हरपलेले सामाजिक भान...

    दिनांक  09-Aug-2019 19:04:47   सामाजिक आणि नैसर्गिक संकट निर्माण झाले की, समाजाचे वर्तन कसे असते, यावरून सामाजिक भान दृष्टीपथात येत असते. नाशिकमध्ये या हरपलेल्या सामाजिक जाणिवांचे नुकतेच दर्शन घडले. गेल्या रविवारपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परिणामस्वरूप गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला महापूर आला. प्रत्येक पावसाळ्यात गोदावरीला किमान एक पूर येणे, ही प्रतिवर्षी घडणारी घटना. तरीही याबाबत उत्सुकता असणे हे अगदी स्वाभाविक. मात्र, पूर पाहण्यासाठी आपण नेमके सामाजिक भान आणि नागरिक म्हणून असलेले आपले कर्तव्य यांना तिलांजली तर देत नाहीना, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. यावेळी गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी अनेक हौशी आबालवृद्धांसह होळकर पुलावर दाखल झाले. मात्र, या सर्व हौशी मंडळींनी आपली चारचाकी आणि दुचाकी वाहने पूल आपलीच मालमत्ता असल्याचे समजून पुलावरच उभी करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे पंचवटी ते रविवार कारंजा यांना जोडणारा एकमेव खुल्या मार्गावर अभूतपूर्व अशी कोंडी निर्माण झाली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेची वाहने, पोलीस वाहने आणि खरोखरच कामानिमित्त एवढ्या पावसातही बाहेर पडलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सोसावा लागला. तसेच, काही हौशी युवकांनी पुरात कोण चांगले पोहतो, हे पाहण्यासाठी रौद्ररूप धारण केलेल्या गोदापात्रात उड्या घेतल्या. त्यात एक युवक वाहून गेल्याची घटना घडली. तर, सेल्फीप्रेमींनी बंदी असतानादेखील कठड्यावर उभे राहत सेल्फी काढणे चुकविले नाही. काही युवक चालू दुचाकीवर मागे उभे राहून सेल्फी, शूटिंग आणि पूर पाहण्यात मग्न असल्याचे दिसून आले. आपण नेमके काय आणि कसे वर्तन करत आहोत, याचेच भान काही नाशिककर यावेळी विसरले होते. होळकर पुलाला १०० वर्ष लोटली आहेत. त्यावर मार्गस्थ होणारी वाहने, उभी असणारी वाहने, असंख्य नागरिक यांचा भार आणि खालून वेगवान पाण्याचा प्रवाह यांचा मारा अशा स्थितीत होळकर पूल असताना त्यावर गर्दी करणे, हे एखाद्या दुर्घटनेला आमंत्रण ठरले असते, याचे भान राखणे आवश्यक होते.

 

दर्शन सामाजिक ऐक्याचे...

 

गोदावरीला आलेल्या पुरात जिथे सामाजिक भान हरपल्याचे दर्शन घडले, काही ठिकाणी मुद्देमालावर हात साफ करण्याच्या देखील घटना जिथे घडल्या, तिथे सामाजिक ऐक्याचे दर्शनदेखील झाले. अशा स्थितीत एकमेकांना आधार देणे, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, अशा नागरिकांना कोणतीही ओळख नसताना आपल्या घरात आश्रय देणे, विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अन्न, वस्त्र दान करणे यांसारखी सामाजिक सलोखा दर्शविणारी अनेक उदाहरणे नाशिक शहर आणि जिल्ह्यात आढळली. तर, पुराच्या प्रवाहाबरोबर वाहून येत असलेल्या एका युवकाला उपस्थित नागरिकांनी व्हिडिओ काढण्यात मग्न न होता, मिळेल त्या साधनाची दोरी बनवत बाहेर काढल्याचेदेखील दिसून आले. प्रशासनाच्या माध्यमातूनदेखील गोदावरी पात्रात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची वेळोवेळी माहिती देण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढण्यापूर्वी अनेक कुटुंबांचे स्थलांतरण करणे शक्य झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी होळकर पुलावर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात मोलाची भूमिका यावेळी बजावली. तसेच पूरग्रस्तांपर्यंत नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी पुरविले. अनेक महिलांनी घरातून पोळी-भाजी बनवून देत अडचणीत असलेल्या नाशिककर बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत माणुसकीचे दर्शन यावेळी घडविले. नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना यांनी एकत्र येत, एरंडवाडी, गंगावाडी, मल्हार खाण या भागातील नागरिकांना नाश्ता आणि जेवण पुरविण्याचे कार्य केले. पूर ओसरल्यावर घरी दाखल झालेल्या नागरिकांची घराची अवस्था मोठी भीषण होती. सर्वत्र चिखल आणि गाळ यांचे साम्राज्य पसरलेले होते. अशावेळी काही सामाजिक संस्थांनी घरी दाखल झालेल्या पूरग्रस्तांना जेवण आणि पिण्याचे पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात मोठी भूमिका बजावल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून आले. एका बाजूला जिथे काही नागरिकांनी पूरस्थितीत सामजिक उपद्रव मांडत पोलीस आणि प्रशासन यांची डोकेदुखी वाढविल्याचे चित्र होते, तेथे दुसऱ्या बाजूला नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यास आणि त्यांना मायेची ऊब देण्याचे कार्य करण्यात स्वतःला झोकून दिल्याचेदेखील पाहावयास मिळाले.