मज प्रिय हे वेदव्रत...

    दिनांक  10-Sep-2019 21:10:37वेदशास्त्रांचा अभ्यास फार गहन असून आयुष्याची अनेक वर्षे खर्ची घातली तरी तो पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, सोळावर्षीय प्रियव्रतने तो पूर्ण करत इतिहासालाच गवसणी घातली आहे. त्याच्या या कर्तृत्वाविषयी...


सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग. या सुपरफास्ट तंत्रज्ञानाच्या युगात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विविध तांत्रिक गोष्टी शिकण्याकडे आणि त्यासंबंधीचे शिक्षण घेण्याकडेच अलीकडच्या तरुणांचा कल दिसून येतो. वेद, पुराण आदी बाबी शिकणे तर दूरच. साधं त्यांच्याकडे पाहण्यास, माहिती करुन घ्यायलाही तरुणाईमध्ये फारसा रस दिसत नाही. प्राचीन ऋषिमुनी आणि साधुमहंतांच्या म्हणण्याप्रमाणे विविध ग्रंथ, वेद आणि पुराण आदींमध्ये मनुष्याच्या जीवनाशी निगडित प्रत्येक समस्यांचे उत्तर आहे. यातील बाबींचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर मनुष्य आपल्या जीवनातील प्रत्येक अडीअडचणींवर मात करून आपले जीवन सुखमय करू शकतो. तरीही या सर्व बाबींकडे वर्षानुवर्षे दुर्लक्षच झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दुसरीकडे या शास्त्रांचा अभ्यास करणारेही काही अभ्यासक आहेत. संपूर्ण आयुष्य यासाठी वेचल्यानंतरही त्यांच्या मते, वेदशास्त्रांचा अभ्यास फार गहन असून आयुष्यातील अनेक वर्षे खर्ची घातली तो पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, चेन्नईमधील अवघ्या सोळा वर्षीय प्रियव्रत पाटील हा तरुण याला अपवाद ठरला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तामिळनाडू येथील कांची मठाकडून आयोजित केली जाणारी 'तेनाली महापरीक्षा' उत्तीर्ण करत १६ वर्षीय प्रियव्रतने इतिहास घडवला आहे. अनेकांना संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्यानंतर जे जमले नाही, ते प्रियव्रतने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच करून दाखवल्याने त्याच्यावर सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्या कौतुकाचे गोडवे गायले जात आहेत. इतकेच नव्हे, तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रियव्रतच्या या कार्याची दखल घेतली असून त्याचे ट्विटरवर कौतुक केले. मोदी यांच्या सोबतच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही प्रियव्रत याचे या कार्याबाबत तोंडभरून कौतुक केले आहे.

 

१६ वर्षीय प्रियव्रत पाटील याचा जन्म ५ जानेवारी, २००३ साली चेन्नई येथे झाला. प्रियव्रत हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. वडील देवदत्त पाटील आणि आई अपर्णा यांनी प्रियव्रतमधील प्रतिभा अगदी लहानपणीच ओळखली. शालेय शिक्षणासोबतच वेदशास्त्रांचा अभ्यास करण्यासही त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले. प्रियव्रत याचे वडील देवदत्त पाटील यांनाही वैदिक साहित्याचा अभ्यास करण्याची आवड अगदी लहानपणापासूनच होती. त्यामुळे अनेक मठांमध्ये जाऊन ते वेदांचा अभ्यास करीत. वेदशास्त्र, पुराणे आदींचा अभ्यास केल्यामुळे पाटील यांच्या कुटुंबीयांकडून सर्वांना नेहमी याच विषयांवर अभ्यास करण्याकरिता प्रोत्साहन दिले जात असे. मात्र, अनेकजण वारंवार समजावल्यानंतरही वेदशास्त्रांचा अभ्यास करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल त्यांना फार वाईट वाटत असे. त्यामुळे आपल्याच कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीने वैदिक साहित्याचा अभ्यास करून त्यात पारंगत व्हावे, अशी देवदत्त पाटील यांची इच्छा होती. त्यामुळे प्रियव्रत याने वेदांसह यांसबंधित इतर विविध विषयांचा अभ्यास करण्यावर भर दिला. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या इच्छेने प्रियव्रतने लहानपणापासूनच वेद, वेदान्त, मीमांसा, वेदभाष्य, संस्कृत व्याकरण आणि न्याय आदी विषयांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे त्याचे शालेय शिक्षणही सुरू होते. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणार्‍या प्रियव्रतला हे फारसे अवघड गेले नाही. प्रियव्रतने या सर्व विषयांचा चिकाटीने अभ्यास केला.

 

वडील देवदत्त यांनी प्रियव्रतच्या या जिद्द आणि चिकाटीची दखल घेत त्याला वेदशास्त्रांमध्ये पारंगत होण्यासाठी तामिळनाडू येथील कांची मठाची 'तेनाली महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा सल्ला दिला. ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे एक मोठे आव्हानच. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे खच्ची घातलेल्यांना जे जमत नाही, ते वयाच्या अवघ्या १६ वर्षीय सुकुमाराला कसे जमणार, असेच अनेकांना वाटत होते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वरील सर्व विषयांवर प्रभुत्व तर हवेच. लिखाणासोबतच वेदशास्त्रे कंठस्थ असणे यात गरजेचे. इतके झाल्यानंतर केवळ स्वबळावर नव्हे, तर आपल्या गुरूंच्या सोबत असलेल्या आचरणाचीही यात दखल घेतली जाते. या परीक्षेचे एकूण १४ टप्पे असून यात मुलाखत आणि सत्र (लेखी) यांचाही समावेश असतो. या परीक्षेसाठी आत्तापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, अनेकांना अपयश आले असून बर्‍याच जणांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे यासाठी खर्ची घातली आहेत. अनेक जण वर्षानुवर्षे ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, प्रियव्रतने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी या परीक्षेत यश संपादन केले. या परीक्षेचे सर्व १४ टप्पे पार करत मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. प्रियव्रतचे हे यश फार मौल्यवान असून याची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणार असल्याचे कांची मठाच्या सदस्यांकडून सांगितले जात आहे. प्रियव्रतने पुढील आयुष्यात एखाद्या नवग्रंथाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा मठाधिपतींकडून व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'च्या शुभेच्छा...!

- रामचंद्र नाईक