'हिरकणी'मधील शिवराज्याभिषेक गीत आज होणार प्रदर्शित

    दिनांक  10-Sep-2019 12:46:09


९ कलाकार, ६ लोककलांमधून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा देणार आहेत शिवराज्याभिषेक गीतांमधून. हे गाणे आज प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी या गाण्यांची छोटीशी झलक सोशल मीडियावरून शेअर केली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित आगामी चित्रपट 'हिरकणी' यामधील हे गाणे आहे.

प्रत्येक आई असतेच 'हिरकणी' असे या चित्रपटाची टॅग लाईन आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी हिरकणीच्या साहसाची कथा आपल्यासमोर उलगडणार आहे. तर चिन्मय मांडलेकर यांनी कथा पेपरवर उतरवली आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमितराज यांचे संगीत आहे. या सगळ्याच गोष्टींमुळे चित्रपटाला एक वेगळाच दर्जा प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

हिरकणीच्या शौर्यगाथेवरचा हा चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. कच्चा लिंबू चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केल्यानंतर प्रसाद ओक यांच्या हा दुसरा चित्रपट आहे. महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी" या चित्रपटात साकारल्याचे प्रसाद ओक यांनी आपल्या सोशल मीडियावर म्हटले होते. त्यानुसार आता या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल.