'द स्काय इस पिंक' चा ट्रेलर इमोशनल

10 Sep 2019 10:38:53


शोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इस पिंक' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वासिम, रोहित सराफ हे या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. प्रियांका चोप्रा बऱ्याच दिवसांनी तिच्या हॉलीवूडमधून क्वांटिको सिरीज नंतर बॉलिवूडच्या चित्रपटात काम करणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी औत्सुक्याचे वातावरण आहे.

आज प्रसिद्ध झालेल्या या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांची लव लाईफ, त्यांच्या नात्यामध्ये येणारी वादळे, परिस्थितीनुसार बदलणारे नातेसंबंध यांची एक झलक दिसते. झायरा वासिम आणि रोहित सराफ यांनी त्यांच्या मुलांच्या भूमिका साकारल्या आहेत. तर झायरा वासिम ला झालेल्या असाध्य रोगातून हे चारही जण कसे मार्ग काढतात या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला चित्रपटात मिळणार आहेत. भावनांनी ओतप्रोत भरलेला असा हा चित्रपट बघण्याची उत्सुकता हा ट्रेलर पाहिल्यावर आणखीनच वाढेल यात शंका नाही.

'द स्काय इस पिंक' या चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये पूर्ण झाल्यावर देखील प्रियांका चोप्राने आपल्या चाहत्यांना चित्रपटाविषयीची माहिती दिली होती तसेच काल तिने चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला. RSVP प्रोडक्शन आणि रॉय कपूर या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे देखील चित्रपटाला एक महत्व प्राप्त झाले आहे. 'द स्काय इस पिंक' हा एका सत्य कथेवर आधारित चित्रपट ११ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Powered By Sangraha 9.0