ११ ऑक्टोबर ला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0