झिजावे परी चंदनासारखे...

    दिनांक  11-Sep-2019 21:45:47   कर्नाटकच्या छोट्याशा खेडेगावातील २८ वर्षीय चंदना राव या तरुणीने आधुनिक शिक्षण आणि शहरात नोकरीनंतर तिच्यासारख्याच खेडेगावातील मुलामुलींच्या हाताला 'हार्टिस्ट'च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे.


ग्रामीण भागातील मुलामुलींना शहरातील तरुणांपेक्षा तुलनेने रोजगाराच्या मर्यादित संधी उपलब्ध असतात. खेडेगाव, छोट्या शहरांतील विकासाची धीमी गती, उच्च शिक्षणाप्रति अनास्था आणि उद्योग-व्यवसायाच्या मर्यादा लक्षात घेता, ग्रामीण भागातील मुलांना शहराचा धोपटमार्गच स्वीकारावा लागतो. शिक्षण पूर्ण झालेच तर नोकरीच्या शोधार्थ मग शहराच्या अनोळखी वाटा तुडवाव्या लागतात. आपलं गावं, आपलं कुटुंब सगळं अगदी मागे सोडून, केवळ आठवणींची शिदोरी सोबत घेऊन शहरी वातावरणात एकरूप होण्यासाठी मग सर्वस्व अर्पण करण्याची वेळ येते. बदललेली भाषा, शहरी चालीरीती, उच्चभ्रू जीवनशैलीचा झगमगाट डोळे दीपवून टाकतो. काही या झगमगाटात हरवून जातात, तर काही स्वत:च दिवा बनून इतरांना दिशा दाखवतात.कर्नाटकच्या चंदना राव हिच्या बाबतीतही असेच काहीसे घडले.

 

कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील नारायणपुरा हे चंदनाचे छोटेसे गाव. वडील पोस्टमन, तर आई गावातच शिक्षिका. दोघांच्या पगारातून कसंबसं चंदनाने व्हिज्युअल आर्ट्समधील आपली पदविका शहरातील महाविद्यालयामधून पूर्ण केली. पण, गावापासून बंगळुरूपर्यंत तब्बल १३० किमींचा हा पाच तासांचा प्रवास चंदनाला झेपेनासा झाला. पण, बंगळुरूमधील नातेवाईकांकडे फार काळ वास्तव्यास राहणे प्रशस्त नसल्यामुळे चंदनाने कशीबशी ही पदविका पूर्ण केली. एवढंच नाही तर प्रवासात ती आपली झोप पूर्ण करत असे, तर अख्खी रात्र प्रोजेक्ट्ससाठी जागून काढे. चंदना चांगल्या नोकरीच्या शोधात होती. पण, नोकरीऐवजी तिला कुठल्याही मोबदल्याशिवाय एका छोट्या कंपनीत इंटर्नशिपची संधी मिळाली. फक्त दोन वेळचं जेवण कंपनीत निशुल्क मिळेल, म्हणून चंदनाने ही इंटर्नशिप आनंदाने स्वीकारली. ही इंटर्नशिप होती बंगळुरूला. तिच्या गावापासून कोसो दूर. रोज इतका प्रवास करणे चंदनाला शक्य नव्हतेच. मग बंगळुरूलाच घर घेऊन भाड्यावर राहण्याचा आणि त्या भाड्याचे पैसे कमवण्यासाठी एका संगणक प्रशिक्षण केंद्रात तिने काम सुरु केले. या नोकरीने चंदनाच्या हाती महिनाअखेर १५०० रुपये पडायचे खरे, पण १३०० रुपये भाड्याचे भरून उरलेल्या २०० रुपयांत ती कसंबसं भागवायची. वस्तूंची खरेदी दूरच, कधी कधी पोटावरही अन्याय व्हायचा. पाठीशी लहान बहीण असल्याने वडिलांकडे पैसे मागणेही शक्य नव्हते. परंतु, चंदनाची मेहनत, जिद्द आणि चिकाटी कामी आली. इंटर्नशिप संपल्यानंतर 'टीसीएस' या प्रतिष्ठित कंपनीत तिला चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. हाती चार पैसे टिकू लागले. आईवडिलांनाही तेवढाच हातभार लागला. चंदनाची बहीणही पुढील शिक्षणासाठी गावातून तिच्यासोबतच बंगळुरूत दाखल झाली. सर्व काही अगदी आलबेल होते.

 

पण, कालांतराने कामातील तोचतोचपणाचा चंदनाला उबक आला. तिच्यासारखेच देशभरातील लाखो ग्रामीण भारतातील मुलंमुली हाताला काम नाही म्हणून गावातच अडकून पडल्याची भावनाही चंदनाला बैचेन करत होती. आपण यातून मार्ग जरुर काढला, कसेबसे निभावून नेले, पण इतरांचे काय, या विचाराने ती अस्वस्थ होई. म्हणूनच, या ग्रामीण भागातील तरुणतरुणींना चांगले शिक्षण, रोजगाराच्या संधी, सुयोग्य मार्गदर्शन कसे उपलब्ध करून देता येईल, यासाठी चंदनाने २०१६ साली नोकरी सोडून भारतातील ग्रामीण भागात भटकंती सुरू केली. तिच्या या जीवनप्रवासात तिला आपला जीवनसाथीही भेटला. मग बंगळुरूला परतल्यानंतर खेडेगावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 'हार्टिस्ट' नावाची कंपनी चंदनाने सुरू केली. आपली सगळी जमापुंजी चंदनाने या कंपनीत गुंतवली. त्याविषयी ती सांगते की, "या कंपनीच्या माध्यमातून मी फार काही कमवते असे नाही. पण, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना चांगला पगार, उत्तम मार्गदर्शन, संगणक आणि इतर साहित्य मिळवून देण्यासाठी मी निधीच्या प्रतीक्षेत आहेत." विशेष म्हणजे, या कंपनीत कोणीही कायमस्वरूपी नोकरीवर नाही. मोठ्या संख्येने इंटर्न्स आणि फ्रीलान्सर्स चंदनासोबत काम करतात. देशभरातील कंपन्यांसोबतच अनेक विदेशी कंपन्यांचे लोगो, व्हिज्युअल आर्टशी संबंधित प्रकल्प चंदनाची 'हार्टिस्ट' आनंदाने स्वीकारते. 'शिक्षण फाऊंडेशन' या कर्नाटकातील सामाजिक संस्थेसाठी पुस्तके डिझाईन केल्याचेही चंदना आवर्जून सांगते. त्याशिवाय इंटिरिअर क्षेत्रातही चंदनाने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. भविष्यात 'हार्टिस्ट'चा आर्थिक डोलारा अधिक भक्कम करून ग्रामीण भागातील मुलामुलींच्या हाताला काम देण्याच्या उद्दिष्टासह चंदनाची वाटचाल सुरू आहे. चंदनाला तिच्या यशाचा मूलमंत्र विचारला असता ती म्हणते की, "स्वत:वरचा विश्वास कदापि गमावू नका. मागे वळून न बघता पुढे चालत राहा. कष्टाचे फळ जरुर मिळते. तुम्ही काही काळाकरिता 'स्ट्रगल' कराल, पण तुम्हाला यश नक्की मिळेल." अशा या चंदनाने सर्वार्थाने झिजून कित्येक ग्रामीण मुलामुलींच्या स्वप्नांना विश्वासाचे पंख दिले आहेत. स्वत:सोबत आपल्या बंधुभगिनींच्याही विकासाचा तिने ध्यास घेतला आहे. तेव्हा, यशोशिखराकडे वाटचाल करणाऱ्या चंदनामधील 'आर्टिस्ट'च्या कल्पकतेतून उमललेल्या या 'हार्टिस्ट'ची उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच इच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!