उद्धव ठाकरेंच्या हस्ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण

    दिनांक  11-Sep-2019 19:25:41


 


ठाणे : "नव्या स्वरूपातील जिल्हा रुग्णालय हे गोरगरीबांचा अधिक सक्षम आधार बनेल," असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केला. जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. ५७४ खाटांच्या या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी राज्य सरकारने ३१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याप्रसंगी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, संजय केळकर, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्हा रुग्णालयाची जागा अपुरी पडत असून अनेक अद्ययावत वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांची परवड होत आहे. त्यामुळे रुग्णालय व परिसराचा पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्णय व्हावा, म्हणून गेली पाच वर्षे सातत्याने प्रयत्न केले होते. चालू वर्षीच्या सुरुवातीला आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या रुग्णालयासाठी ३१४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा रुग्णालयासाठी आठ दशकांपूर्वी आपली जमीन देणारे विठ्ठल सायन्ना यांचाही उद्धव ठाकरे यांनी भाषणात गौरव केला. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी आता ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होत असून त्यापैकी १४० खाटा या हृदयरोग, मेंदूविकार, कर्करोग, मूत्ररोग आदी विकारांच्या संदर्भ सेवांसाठी असणार आहेत.

 

पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयाच्या दोन सात मजली इमारती बांधल्या जाणार आहेत. एका इमारतीत अद्ययावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज जिल्हा रुग्णालय, तर दुसऱ्या इमारतीत संदर्भ सेवा रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील विविध तपासणी विभाग कार्यरत असतील. तिसऱ्या इमारतीत विविध प्रशासकीय विभाग, परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह यांसह विविध रुग्णालयीन विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची दालने व निवासस्थाने प्रस्तावित आहेत. तसेच, सुसज्ज नेत्ररोग विभाग तयार करण्यात येणार आहे. अत्याधुनिक रक्तपेढी, अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, ऑटोक्लेव्ह रूम, डायलिसिस विभाग, रुग्णांच्या नातलगांसाठी निवासाची सोय, सर्व इमारतींसाठी सौरव्यवस्था, सेंट्रल ऑक्सिजन व सक्शन सिस्टिम, रेनवॉटर हार्वेस्टिंग, १०० मृतदेह ठेवण्याची सोय असलेले शवागृह आदी सुविधा या नव्या रुग्णालयात असणार आहेत.

 

बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारांची घोषणा

 

आरोग्य क्षेत्रात उत्तम सेवा बजावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची घोषणा याप्रसंगी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तज्ज्ञांची निवड समिती विजेत्यांची निवड करणार असून आरोग्य क्षेत्रात, विशेषतः सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.