पाकी डॉक्टरांना 'चले जाव'

    दिनांक  08-Aug-2019 22:59:14   


 


नुकतेच सौदी अरेबियाने आपल्या देशात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी डॉक्टर्सना 'चले जाव'चा आदेश दिला. हे सर्वच डॉक्टर 'एमएस' आणि 'एमडी' ही वैद्यकीय पदवी घेतलेले आहेत. मात्र, सौदीने पाकिस्तानात दिले जाणारे वैद्यकीय शिक्षण शेकडो वर्षांपूर्वीचे जुनाट आणि कालबाह्य असल्याचे म्हटले.


'पाकिस्तान म्हणजे काय?' असा सवाल कोणालाही विचारला तर काय उत्तर असेल? तर नक्कीच समोरची व्यक्ती म्हणेल की, धर्मांध व मागासलेल्या प्रथा-परंपरा-रुढींना कवटाळून बसलेला, इस्लामपलीकडेही जग असल्याचे नाकारत आलेला, भारतद्वेषाच्या पायावर जन्माला आलेला आणि पोसलेला, दहशतवादाच्या सैतानी पिलावळीला पैदा करणारा, अल्पसंख्य हिंदू-शीख समुदायावर अन्याय-अत्याचार करणारा, भारतीय भूभाग बळकावणारा, बलुची, पख्तुनी, सिंधी नागरिकांवर जरब बसवणारा, त्यांना दडपणारा देश म्हणजे पाकिस्तान! पण, पाकिस्तानची एवढीच एक ओळख आहे का? तर नाही, पाकिस्तानची आणखीही मोठी ओळख आहे, जी त्या देशाने गेल्या ७२ वर्षांत स्वकर्तृत्वाने कमावली. आज जगभर पाकिस्तान या ओळखीमुळेही गाजतो आणि चर्चिला जातो. कोणती ही ओळख? तर कंगाल, दिवाळखोर आणि उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर वेगाने घोडदौड करणारा देश म्हणजे पाकिस्तान! तसेच बिकट आर्थिक संकटातून वाचण्यासाठी देशोदेशी जाऊन भीक मागणारा देश म्हणजे पाकिस्तान! परंतु, कोणीही थारा न दिलेला नि जगभरातून लाथाडला गेलेला देश म्हणजे पाकिस्तान! आता याच पाकिस्तानला त्याचा 'धर्मबंधू' म्हणता येईल, अशा सौदी अरेबियाने जोरदार झटका दिला. ज्यामुळे आधीच कवडी कवडीसाठी मोहताज झालेल्या आणि बेरोजगारीचा, महागाईचा उच्चांक गाठलेल्या पाकिस्तानची शिक्षणव्यवस्थाही बोगस असल्याचे समोर आले.

 

नुकतेच सौदी अरेबियाने आपल्या देशात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी डॉक्टर्सना 'चले जाव'चा आदेश दिला. हे सर्वच डॉक्टर 'एमएस' आणि 'एमडी' ही वैद्यकीय पदवी घेतलेले आहेत. मात्र, सौदीने पाकिस्तानात दिले जाणारे वैद्यकीय शिक्षण शेकडो वर्षांपूर्वीचे जुनाट आणि कालबाह्य असल्याचे म्हटले. शिवाय पाकिस्तानात हे शिक्षण देतेवेळी विद्यार्थ्यांना प्रयोगात्मक प्रशिक्षणाचा अभाव असल्याचेही सौदीने सांगितले. म्हणजेच सौदीच्या मते पाकिस्तानातून वैद्यकीय शिक्षणाच्या नावाखाली पढतमूर्ख तयार केले जातात, ज्यांना प्रात्याक्षिक ज्ञान काहीही नसते. अशा डॉक्टर्सचा रुग्णालयात, दवाखान्यात, सरकारी इस्पितळात काहीही उपयोग नाही, अशी सौदीची भूमिका आहे. म्हणूनच आता सौदी अरेबियाने अशा सर्वच पाकिस्तानी डॉक्टर्सना पिटाळण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, सौदी अरेबियाच्या या निर्णयानंतर त्याचा प्रभाव आखातातील अन्य देशांवरही पडला. परिणामी, आता संयुक्त अरब अमिराती, कतार, बहारीनसहित इतर देशांनीही आपल्या इथे कार्यरत असलेल्या पाकिस्तानी डॉक्टरांना देश सोडायला सांगितले. दुसरीकडे पाकिस्तानी वैद्यकीय पदवीला अमान्य करणार्‍या सौदी अरेबिया व आखातातील देशांनी भारतीय वैद्यकीय पदवीला मात्र वैध मानले आहे. तसेच यात इजिप्त, सुदान आणि बांगलादेशातील वैद्यकीय पदवीलाही मान्यता दिली.

 

जम्मू-काश्मीर, कलम ३७० वरून जळफळाट होत असलेल्या पाकिस्तानची सौदीने भारतीय वैद्यकीय पदवी स्वीकारल्याने चांगलीच आग आग होत असेल. कारण, भारताचे कुठे काही चांगले होत असले की, पहिले दुखणे पाकिस्तानात चालू होते. आताही तसेच झाले असावे. एका डॉक्टरने त्याचा दाखलाही दिला. पाकिस्तानची वैद्यकीय पदवी नाकारल्याने व भारताची वैद्यकीय पदवी स्वीकारल्याने हा निर्णय आमच्यासाठी लाजिरवाणा असल्याचे या डॉक्टरने म्हटले. शिवाय जम्मू-काश्मीरवरील भारताच्या ठोशाने न सावरलेल्या पाकिस्तानला आणखी एक चपराक इस्लामी देशांनीच लगावली, हे इथे लक्षात घेण्याजोगे. दरम्यान, सौदी अरेबिया व इतरांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता पाकिस्तानातील बेरोजगारीत आणखी वाढ होईल. कारण हे सर्वच डॉक्टर आता बेरोजगार होतील व पाकिस्तानात येतील किंवा त्यांना त्या त्या देशातून हाकलून दिले जाईल. सोबतच त्यामुळे अर्थसंकटाच्या गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला यामुळे मोठे नुकसान सोसावे लागेल. पाकिस्तानच्या 'असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी फिजीशियन अ‍ॅण्ड सर्जन्स'चे प्रवक्ते डॉ. असद नूर यांनी याबाबत सांगितले की, "हा पाकिस्तानसाठी झटका तर आहेच, पण डॉक्टरांची नोकरी जाण्याने तिकडून मायदेशात पाठवले जाणारे परकीय चलनही आटेल." म्हणजेच पाकिस्तानवर दुहेरी संकट कोसळल्याचे दिसते. तसेच पाकिस्तानातील शिक्षणपद्धतीवर कोणी विश्वास ठेवावा की नाही, हा प्रश्नही यामुळे निर्माण होतो. अर्थात, इस्लामी देश असल्याने दहशती मदरसे वगैरे चालवण्याचीच पात्रता असलेला देश आधुनिक शिक्षण कसे देऊ शकतो म्हणा?