शिवसेनेतील 'जादूटोणा'

    दिनांक  11-Sep-2019 21:11:07   राजकारण हे प्रचंड असुरक्षित क्षेत्र असल्यामुळे असेल कदाचित, पण कोणी कितीही म्हटले तरी राजकारणातील लोक गंडेदोरे, बुवाबाबा यांच्यामागे असतात, असे नेहमीच म्हटले जाते. महाराष्ट्रात भलेही सहा वर्षांपूर्वी 'अंधश्रद्धा निर्मूलन कायदा' मंजूर झाला असला आणि पुरोगामीपणाचे लेबल आपण मिरवत असलो तरी काही राजकारणी मंडळी जादूटोण्याच्या मागे लागतात, हे खेदाने म्हणावे लागेल. प्रबोधनकारांच्या पुरोगामीपणाचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसांतील बेताल वक्तव्यांमुळे हा श्रद्धा-अंधश्रद्धेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी शिवसेनेचेच ज्येष्ठ नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर जादूटोणा करत असल्याचा आरोप केला. ते बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरतात, असे दळवी म्हणाले. मुळात दळवी आणि कदम हे एका पक्षात असूनही ते पहिल्यापासून एकमेकांचे विरोधक आहेत. पण, असे असले तरी जाहीररित्या सार्वजनिक व्यासपीठावरून असले अंधश्रद्धेचे आरोप करणे हे जरा अतिच झाले. अशीच काहीशी स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाची असून तेथील सावंतवाडीतही असेच जादूटोण्याचे राजकारण सुरू आहे. सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार व विद्यमान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर शिवसेनेचेच तेथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केसरकर जादूटोणा करतात, असा जाहीर आरोप केला आहे. त्यांच्यामुळे आपल्याला प्रचंड त्रास होत असून याआधी केसरकर यांनी हे 'जादूचे प्रयोग' शरद पवार आणि नारायण राणे यांच्यावर केले आहेत, असे अचाट आरोप साळगावकर यांनी केले होते. तसेच केसरकर यांच्या काळ्या जादूमुळेच राणे यांचा भाजपप्रवेश रखडला असल्याचाही भन्नाट आरोप त्यांनी केला आहे. नगराध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीने असे आरोप करणे म्हणजे हसावे की रडावे, हेच सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे. कोकणातील दोन्ही जिल्ह्यांमधील या 'जादुई' राज्यकर्त्यांकडे आता शिवसेना नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून त्यांना वेळीच आवरणे आवश्यक झाले आहे.

 

परतीच्या मार्गातही 'विघ्न'च

 

कोकण व गोमंतकवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा गणेशोत्सव नुकताच पार पडला. आता कोकणी चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे, पण त्यांच्या परतीच्या मार्गातील विघ्न मात्र तसेच आहे. राज्यातील सर्व महामार्ग व काही महत्त्वाचे राज्यमार्ग कधीचेच चार किंवा सहा पदरी झाले. पण, कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा मानला गेलेला मुंबई-गोवा महामार्ग अजूनही पुरेसा रुंद झालेला नाही. सध्या काम गतीने सुरू असले तरी अजूनही मार्ग पूर्ण होण्यासाठी बरेच अडथळे बाकी आहेत. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळ आणि कोकण रेल्वेने मोठी व्यवस्था केली असली तीही अपुरी पडत आह़े. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण निश्चित प्रगतिपथावर आहे. हे काम मार्गी लागण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्नही होत आहेत. पावसाळी हंगामात कंत्राटदारांनी रस्ता सुरक्षित ठेवावा, यासाठी सूचना देण्यात येत आहेत, पण एवढे करूनही हा रस्ता मात्र यावर्षीही प्रचंड खड्डेमय झाला आहे. महामार्गाचे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यक्षमतेत किमान गुण मिळवू शकत नाहीत, असे चित्र दिसत आहे. कणकवलीत बांधकाम अधिकाऱ्यावर चिखल ओतण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून झाले. त्यावर अनेक आक्षेपही घेण्यात आले. परंतु, महामार्गाची परिस्थिती किमान सुधारल़ी, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, असे सध्याचे चित्र आहे. रत्नागिरी शहरात गेल्या सोमवारी नागरिकांनी छत्री घेऊन रस्त्यांवरच्या खड्ड्यांच्या निषेधासाठी आंदोलन केल़े. रत्नागिरी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर 'खड्डेमुक्त रत्नागिरी'साठी धडक मारण्यात आल़ी. रस्त्यांना खड्डे का पडले, याचे कारण न देण्याची चतुराई नगर परिषदेच्या कारभाऱ्यांनी दाखवली असली तरी शहरातील दुःखदायक प्रवासावर फुंकर घालण्याची कारवाई होऊ शकली नाह़ी. गणपती विसर्जनापूर्वी रत्नागिरी खड्डेमुक्त करा, अशा नगराध्यक्षांच्या सूचना प्रशासनाकडून पाळल्या गेल्या नाहीत, हे वास्तव या निमित्ताने अधोरेखित झाले आह़े. रत्नागिरीचे उदाहरण हे प्रातिनिधिक असून अशीच जवळपास अवस्था कोकणातील सर्व छोट्या शहरांची झाली आहे.