गोमांस तस्करी करणाऱ्यांना अटक

    दिनांक  08-Aug-2019 16:06:19
 


मुंबई : रायगडमध्ये पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गोमांसाची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहीती रायगड पोलीसांना मिळाली. त्यानंतर छापा टाकत केलेल्या कारवाईत तीन टन गोमांस ताब्यात घेत एकूण १४ लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला.

 

गोवंशीय प्राण्यांची बेकायदा कत्तल करून, हे मांस वाहनांतून बेकायदा वाहतूक करून ते नवी मुंबई, मुंबई या शहरांत विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे माहिती रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांना मिळाली. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

 

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सावरोली टोलनाका येथे एका टेम्पोतून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान हे मांस कोल्हापूरहून बेकायदा कत्तल करून आणल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करत शफिक मोह्द्दिन बेपारी (४५) आणि शरद संपत देसाई (३४) यांना अटक केली आहेत. दोन्हीही आरोपी मुळचे कोल्हापूर येथील राहणारे आहेत.