‘बेस्ट’मध्ये कामगारांच्या संपाचे वादळ कायम

    दिनांक  11-Sep-2019 09:21:37
मुंबई
: कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरुवातीला धरणे, नंतर उपोषणाचा मार्ग अवलंबणारी ‘बेस्ट कृती समिती’ गणेशोत्सवानंतर मात्र संपाचे हत्यार उपसण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. कामगारांच्या संपाबाबत दि. ११ सप्टेंबर रोजी ‘बेस्ट’ प्रशासनाला नोटीस देण्यात येणार आहे, असे ‘बेस्ट कृती समिती’चे नेते शशांक राव यांनी सांगितले.


सोमवारी परळच्या शिरोडकर हॉल येथे
‘बेस्ट’ कामगारांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शशांक राव यांनी सांगितले. ‘बेस्ट’ उपक्रमाने अन्य कामगार संघटनांशी जो काही सामंजस्य करार केला आहे, तो कर्मचार्‍यांसाठी घातक आहे. कृती समितीशी संलग्न कोणतीही संघटना ‘बेस्ट’बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार नाही. त्यामुळे आम्ही ‘इंडस्ट्रियल अ‍ॅक्ट’अंतर्गत ‘बेस्ट’ प्रशासनाला संपाची नोटीस देणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले. जर संप झाला तर पुन्हा एकदा मुंबईकर वेठीस धरले जातील व त्यांचे हाल होतील, हे निश्चित. संप करण्याबाबत ‘बेस्ट कृती समिती’ने कामगारांची मते आजमावून घेतली. त्यावेळी ९८ टक्के कामगारांनी संप करण्याच्या बाजूने मतदान केले आहे. तरीही संपाचे हत्यार न उपसता सुरुवातीला धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर दिलेल्या मुदतीत करार करण्यात शिवसेनेला अपयश आले म्हणून लगेचच उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गणेशोत्सवासारख्या सणात प्रवाशांचे हाल नको म्हणून संपाचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आणि उपोषणही थांबविण्यात आले. आता गणेशोत्सवाचा समारोप होणार आहे. त्यामुळे कृती समितीने संप पुकारण्याची तयारी ठेवली आहे.


करार नव्हे
, सामंजस्य करार

पाच वर्षांचा करार करायचा आहे. त्यामुळे एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला वेगळा न्याय असे कसे होईल? काही कामगारांना २०१६ पासून वाढ, तर काही कामगारांना २०१९ पासून वेतनवाढ देण्यात येणार आहे, असा करार कोणताही कामगार मान्य करणार नाही. त्यात फरकापोटी मिळणार्‍या रकमेत काही कामगारांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. हे कृती समितीला मान्य नाही, त्यामुळे ते संपावर जाण्याबाबत ‘बेस्ट’ प्रशासनाला नोटीस देतील.

- शशांक राव, नेते, बेस्ट कामगार कृती समिती