भारतीय स्त्रीप्रतिमेचे मूर्तिमंत

    दिनांक  07-Aug-2019 20:00:55


 


स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या भारतीय स्त्रीप्रतिमेच्या सुषमाजी मूर्तिमंत उदाहरण होत्या. नव्वदीच्या दशकात लोकप्रिय झालेल्या सुषमाजी मोदी युगातही तितक्याच लोकप्रिय राहिल्या, त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे...


संसदेत जेमतेम प्रतिनिधी. राजकीय पक्ष राजकारणाच्या पटलावर अस्पृश्य समजला जाणारा. एका बाजूला इंदिरा, राजीव, नरसिंहराव अशा मातब्बर नेत्यांची गर्दी आणि त्यांच्या हाती असलेली एकहाती सत्ता आणि दुसऱ्या बाजूला अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे नव्याने आकाराला येत असलेले सहकारी. सुषमा स्वराजही त्यातल्याच. हे अवघड असते. समोर सत्तेची साठमारी सुरू असायची, सत्तेचे उन्मत्त हत्ती एकमेकांवर आदळत असायचे आणि दुसऱ्या बाजूला, 'एक देश मे दो निशान...' सारख्या घोषणा घेऊन मूल्यांचे राजकारण करण्याच्या आग्रहावर ठाम असलेली जी काही मंडळी या राष्ट्राने पाहिली, त्यात सुषमा स्वराज यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. नियतीच्या मनात काय होते ठाऊक नाही, ज्या ३७० कलमाच्या विरोधात या राजकीय कार्यकर्त्यांनी तहहयात संघर्ष केला, त्या संघर्षाची सांगता अत्यंत नाट्यमय पद्धतीने होताना त्यांनी पाहिले आणि जगाचा निरोप घेतला. समोर सत्तेचे पाशवी बळ असताना केवळ आपले वक्तृत्व, व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व यांच्या बळावर सुषमा स्वराज यांनी भारतीय जनमानसाचे मन जिंकले. सुषमाजींचे व्यक्तित्व होतेच तसे. ठसठशीत कुंकवाने सजलेला भालप्रदेश, डोक्यावरच्या भागांत भरलेला सिंदूर, हलक्या रंगाची गोल साडी आणि या सगळ्याला साजेशी मृदूवाणी. वाणी मृदू असली तरी ती योग्य त्यावेळी प्रखर व्हायची. स्वर उंचवायचा आणि सर्वस्वी मृदू वाटणारी ही मातृस्वरूपा भुवया ताणून डरकाळ्या फोडायला लागायची. विदेश मंत्री म्हणून सुषमाजींची कारकीर्द चांगलीच गाजली. या संपूर्ण मंत्रालयाचा तोंडवळाच त्यांनी बदलला. दूरदेशी पोटापाण्यासाठी पोहोचलेला भारतीय. त्याला सतावणाऱ्या अनंत अडचणी. भारतीय दूतावासात पोहोचला तर त्याला तिथे आधार मिळेलच, असा विश्वास नाही. हा विश्वास जागविण्याचे आणि दृढ करण्याचे काम सुषमाजींनी केले. आज इंटरनेट वापरणारी पिढीही सुषमाजींच्या तत्परतेचे स्मरण करताना त्यांच्या आठवणी सांगताना थकत नाही. इंटरनेटच्या जगात त्यांच्याविषयीच्या या आठवणींनी हा आठवडाच भारून जाईल.

 

पासपोर्ट हरवलेले, वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा अडकलेले असे कितीतरी लोक त्यांनी घेतलेल्या तत्पर दखलीमुळे कसे बचावले, हे सांगत असतील. अत्यंत सन्मानजनक पद्धतीने राजकारणातून पायउतार झालेल्या सुषमा स्वराज भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या त्यामुळे. देशोदेशीचे राजदूत आणि प्रमुख त्यांना श्रद्धांजली वाहतीलच, पण त्याचबरोबर जनसामान्यांच्या मुखातून त्यांच्याविषयी ज्या भावना व्यक्त होत आहेत, तसे नशीब राजकारणात फार थोड्या लोकांना लाभते. वयाच्या २५व्या वर्षी सुषमा स्वराज पहिल्यांदा हरियाणातून निवडून आल्या आणि कॅॅबिनेट मंत्रीही झाल्या. जनसंघ ते भाजप अशा मोठ्या प्रवासाच्या त्या सहप्रवासी होत्या. त्यांच्या पक्षाने आणि विचारसरणीने जे काही जय-पराजय पाहिले, ते त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारले. संस्कृत आणि राज्यशास्त्र या विषयांत त्यांनी पदवी घेतली होती. सनातन धर्म महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले होते. सनातन धर्म महाविद्यालय हीच मुळात समजून घेण्याची संकल्पना आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश धाटणीच्या शैक्षणिक संस्थानांना जे भारतीय पर्याय उभे राहिले, त्यात सनातन धर्म महाविद्यालयाचे नाव घ्यावे लागेल. राज्यशास्त्रासारखा पाश्चिमात्त्य ज्ञानशाखेचा विषय आणि त्याला संस्कृतसारख्या सनातन विषयाची जोड, असा एक सुरेख मेळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण झाला. महाविद्यालयातले हे संस्कार त्यांना आयुष्यभर पुरले आणि त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्वही आकाराला आले. याच महाविद्यालयात त्यांना त्यांचा जीवनसाथीदेखील सापडला. स्वराज कौशल त्यांचे नाव. कौशलही सुषमांजींइतकेच सामाजिकदृष्ट्या सक्रिय होते. आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्या विरोधात जे खटले सरकारने भरले होते, त्यांच्या विरोधात न्यायालयात हे दाम्पत्य उभे राहिले. स्वराज मूळचे समाजवादी विचारांचे तर सुषमा हिंदुत्ववादी. मात्र, या दोन्ही विचारधारा एकाच घरात उत्तम नांदल्या. ज्यावेळी सुषमाजींनी सक्रिय राजकारणापासून निवृत्ती घेतली, त्यावेळी स्वराज कौशल यांनी अत्यंत नर्मविनोदीपणे मात्र जाहीररित्या त्यांचे आभार मानले होते. एक भावनिक पत्रही त्यांनी सुषमा स्वराज यांना लिहिले होते. मिल्खासिंग या जगप्रसिद्ध भारतीय धावपटूची तुलना त्यांनी आपल्या पत्रात केली होती. १९७७ पासून सुषमाजी एक मॅरेथॉन धावत आहेत आणि आता त्यांनी घेतलेल्या विश्रांतीचे त्यांनी कौतुकही केले होते. पण, नियतीच्या मनात काही निराळेच असावे.

 

सुषमाजींची दोन भाषणे आजही पुन्हा पुन्हा ऐकली व पाहिली जातात. एक आहे अटल बिहारी वाजपेयींच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केलेले आणि दुसरे आहे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेले भाषण. एका संसदेतल्या त्यांच्या भाषणात दुर्गा दिसते, तर शंकराचार्यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेल्या भाषणात सरस्वती. स्वातंत्र्योत्तर काळात आकाराला आलेली मध्यमवर्गीय भारतीय स्त्री जशी असेल, तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यानंतर आकाराला आलेल्या देशाच्या समस्या आणि गौरवास्पद वाटचाल त्यांच्या भाषणात झळकायची. सोमनाथ चॅटर्जींच्या नावावर त्यांनी संसदेत केलेली कोटी वाहव्वा मिळवून तर गेली होतीच, पण त्याचबरोबर त्यांच्यातल्या 'भारतीयत्व' जाणण्यातल्या आणि जगण्यातल्या गुणवैशिष्ट्याची प्रचितीही देऊन गेली होती. त्यांच्या चौकसभा गाजल्या आणि संसदेतील भाषणेही. त्या कठोर होत धारदार भाषेचा प्रयोगही करीत. मात्र, त्यांनी कुणावरही कधीही वैयक्तिक टीका केली नाही. त्यांच्या भाषणांचे मर्मज्ञ सदैव राष्ट्रहितच राहिले. एखादी व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या आधारवर स्वत:भोवतीचे वलय निर्माण करते. सुषमा स्वराज यांचेही तसेच होते. अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांच्यासारख्या दिग्गजांच्या सावलीत त्या कोमेजल्या नाहीत, तर उलट स्वत:मधील गुणांच्या आधारावर अधिक फुलून आल्या. लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजपची दुसरी पिढी निर्माण झाली. प्रमोद महाजन, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार ही अख्खी पिढीच्या पिढी भाजपमध्ये सक्रिय झाली. सुषमा स्वराजदेखील याच काळाच्या प्रतिनिधी होत्या. सुषमाजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी कायम स्मरणात ठेवल्या जातील. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय स्त्रीप्रतिमेचे त्या जिवंत उदाहरण होत्या.