'जागतिक आदिवासी दिना'निमित्त वाड्यात भव्य शोभायात्रा

    दिनांक  09-Aug-2019 15:50:22वाडा : संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून घोषित केल्यापासून आदिवासी समाजामध्ये एक वेगळी अस्मिता जागृत झाली आहे. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करून आपली ओळख टिकवून ठेवण्याकरिता हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा गेल्या काही वर्षात निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी वाड्यात एका भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत हजारो आदिवासी सहभागी झाले तर तरुणाईचा सहभाग लक्षवेधक होता.

 

वाडा शहरातून निघालेल्या रॅलीत आदिवासी समाजाचे सांस्कृतिक ठेवा असलेल्या बोहाडा, तारपा नाच, कांबड नाच, कणसरी नाच आदी नृत्य करत पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. शहरातून निघालेल्या या शोभायात्रेत आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थी - विद्यार्थीनी, कवठे पाडा, मांडा, खुपरी व गालतरे गटातून येणाऱ्या रॅलीही सहभागी झाल्या होत्या तर तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्षा आदी लोकप्रतिनिधींसह विविध समाजातील पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

संगणक- इंटरनेटच्या जगात हरवत चाललेल्या आदिवासी समाजाच्या निसर्गाशी नाते सांगणाऱ्या मौखिक व सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचे आव्हान ह्या समाजासमोर आहे. ह्या रॅलीच्या निमित्ताने आदिवासीच्या सांस्कृतिक परंपरा उजागर झाल्याचे दिसत होते.