ओवैसी आणि एनआरसी

    दिनांक  01-Sep-2019 21:52:38   
आसाममध्ये बांगलादेशमधून आलेल्या मुस्लिमांवर कारवाई होत आहे
, हे या मुस्लीम समाजाच्या स्वयंघोषित बादशहाला पाहवत नाही पण, केंद्र सरकारच्या धडक आणि कडक कारवाईमध्ये असदुद्दीनसारख्या नेत्यांचे जगणे वागणे म्हणजे आता सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, असेच झाले आहे.


असदुद्दीन यांचे म्हणणे आहे की, अमित शाह म्हणाले होते की, आसाममध्ये 40 लाख घुसखोर आहेत, पण कारवाई केल्यावर तर 19 लाख घुसखोरच मिळाले. मग आता पण ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत का? आता कुणालाही प्रश्न पडेल की, असदुद्दीन आहेत हैदराबादचे. पण त्यांची जी काही शंका असते, ती थेट देशाच्या आंतरराष्ट्रीय धोरणाबाबतच असते. अर्थात घटनेने त्यांनाही व्यक्त होण्याचा मौलिक अधिकार दिलाच आहे. ते आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते हा अधिकार मनसोक्त वापरत असतातच. तर असो, आता असदुद्दीन यांना अमित शाहंना विचारायचे आहे की, “बोला, तुम्ही 40 लाख घुसखोर म्हणत होतात. मग हे 19 लाख घुसखोरच कसे मिळाले?” खरे तर 19 लाख इतक्या मोठ्या संख्येने घुसखोर शोधून काढण्यात सरकारला यश मिळाले आहे, ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. इतके वर्ष हे लोक भारतात बेकायदेशीररित्या राहून इतर भारतीयांच्या हक्कांवर डल्ला मारत होते. अर्थातच त्यांना या भारत देशाबद्दल प्रेम वगैरे असण्याची गोष्ट तशी धूसरच. घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे, असे या घुसखोरांमुळे झालेले. यांच्यामुळेच ईशान्य भारतामधले सांस्कृतिक आणि राजकीय जीवनही पार ढवळून निघालेले. त्यामुळे घुसखोरांना शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे होते. हे काम जोखमीचे, संवेदनशीलतेचे आणि अत्यंत धोकादायक जबाबदारीचेही. कारण घुसखोर कोण?, या निकषातून घुसखोरांना शोधण्याचे काम कठीण, पण प्रशासनाने ते कामही चिकाटीने केले. या सगळ्यांचे असदुद्दीन यांना बिलकुल कौतुक नाही. कोल्ह्याला द्राक्ष आंबट या न्यायाने असदुद्दीन यांनी या कारवाईत मग काही तर मत मांडावे आणि मीही आहे बरं का? असे लोकांना समजावे, यासाठी मत मांडले आहे की, अमित शाह म्हणाले होते की, 40 लाख घुसखोर होते मग आता 19 लाखच कसे काय? तसे पाहायला गेले तर असदुद्दीन ताकाला जाऊन भांडे लपवत आहेत. आसाममध्ये बांगलादेशमधून आलेल्या मुस्लिमांवर कारवाई होत आहे, हे या मुस्लीम समाजाच्या स्वयंघोषित बादशहाला पाहवत नाही पण, केंद्र सरकारच्या धडक आणि कडक कारवाईमध्ये असदुद्दीनसारख्या नेत्यांचे जगणे वागणे म्हणजे आता सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, असेच झाले आहे.


काँग्रेसी नेत्यांचा घाम

काँग्रेसी नेत्यांच्या घामामुळे महाराष्ट्र घडला. इति काँग्रेस नेते मल्लिकाअर्जुन खर्गे. बापरे! हे एकून बीपी नसलेल्यांनाही दरदरून घाम फुटला असेल. महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांच्या घामाने घडला, हे म्हणणे म्हणजे आता सगळ्या महाराष्ट्राने जबरदस्त ताकदीचा डिओड्रंट वापरायला हवा, असे वाटते. काहीही... मुळात काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या राज्यात घाम येईपर्यंत कष्ट केलेत का? नाहीच. मस्त आरामाचे सोयीसुविधांयुक्त आयुष्य घालवावे, गांधी-नेहरूंच्या नावाने दिल्लीच्या गांधी घराण्याची गुलामगिरी करावी, वाट्टेल ते करावे, हाच यांचा दिनक्रम. यामध्ये त्यांना घाम येणार कुठून? दुसरे असे की, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कुणी लढवली? त्यावेळी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा घाट कोण घालत होते आणि त्यासाठी कोणते पक्ष दिल्लीच्या केंद्रसत्तेवर असलेल्या काँगे्रसची हांजीहांजी करत होते? त्यात महाराष्ट्रातील 105 नागरिक मृत्युमुखी पडले, हे आजही महाराष्ट्र विसरला नाही. कदाचित खर्गेंच्या मते महाराष्ट्राला कायम दिल्लीदरबारी झुकायला लावणे म्हणजे महाराष्ट्र घडवणे असू शकते. काँग्रेसचे स्वातंत्र्योत्तर नेते आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाले होते, हे खर्गे विसरलेत. त्यामुळेच ते म्हणू शकले की, काँग्रेस नेत्यांच्या घामामुळे महाराष्ट्र घडला. असो, पण खरे काय आहे? या मातीचा गुणधर्मच विकासाचा आणि शौर्यशील सहिष्णुतेचा आहे. इथेच तर छत्रपती शिवबांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि प्रत्यक्षातही आणली होती. त्या छत्रपतींच्या कर्तृत्वाने ही महाराष्ट्राची भूमी पावन झाली आहे. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात तर देशासाठी घरादारावर नांगर फिरवून आयुष्याचा होम करणारे शूरवीर महाराष्ट्राच्या घराघरातून निर्माण झाले. स्वातंत्र्यासोबतच सामाजिक क्रांती करणारे समाज शिल्पकारही महाराष्ट्राचेच. या सगळ्यांच्या प्रेरणेने, विचारांनी, कर्तृत्वाने हा महाराष्ट्र घडला. मल्लिकाअर्जुन खर्गे काँग्रेस नेत्यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार आणि दहशतवादाने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. गरीब जनतेच्या इच्छा-आकांक्षांचा विचार न करता या पक्षातील नेत्यांनी स्वतःची तुंबडी भरून घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेच्या आक्रोशाने काँग्रेस नेत्यांना घाम फुटला होता पण, कदाचित नसेलही. कदाचित असे म्हणते कारण, गेंड्याच्या कातडीला घाम फुटतो का नाही, ते माहिती नाही.