१७९ रुपये पगार ते ३० कोटींचा व्यवसाय

    दिनांक  08-Aug-2019 23:14:44   फक्त प्राण्यांचं औषध मिळणारं हे मुंबईतील एकमेव औषध दुकान. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा कळतं 'हे' दुकान एका मराठमोळ्या माणसाचं आहे. त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ पाटील.


बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल. केईएमच्या बाजूला असलेलं प्राण्यांचं इस्पितळ. पारशी समाजाची सेवाभावी संस्था हे इस्पितळ चालवते. अगदी नीटनेटकं आणि निसर्गरम्य परिसरातलं हे इस्पितळ १८७४ मध्ये बांधलं गेलं आहे. १४५ वर्षे जुनं असलेलं हे इस्पितळ प्राण्याचं आहे, हे जरासुद्धा वाटत नाही कारण, येथील कमालीची स्वच्छता. गायीचा गोठा आणि घोड्याच्या पागा असूनसुद्धा शेणाचा वास अजिबात जाणवत नाही. माणसाच्या इस्पितळांपेक्षा हे इस्पितळ स्वच्छ आहे. या इस्पितळाच्या आवारात आल्यावर ब्रिटिशकालीन इमारती लक्ष वेधून घेतात. आणि सोबतच लक्ष वेधून घेतं ते आवारात शिरल्यानंतर दिसणारं 'गुडमन केमिस्ट' नावाचं औषधांचं दुकान. फक्त प्राण्यांचं औषध मिळणारं हे मुंबईतील एकमेव औषध दुकान. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा कळतं हे दुकान एका मराठमोळ्या माणसाचं आहे. त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ पाटील.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधलं नरेवाडी हे छोटंसं गाव. मच्छिंद्रनाथ दहावी शिकून १९७९ साली मुंबईत आले. गावच्या ओळखीमुळे एका औषधाच्या दुकानात कामाला लागले. दोन वर्षे नोकरी केल्यामुळे आलेली औषधाची जाण आणि ग्राहकांसोबतचा आपुलकीचा संवाद यामुळे मच्छिंद्रनाथांना दुसर्या दुकानातून नोकरीचा प्रस्ताव आला. तिथे ११ वर्षे काम केल्यानंतर स्वत:चं औषधाचं दुकान सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १९८९ साली परळच्या गुरुराणी चौकात अगदी छोट्याशा खोलीत 'गुडमन केमिस्ट'चा जन्म झाला. केईएम बाजूलाच असल्याने अनेक रुग्ण येथे औषध घ्यायला येत. पण, मजेशीर बाब म्हणजे बाजूलाच प्राण्यांचं इस्पितळ असल्याने अनेक ग्राहक प्राण्यांचं औषध घ्यायला तिकडेच येत. या ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेऊन मच्छिंद्रनाथांनी प्राण्यांची औषधे ठेवण्यास सुरुवात केली. प्राणीप्रेमींमध्ये दुकानाची ख्याती वाढली. त्यामुळे 'गुडमन केमिस्ट' हे गुरुराणी चौकातील दुकान फक्त प्राण्यांच्या औषधांसाठीच आरक्षित केलं. माणसांचं औषध विकण्यासाठी श्रद्धा मेडिकल सुरू झाले. घाऊक दरांत प्राण्यांची औषधे मिळणारं मुंबईतील एकमेव ठिकाण, असा 'गुडमन'चा नावलौकिक वाढला. दरम्यान मच्छिंद्रनाथांचा मुलगा विशाल याने 'फार्मसी' विषयातून पदवी मिळवली. शाळेत शिकत असल्यापासून विशाल दुकानात जाई. बाबांना दुकानात मदत करे. त्यामुळे औषधांची, विशेषत: प्राण्यांच्या औषधांची नावे त्यास तोंडपाठ झाली होती. कोणत्या प्राण्यास कोणत्या आजारासाठी कोणतं औषध द्यावं, याचं अचूक ज्ञान विशालला आहे. या विषयाची लहानपणापासूनच आवड असल्याने त्याने यातच आपलं शिक्षण पूर्ण केलं. विशाल व्यवसायात आल्यानंतर व्यवसाय विस्तारला.

 

उंट हा प्राणी अरबांसाठी जीव की प्राण. मुंबईत औषधोपचारासाठी आलेला अरब एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबे. उंटांचं औषध कुठे मिळतं, असं एका अरबाने एका कारचालकास विचारले. त्या ड्रायव्हरला 'गुडमन केमिस्ट' ठाऊक होतं. तो अरबाला तिथे घेऊन आला. अशाच तीन-चार अरबांनी दुकानाला भेट दिल्यानंतर त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी विशाल कामचलाऊ अरबी शिकला. त्यांच्यासोबत अरबी भाषेतून संवाद साधू लागला. त्यातून एक अरबी तरुण विशालचा चांगला मित्र झाला. त्याने विशालला युएईला निमंत्रित केले. त्या मित्राच्या सहकार्यामुळे तिकडच्या उंटांसाठी औषधे आता विशालच्या दुकानातून जातात. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, म्हैसूर, दिल्ली अशा भारतातील जवळपास सर्वच रेसकोर्सचे घोडे, भारतातील ४२ स्टडफार्मस, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राणी जिजामाता उद्यान अर्थात राणीची बाग, आरे येथील बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज, पीएड्ब्ल्यूएस, जैन जिवदया या संस्थेच्या सर्वच प्राण्यांना 'गुडमन केमिस्ट' औषधे पुरविते. वितरणासोबतच 'इन-व्हिक्ट्स' नावाचा प्राण्यांच्या औषधांचा ब्रॅण्डदेखील विशालने विकसित केला आहे. 'इन-व्हिक्ट्स'च्या प्रवासात विशाल पाटील यांना ऋषिकेश दळवी यांनी मोलाची साथ दिलेली आहे. लवकरच या औषधांची निर्मिती करणारा कारखाना आकारास येणार आहे. आज ही औषधे संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका आणि थायलंड या देशांत निर्यात होतात. प्राण्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणार्‍या साधनसामुग्रीचा कारखाना तयार करण्याचा मानस विशाल पाटील यांचा आहे.

 

मच्छिंद्रनाथ पाटील हे जेव्हा एका औषधांच्या दुकानात नोकरीस होते, तेव्हा त्यांना १७९ रुपये पगार होता. आपला पगार १० हजार रुपये इतका झाल्यानंतर कोल्हापूरला जाऊन कायमचं राहायचं, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. मित्रमंडळी आणि नातलगांकडून कर्ज घेऊन दीड लाख रुपयांच्या भांडवलावर 'गुडमन केमिस्ट' सुरू झालं. आज या संपूर्ण उद्योगसमूहाची उलाढाल ३० कोटी रुपयांच्या आसपास आहे. ५२ कर्मचारी या समूहात कार्यरत आहेत. परळच्या प्राणी इस्पितळ आवारातील दुकान विशाल पाटील यांच्या पत्नी प्रनल पाटील यांच्या देखरेखीखाली उत्तम वाटचाल करत आहे. प्रत्येक वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी प्राण्यांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन गुडमन केमिस्ट करते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी परिसरांतून शेकडो प्राण्यांची या दिवशी मोफत तपासणी होते. यंदादेखील हे शिबीर मोठ्या स्वरूपात होणार आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि माणसांचं व्यवस्थापन ज्या उद्योजकाला जमते, तो उत्तम उद्योजक ठरतो. विशाल मच्छिंद्रनाथ पाटील यांचे 'गुडमन केमिस्ट' याचे उत्तम उदाहरण आहे. कोणत्याही मराठी तरुणास उद्योगात यायचं असेल, उद्योजक म्हणून घडायचं असेल, तर अशा इच्छुकांना उद्योजकीय मार्गदर्शन करण्यास विशाल पाटील तत्पर आहेत. या तरुणांनी आपल्यासोबत संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.