जम्मू काश्मिरमध्ये प्रॉपर्टी बाजारात उत्साह

    दिनांक  09-Aug-2019 13:51:42


नवी दिल्ली : 'कलम ३७०' आणि 'कलम ३५ अ' रद्द झाल्यानंतर देशभरातून काश्मिरमध्ये खरेदीदार जमीनींचे व्यवहार करण्यासाठी उत्सूक आहेत. जम्मू काश्मिरच्या रिअल इस्टेट एजंटकडे देशभरातून चौकशी केली जात आहे. व्यवहार करण्यासाठी दररोज सरासरी २० इच्छुक ऑनलाईन आणि इतर माध्यमांद्वारे जमीनीचा भाव विचारत आहेत.

'कलम ३७०' आणि 'कलम ३५ अ' रद्द झाल्यानंतर प्रोपर्टी बाजारात उत्साह दिसून येत आहे. मात्र, सध्या परिस्थिती आणि काश्मिरमधील जनजीवन सुरळीत सुरू होण्याची प्रतीक्षा साऱ्यांना आहे. प्रोपर्टी डिलर्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मुंबई, लखनऊ, दिल्ली आदी शहरांतून जमीन खरेदीसाठी विचारणा होत आहे.

स्थानिक जमीनी विकण्यास इच्छुक

पूर्वी जमिनीची खरेदी विक्री बंद असल्याने या भागातील अनेक नागरिकांना आपल्या जमीनी विकता येत नव्हत्या मात्र, कलम हटल्यानंतर अनेकजण आपल्या जमीनींचे व्यवहार करण्यासाठी इच्छुक आहेत. या कारणामुळे जमीनीचे भाव वाढत आहेत. अनेकजणांनी व्यवहाराची तयारी दर्शवली असली तरीही सध्या या भागातील व्यवहार ठप्प असल्याने साऱ्यांना जनजीवन सुरळीत सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. सर्व परिस्थिती निवळल्यावर पुन्हा नव्याने जागेचे भाव ठरवले जाणार आहेत.

२ बीएचके ४५ ते ६० लाखांत

जम्मूमध्ये रिकामी जागा मिळणे कठीण असल्याचे प्रोपर्टी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, १ बीएचके ते ४ बीएचके फ्लॅट्स सहज उपलब्ध होऊ शकतात. येथील २ बीएचकेची किंमत साधारणतः ४५ ते ६० लाख इतकी आहे. ४ बीएचके घराची किंमत १ कोटींहून अधिक सांगितली जात आहे.

भारत-पाक सीमेकडील राज्यांमध्ये जमिनीसाठी वेगळे माप

भारत-पाक सीमेकडील राज्यांमध्ये 'मरला' हे जमिन मोजण्यासाठी एकक मानले जाते. २७२ चौरस फूट इतकी जमीन म्हणजे एक मरला आहे. दळणवळण आणि अन्य सोयी सुविधांच्या आधारे प्रत्येक ठिकाणचे भाव वेगवेगळे आहेत. त्यामुळे जमीनी खरेदीचा व्यवहार करताना दोन्ही बाजूने पडताळणी करण्याचा सल्ला इथल्या व्यापाऱ्यांनी दिला आहे.