ग्वादारची दारे बंद होणार?

    दिनांक  10-Sep-2019 19:44:17   चीनच्या 'वन बेल्ट वन रोड' आणि 'सीपेक' या महत्त्वाकांक्षी व्यापारमार्गांच्या पटलावरील कराचीनजीकचे ग्वादार हे एक महत्त्वाचे बंदर. चीनच्या 'कोस्को' (चायनीज ओशन शिपिंग कंपनी) कंपनीने कराची ते ग्वादारदरम्यानची कंटेनर लाईनर सेवा बंद केली आहे.


पाकिस्तान आणि चीन म्हणजे जणू सुखदु:खात एकमेकांचे सखेसोबती. 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' या नीतीनेच आतापर्यंत या दोन्ही देशांच्या स्वार्थपूर्ण मैत्रीचे 'याराने' सर्व जगाने अनुभवले. यांच्या या अपरिहार्य मैत्रीचे कारणही अगदी तसेच. 'मित्राचा शत्रू तो आपलाही शत्रूच' या नात्याने सुरुवातीपासूनच पाकिस्तान आणि चीनने भारतविरोधी भूमिका घेतल्या. वेळोवेळी भारताला कोंडीत पकडण्याची एकही संधी या दोन्ही कथित मित्रांनी आजवर दवडली नाही आणि पुढेही त्यांच्या भारतविरोधी नीतीमध्ये सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचेच ठरेल. तर अशा या दोन चलाख मित्रांच्या परस्पर संबंधांमध्ये मिठाचे खडे यापूर्वीही पडले. पण, रडतखडत कसेबसे त्यांनी निभावून नेले. इतकेच काय तर, चीनमधील उघूर मुसलमानांवरील अन्यायाविरोधी इस्लामिक अभिमानाचे गोडवे गाणाऱ्या पाकिस्तानने साधा 'ब्र'ही काढला नाही. पाकच्या लेकी चिनी बाजारात कवडीमोलाच्या भावात विकल्या गेल्या, तरीही पाकिस्तानच्या नाकावरची साधी माशीही उडली नाही. अशी ही पाक-चीन मैत्रीची गरजगाथा. पण, मैत्री एकीकडे आणि व्यवहार-व्यापार एकीकडे. चीनच्या मैत्रीच्या आडून खेळलेल्या व्यापारी फास्यांविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही. तरी सध्या पाकिस्तानने चीनच्या मदतीने विकसित केलेल्या महत्त्वाकांक्षी ग्वादार बंदर प्रकल्पात मालवाहक बोटींचे आवागमन कमी झाले आहे. पाकिस्तानची ढासळणारी अर्थव्यवस्था आणि प्रशासकीय पातळीवरील उदासीनता यामुळे या बंदरावरून होणारी मालवाहतूक मंदावली असून आगामी काळात ती जवळपास पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

 

चीनच्या 'वन बेल्ट वन रोड' आणि 'सीपेक' या महत्त्वाकांक्षी व्यापारमार्गांच्या पटलावरील कराचीनजीकचे ग्वादार हे एक महत्त्वाचे बंदर. चीनच्या 'कोस्को' (चायनीज ओशन शिपिंग कंपनी) कंपनीने कराची ते ग्वादारदरम्यानची कंटेनर लाईनर सेवा बंद केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची कमतरता आणि खासकरून अफगाणिस्तानसोबतच्या जलमार्ग व्यापारात फारसा उपयोग न झाल्याने कंपनीला हा निर्णय घेणे भाग पडले. ग्वादार बंदरावरच्या कस्टम पद्धतीतील त्रुटी आणि शिपिंगसाठी होणारा प्रचंड खर्च यांचे कारण पुढे करून 'कॉस्को'ने आपले अंगच काढून घेतलेले दिसते. इतकेच नाही, तर पाकिस्तानच्या व्यापारी धोरणांवर टीका करत, 'कॉस्को'ने यासाठी पाकिस्तानलाच जबाबदार धरले असून बंदर परिसरात साधे व्यापारी केंद्र, बाजाराचीही सोय नसल्याची खंत 'कोस्को'ने बोलून दाखविली. त्यामुळे नुसते बंदर उभारून मालवाहतूक करणाऱ्या बोटींची वाट पाहण्यातच पाकिस्तानने धन्यता मानली आणि बंदरानजीक कोणत्याही ठोस सोयीसुविधांच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष केले. परिणामी, आधीच आर्थिकदृष्ट्या कोसळलेल्या ग्वादार बंदरालाही त्याची झळ बसल्याचे दिसते. 'चायना ओव्हरसीज पोर्ट होल्डिंग कॉर्पोरेशन' अर्थात 'सीओपीएचसी'कडे ग्वादार बंदराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असून त्यांनीही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

 

मार्च २०१८ मध्ये या बंदरातून कंटेनर लाईनर सेवेला हिरवा कंदील दाखवला गेला. मुख्यत: अफगाणिस्तानसोबत होणाऱ्या व्यापाराला चालना देण्याचा ग्वादार बंदर उभारणीचा व्यापारी हेतू होता. परंतु, भारत-अफगाणिस्तान आणि इराणने संयुक्तरित्या विकसित केलेल्या चाबहार बंदरातील यशस्वी व्यापारमार्गाने ग्वादारची दारेच हळूहळू बंद केली. त्यामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान दरम्यानच्या ग्वादार बंदरामार्गे होणाऱ्या व्यापाराने आजवरचा निचांकी आकडा गाठला आहे. फळे, भाज्या, संगमरवर, खनिज पदार्थांच्या वाहतुकीसाठी कंटेनर लाईन सेवेचा उपयोग होत होता. पण, एकूणच पाकिस्तानचे अर्थचक्र कोसळल्याने व्यवसायाबरोबरच व्यापारमार्ग, दळणवळण यावरही विपरीत परिणाम झाला असून आगामी काळात ही परिस्थिती सुधारली नाही, तर ग्वादारचे दार कायमस्वरुपी बंद होऊ शकते. कारण, असा नुकसानीचा प्रकल्प चीनलाही परवडणारा नाहीच. असे झाल्यास चीनतर्फे पाकिस्तानात राबविल्या जाणाऱ्या सर्वच विकासप्रकल्पांवर विपरीत परिणामही होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात चीन-पाकिस्तानमधील व्यापारी पातळीवरील तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे होणे पाकिस्तानसाठी निश्चितच फलदायी नसले तरी भारतासाठी मात्र ही निश्चितच सुवार्ताच म्हणावी लागेल.