आंध्रात राजकीय वादळ , चंद्राबाबू नायडू नजरकैदेत

11 Sep 2019 11:54:07




आंध्र प्रदेश
: सरकारविरोधी 'चलो आत्माकुरू' रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसमचे पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांना त्यांचा मुलगा लोकेश याच्यासह नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी नायडू यांच्या राहत्या घरीच त्यांना नजरकैदेत ठेवले आहे.


टीडीपीने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस. जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर राजकीय हिंसेचा आरोप केला आहे. त्याविरोधात चंद्राबाबू नायडूंनी
चालो आत्माकुररॅलीचे आवाहन केले होते. ही रॅली आज गुंटूरमधील पलनाडू येथे आयोजित केली होती. चंद्राबाबू नायडू हे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ही करणार होते. सकाळी ९ च्या सुमारास ते घराबाहेर पडणार होते परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर नायडू यांनी घरीच उपोषण सुरू केल्याचे जाहीर केले आणि कार्यकर्त्यांनाही उपोषण करण्यास सांगिलते. तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांबरोबरच वायएसआरपीसीच्या नेत्यांनाही पोलिसांनी नजरकैदेत टाकले आहे. तेलुगू देसम पक्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनीही हालचाली करू नयेत, यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून आणि कोणतेही वादंग निर्माण होऊ नये याकरिता अनेक नेते व आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारत नरसरावपेटा, सत्तेनापल्ले, पलनाडू आणि गुराजलामध्ये कलम १४४ लागू करत जमावबंदी लागू केली.

Powered By Sangraha 9.0