रविश ते रबिश...

    दिनांक  10-Sep-2019 21:29:40   नुकताच रविश कुमार या एनडीटीव्हीच्या पत्रकारास रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले की, "भारतात प्रसारमाध्यमे दबलेली आहेत, देशात दडपशाही आहे." असो. यावर वाटते की, पत्रकार हा कोणत्याही विचारधारेला मानणारा असला तरी एखाद्या घटनेचे सत्य स्वतःच्या त्या विचारातून पाहणारा नसावा, ही किमान अपेक्षा. सत्य जे आहे ते आहे, जे नाही ते किंवा जे आहे ते भडक करून सांगणे म्हणजे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आहे का? या पार्श्वभूमीवर रविश कुमार यांची पत्रकारिता तपासली की वाटते, पत्रकारिता म्हणजे केवळ आणि केवळ मोदीद्वेष, भारतीय समाजाला तुच्छ लेखणे, देशामध्ये एखादी जरी वाईट घटना घडली तर त्यावर आकाशपाताळ एक करून ती घटना म्हणजेच देश असे रंगवणे म्हणजे पत्रकारिता असावी. देशात तर देशात, परदेशातही देशाबद्दल गरळ ओकणाऱ्या रविश यांची मानसिकता या एका घटनेतून स्पष्ट होते. जेएनयुमध्ये कन्हैया आणि त्याच्या फुटीरतावाद्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यावेळी रविश यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये दूरदर्शनवर काळा पट्टा दाखवला. त्यांचे म्हणणे जेएनयुमधील कन्हैयाकुमार वगैरेंवर गुन्हा दाखल होणे म्हणजे देशासमोर अंधार आहे. देशाचे तुकडे व्हावे, अशी इच्छा असणाऱ्यांबद्दल रविश यांना इतके प्रेम! २०१९ साली, दुसऱ्यांदा भाजप जिंकली, तेव्हा रविशचे म्हणणे होते, "मी हरलो, पाच वर्षे मोदी सरकारचे अपयश देशासमोर मांडूनही मोदीच कसे जिंकले?" बरं, रविश यांचे दुसरे कर्तृत्व काय तर, अमुक एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अमक्याने मला शिव्या दिल्या, मला भीती वाटते वगैरे वगैरे म्हणत सदोदित घाबरणे. मोदींना लक्ष्य केले की, लोकांचे लक्ष आपल्याकडे जाते, हे रविश यांना माहिती आहे. त्यामुळे 'मला मारून टाकतील' अशा आशयाचे पत्रही त्यांनी पंतप्रधानांना पाठवले होते. तर असा हा रविश ते रबिश प्रवास... आंतरराष्ट्रीय पुरस्कार कसे मिळतात? तीही एक राजकारणातल्या राजकारणातली गोष्ट आहे. सर्वसाधारणपणे पुरस्कार मिळाल्यानंतरच कळते की, अरे अमुक एक नावाची व्यक्ती आहे बरं का, तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तर असे कर्तृत्वाने नव्हे, तर पुरस्काराने उजेडात येणारे दिवे खूप आहेत. या दिव्यांकडे पाहिले तर मात्र प्रकर्षाने जाणवत राहते की, दिव्याखाली अंधारच आहे!

 

अशी ऐकू आली कोल्हेकुई

 

लबाड कोल्होबा कसा स्वार्थी आणि संधीसाधू असतो, याबाबत बिलकुल दुमत नाही. आताशा वाटू लागले आहे की, कोल्हा कोल्हा असून मांजर पण आहे का? कारण मांजर डोळे मिटून दुध पिते तसे स्वतःच्या गुर्मीच्या अहंकाराच्या अंधारात हा कोल्हा जनाच्या मनाच्या लाजेचे डोळे मिटून आहे. अर्थात मांजरीने डोळे मिटले म्हणून जगाला दिसत नाही, असे नाही. कोल्ह्याला काय? सत्तासंपत्तीच्या हाडाचे तुकडे चघळायला मिळतात ना बस्स. आता कुणी म्हणेल की काय हे कोल्हा कोल्हा पुराण सुरू केले आहे? तर कोल्हे अमोल आहेत का? अमोल म्हणजे ज्यांचे मोल होऊ शकत नाहीत ते बरं. तर हो, कोल्हे अमोलच आहेत. यांचे सदोदित नाटक सुरूच आहे. भाबड्या जनतेने संभाजी महाराजांचे पडद्यावरचे रूप पाहिले आणि फसली. या फसण्याने ते चांगलेच हवेत उडू लागले. कोल्हे विसरले की, त्यांनी शूर संभाजींची केवळ भूमिका, तीही छोट्या पडद्यावर रंगवली होती. ती भूमिका रंगवतानाही त्यांच्या मनातला विद्वेष, समाजदुहीची बिजे अजिबात लपली नाहीत. तरीही जनतेने शूर संभाजी महाराजांना, मानाचा मुजरा म्हणून घड्याळधारी कोल्ह्यांना स्वीकारले. पण निवडून येताच यांनी याच भोळ्याभाबड्या जनतेला काय द्यावे? तर, राष्ट्रवादीचा अमुक एक नेता निवडून आला नाही तर मी असे करीन आणि तसे करीन. यासाठीच जनतेने यांना निवडले होते का? आता निवडून आल्यापासून नवीन कोल्हेकुई सुरू आहे. ती म्हणजे, इव्हीएम बदला, बॅलेट पेपरने निवडणुका घ्या. बरं, स्वतःही इव्हीएमने जिंकले ते कसे? असा प्रश्न विचारला की, यांचे उत्तर आहे, हे प्रश्न विचारणारे ४० पैशाचे लावारिस भक्त आहेत. कुणालाही वारीस, लावारीस ठरवायला कोल्हे कोण आहेत? कोल्ह्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. माझ्यासारखा मीच, दुसरा कुणी नाहीच, या कैफात त्यांच्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहेत. स्वतःच्या प्रतिमेत कैद असलेल्या कोल्ह्यांना कुणी सांगावे की, जनतेने तुम्हाला नाही, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला मत दिले होते.