पाकिस्तानात हिंदू आणि शीख सुरक्षित नाहीत : बलदेव कुमार

    दिनांक  10-Sep-2019 12:04:39नवी दिल्ली
: पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर वारंवार अत्याचार होत असून त्यांची परिस्थिती बिघडत चालल्याचे पुरावे वारंवार समोर येत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे माजी आमदार बलदेव कुमार यांना आपल्या कुटुंबासमवेत प्राण वाचवून भारतात यावे लागले. त्यांनी भारताकडे राजकीय आश्रयाची मागणी केली आहे. बलदेव हे खैबर पख्तून ख्वा (केपीके) विधानसभेच्या बारिकोट (राखीव) जागेचे आमदार आहेत.


फक्त अल्पसंख्याकच नाही तर मुस्लिमही पाकिस्तानात सुरक्षित नाहीत. आम्ही बर्‍याच अडचणींचा सामना करत पाकिस्तानमध्ये जगत आहोत. भारत सरकारने मला आश्रय देण्याची विनंती मी भारत सरकारला करतो. मी परत पाकिस्तानला जाणार नाही, ” असेही बलदेव कुमार यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

 

४३ वर्षीय बलदेव यांना आता परत पाकिस्तानला जायचे नाही. त्यांनी असे म्हटले आहे की, "हिंदू आणि शीख यांच्यासह अल्पसंख्याकांवर पाकिस्तानात खोटे खटले चालविले जात आहे. भारत सरकारने एक पॅकेज जाहीर करावे जेणेकरुन पाकिस्तानात राहणारे हिंदू आणि शीख कुटुंबे भारतात परत शकतील. मोदी साहेबांनी त्यांच्यासाठी काहीतरी करावे अशी माझी इच्छा आहे. पाकिस्तानात त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत.अशी विनंती त्यांनी केली.

 

२०१६ मध्ये त्यांच्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांची हत्या झाली. बलदेव यांच्यावर खोट्या खून खटल्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि २०१८ मध्ये निर्दोष मुक्त करण्यात आले. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख आणि ख्रिश्चन मुलींचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करून मुस्लिम पुरुषांशी लग्न लावुन दिले जाण्याच्या घटना नियमितपणे नोंदवल्या जातात. शीख मुलीचे अपहरण, जबरदस्तीने लग्न आणि धर्मांतर या घटनेची अनेक उदाहरणे त्यांनी दिली.