अस्मानी संकटात गोदाकाठ

    दिनांक  09-Aug-2019 22:30:14   



गोदावरी नदीच्या किनारी वसलेले तीर्थक्षेत्र नाशिक. या आठवड्यात गोदाकाठ सर्वात जास्त चर्चिला गेला, तो गोदावरीला आलेल्या पुरामुळे. नाशिकमधील काही जाणकारांच्या मते अनेक वर्षानंतर गोदावरी नदीने हे रौद्ररूप धारण केले होते.


गोदावरीला पूर आला की, बातम्यांमध्ये आणि नागरिकांच्या ओठावर कायम चर्चा असते ती, दुतोंड्या मारुती किती पाण्याखाली गेला याचीच. मात्र, त्या पलीकडेदेखील पुराची भीषणता दर्शविणारा जिल्ह्याचाच भाग आहे. गोदावरीच्या पाण्याने ज्या सायखेडा, चांदोरी, निफाड, लासलगाव आदी गावांत शेती समृद्ध झाली आहे, अशा गावांसाठी गोदावरीचा पूर हा एक शाप ठरत असतो. जीवनदायिनी असणारी गोदावरी पावसाच्या दिवसात या गावांसाठी अडचण निर्माण करणारी ठरते. मागील आठवड्यात झालेल्या पावसातदेखील हीच स्थिती या गावांची पाहावयास मिळाली. नाशिक जिल्ह्यातील पूरस्थितीचा विचार केला असता जेव्हा म्हणून कधी गोदावरीला पूर आला असेल तेव्हा जिल्ह्यातील सायखेडा आणि चांदोरी या गावांची चर्चा सर्वप्रथम झालेली पाहावयास मिळाली आहे. यंदाचा पूरदेखील त्याला अपवाद नव्हता. नेहमी डौलदार पिकांनी आपले लक्ष वेधून घेणारी ही गावे पुराच्या काळात मात्र बेटाचे स्वरूप धारण करत असतात. वास्तविक गोदामाईच्या कुशीत असल्यामुळे या गावांना संपन्नतेचे मोठे वरदान लाभले आहे. कृषी हा मुख्य व्यवसाय असणारे सायखेडा आणि चांदोरी ही गावे ३२ पेक्षा जास्त गावांची बाजारपेठ म्हणून ओळखली जातात. तसेच, ही दोन्ही गावे गोदावरीच्या ऐल आणि पैल तीरावर वसलेली आहेत. त्यामुळे गोदावरीला पूर आला की, या दोन गावांना गोदावरीचे पाणी कवेत घेत होत्याचे नव्हते करून टाकते. आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात वाढ झाली. आणि सातत्याने पाऊस पडत असल्याने सायखेड्याला जोडणारा पूल रात्रीच्या सुमारासच पाण्याखाली गेला. यावेळच्या पुरात नदीकाठी असलेल्या सायखेडा, चांदोरी, चाटोरी, शिंगवे, करंजगावमधील काही भागांत पाणी गेले. यामुळे नागरिकांच्या शेतीचे, घरांचे, वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथे निर्माण होणारी स्थिती ही दरवर्षीची असली तरी, यावर्षी मात्र येथील पूरस्थितीने रौद्र रूप धारण केले होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

या सर्व स्थितीत घटना घडून गेल्या की, जाग येते ते प्रशासन, अशी कायम ओरड केली जाते. मात्र आता प्रशासनाने कमालीची सजगता दाखवत येथे मदतकार्य हाती घेतले. यावेळी सायखेड्याची स्थिती इतकी विदारक होती की, गावात असणाऱ्या बाजारतळावर पुराचे पाणी आले होते. नदीकाठावरील हेमाडपंथी मंदिरेदेखील बुडाल्याचे दिसून आले, तर चांदोरी येथील खंडेराव मंदिरदेखील पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पूलदेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे सायखेडा आणि परिसरातील अनेक गावांचा नाशिक शहराशी संपर्क तुटलेला होता. कारण, सायखेडा पूल वगळला तर या गावांना नाशिककडे येण्यासाठी पर्यायी मार्गच नाही. जे आहेत, तेही पाण्याखाली होते. नाशिक सायखेडा त्रिफुलीही यंदा पाण्यात होती. या पाण्यामुळे नाशिक-औरंगाबाद महामार्गालाही फटका बसला. हीच अवस्था शिंपी टाकळी, नागापूर, चाटोरी, करंजगाव, शिंगवे या गावांचीही होती, या गावांच्या घराघरात यंदा गोदामाई राहून गेली. अनेकांची या पुरातून सहीसलामत सुटका करण्यात आली. जीवितहानी फारशी झालेली नसली, तरी शेतीचे आणि स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. चाटोरी, सायखेडा, चांदोरी या परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय विस्तारला आहे. नाशिकपासून जवळ असल्याने आणि वाहतुकीचा सर्व साधने उपलब्ध असल्याने या उद्योगाला सुगीचे दिवस आहेत. मात्र, पुराने या वीटभट्ट्यांना मोठा फटका बसला. यंदा आलेल्या पुरामुळे शेतीसह वीटभट्ट्यांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाला की, नाशिक शहराला पुराचा सामना करावा लागतो. मात्र या गावांना केवळ गोदेच्याच नव्हे तर दारणा नदीच्या पाण्याचादेखील सामना करावा लागतो. इगतपुरीच्या डोंगरांवर दारणा नदीचा उगम होत असल्याने आणि हा प्रदेश पर्जन्यबहुल असल्याने दारणा नदीत पावसाळ्यात मोठा जलप्रवाह असतो. तसेच जेव्हा त्र्यंबकेश्वर, नाशिक परिसरात जोरदार पाऊस होतो आणि गोदावरीला महापूर येतो, त्यावेळी दारणेच्या उगमस्त्रोतावरही जोरदार पाऊस असतो आणि त्यामुळे दारणादेखील पुराच्या पाण्याने समृद्ध असते. गोदावरीचे पाणी नाशिक शहरात शिरते, पण दारणा शहराच्या बाहेरून वाहत दारणा सांगवी या लहानशा गावाजवळ गोदावरीला मिळते. या दोन्ही नद्यांचे पाणी जेव्हा एकत्र येते, तेव्हा त्यापुढेही गोदाकाठावरील सर्व गावांचे अक्षरश: बेटात रूपांतरण होत असते. दारणेच्या या पाण्याचा सांगवी, शिंपी टाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे आणि करंजगाव या गावांना मोठा फटका बसतो. शहरी भागातील नुकसान किती घरांमध्ये पाणी शिरले यावरून मोजतात. पण ग्रामीण भागात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची तीव्रता घरात पाणी शिरण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे आणि याकडे कायमच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असते. दारणा सांगवी या गावापासून ते करंजगावपर्यंत हजारो हेक्टर शेतीला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसाच्या पाण्यामुळे पिके वाहून जाणे, जमिनीची क्षारता वाढणे, शेतीत पायदेखील ठेवता येणार नाही, इतका चिखल साचणे आदी समस्या निर्माण होतात. आधीच विविध समस्यांचा सामना करत असलेले या भागातील शेतकरी अशा अस्मानी संकटाने अधिकच खचण्याची शक्यताच जास्त असते. त्यामुळे कवी कुसुमाग्रजांच्या 'कणा' कवितेतील गोदामाई पाहुणी म्हणून येते आणि खरोखरंच सगळे काही आपल्या कवेत घेऊन जाते. याची भीषणता नाशिक शहर आणि जिल्ह्याने यंदाच्या पुरात पुरेपूर अनुभवली आहे.