जिनके सपनों मे जान होती हैं...

    दिनांक  06-Aug-2019 22:46:37   स्वत:पासून सुरू झालेल्या विकासाची प्रेरणा ही समाजोत्थानाचा केंद्रबिंदू झाली. नि:स्वार्थी प्रेरणेने केलेले काम समाजात पोचपावती मिळवतेच आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांताक्रुझच्या 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'चे काम. वस्तीतील लोकांसाठी शौचालय असावे, या जिद्दीने वस्तीतील काही युवक एकत्र आले आणि त्यांच्या समाजकार्याची महती वैश्विक स्तरावर पोहोचली.


मंजिले उन्ही को मिलती हैं,

जिनके सपनों मे जान होती हैं,

पंख से कुछ नही होता,

हौसलोंसेही उडान होती हैं।

'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'ची जिद्द आणि यश पाहून 'हौसलोंसेही उडान होती हैं' हे खरे वाटते. सांताक्रुझ मिलन सब-वेची 'ती' वस्ती. अगदी गावकुसाबाहेरच्या वस्तीसारखीच उपेक्षित, सर्वार्थानेच. कारण, वस्तीत राहणारे सगळेच गरीब, चतुर्थ श्रेणीत काम करणारे. वस्तीत अज्ञान आणि गरिबी भरून राहिलेली. वस्तीत शौचालयही नव्हते. तो काळ साधारण ३५ वर्षांपूर्वीचा. त्यावेळी या वस्तीतील किशोरवयीन मुलं शाळेत जायची. या काळात शौचालय नसल्यामुळे वस्तीतील लोक वस्तीच्या कडेला शौचाला जात. या तरुण मुलांनाही नाईलाजाने हेच करावे लागे. या मुलांना 'तिकडे' जाताना शाळकरी मुले दिसत. तेव्हा या तरुणांना मेल्याहून मेल्यासारखे होई. त्या उकिरड्यावर जर शौचालय बांधले तर? पण ते कसे शक्य होईल? तरीही दयानंद जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. अर्थात, वस्तीतल्या लोकांकडून त्यासाठी वर्गणी गोळा करण्यात आली. जयंतीमयंतीला वर्गणी देणाऱ्यांनी किंवा त्याकाळच्या पद्धतीनुसार वर्गणी काढून भाड्याने सीडी आणून चित्रपट पाहाणाऱ्यांनी शौचालयासाठी वर्गणी देताना मात्र साशंकता दाखवली. काय गरज आहे त्याची? हे काय नवीनच थेर ? अशा प्रकारच्या टीका-टिप्पणी होऊ लागल्या. मात्र, या किशोरवयीन मुलांनी धीर सोडला नाही. रस्त्यावर शौचास बसायला लागणाऱ्या लाजिरवाण्या गोष्टीपासून त्यांना सुटका हवी होती. त्यांनाही ताठ मानेने शाळेत जायचे होते. त्यांनी आपापल्या परीने घरातल्या लोकांना समजावले. आजूबाजूवाल्यांना समजावले. त्याचा परिणाम म्हणून तिथे शौचालय बांधण्यात आले. सुदैवच म्हणावे लागले की, त्यावेळच्या महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या प्रमुख सीमा रेडकर या नेहमी त्या रस्त्याने जात. त्या वस्तीची परिस्थिती त्यांना माहिती होती. अचानक वस्तीमध्ये हे शौचालय कोण बांधत आहे, याची त्यांना उत्सुकता वाटू लागली. त्यांनी शौचालय निर्मितीसाठी धावपळ करणाऱ्या त्या किशोरवयीन मुलांची भेट घेतली. त्यांचा उत्साह आणि त्यांची जिद्द पाहून रेडकर यांनी या मुलांना महानगरपालिकेतर्फे शौचालय निर्मितीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि ते तडीसही नेले.

शौचालय निर्मिती म्हणजे मुलांच्या आयुष्याच्या जडणघडणीचा काळच म्हणावा लागेल. या काळातच त्या मुलांचा महानगरपालिका, प्रशासन, शासकीय योजना, त्यांची अंमलबजावणी यांच्याशी घनिष्ठ संबंध आला. त्यामुळे हे शौचालय निर्माण झाले. मात्र, त्याचे स्वरूप नुसते शौचालय न राहता ते समाजकेंद्रच झाले. शौचालयाची अंतर्गत आणि बाह्यबांधणी ही विज्ञान आणि वस्तुनिष्ठ होती. ही मुलं दररोज एकत्र तर येत होतीच. त्यातूनच त्यांनी मित्रमंडळ तयार करण्याचे ठरवले आणि मित्रमंडळ स्थापन झाले, 'त्रिरत्न प्रेरणा मंडळ.' या मंडळातर्फे शौचालयासोबतच अनेक उपक्रम सुरू करण्यात आले. खाली शौचालय आणि वर वस्तीतल्या लोकांसाठी विविध योजनांची कार्यवाही असा कार्यक्रम सुरू झाला. या उपक्रमाबाबत दयानंद जाधव म्हणतात की, 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'स मिळालेला मुंबई महानगरपालिकेचा 'वस्ती स्वच्छता कार्यक्रम' म्हणजे वस्तीसाठी बांधून दिलेल्या शौचालयाची देखरेख सीबीओ म्हणून करणे, असा होय. या शौचालयाची देखरेख, देखभाल करताना पालिकेच्या विशेष कार्य अधिकारी सीमा रेडकर यांनी आम्हाला समाजसेवेचे बाळकडू पाजले. याची सुरुवात विभागातील कचरापेट्यांचे व्यवस्थापन करण्यापासून झाली आणि बघता बघता महिलांचे बचत गट, त्यांचे प्रशिक्षण, त्यांना स्वयंरोजगार या सोबतच शौचालयाच्या सक्षमतेसाठी विविध प्रयोग सुरू होते. यातील यशस्वी प्रयोग म्हणजे शौचालयाला बसविण्यात आलेले सोलर एनर्जी पॅनेल आणि स्वच्छतेच्या कामासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे व्यवस्थापन! हे आणि इतर कार्यक्रम करीत असतानाच झोपडपट्टी विभागात राहत असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी काही करावे, असे मनात येत होते. म्हणून शौचालयाच्या वरील भागात संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. महापालिकेतील विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात रुची वाढावी म्हणून 'मोफत अभ्यासिका' शौचालयाच्या वरील मजल्यावर सुरू केली. झोपडपट्टीमध्ये शौचालय उभारणी आणि सीबीओ सक्षमीकरणाची कामं करीत असताना, झोपडपट्टी भागात राहून आपले नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदविणाऱ्या काही तरुणांच्या संपर्कात आलो. चर्चांमधून त्यांची मनं मोकळी होत होती.

'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'च्या शौचालयाची आणि मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती सगळ्या देशाला झाली. त्यालाही एक घटना कारणीभूत ठरली. २० वर्षांपूर्वीची गोष्ट. आंतरराष्ट्रीय स्तरावर शौचालय निर्मिती आणि त्यांची स्थिती तसेच त्याचे समाजासाठी महत्त्व याविषयीचे एक सर्वेक्षण झाले. त्यामध्ये भारतातील शौचालयांचेही सर्वेक्षण झाले. मुंबई शहरातील सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण झाले. त्यातून त्यांना सर्वोत्तम शौचालये निवडायची होती. अर्थात, मुंबई शहरामध्ये मोठमोठ्या भांडवलदारांनी निर्माण केलेली शौचालये होती. त्यांचा बाह्य 'चकचकाट' पाहण्यासारखा होता. मात्र, तरीही मुंबई शहरामध्ये सर्वोत्तम सार्वजनिक शौचालय म्हणून 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'च्या शौचालयाची निवड झाली. बाहेर शौचास बसावे लागू नये म्हणून गरीब घरच्या सामान्य मुलांच्या आयुष्यातला निर्विवाद, निखळ आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. हा क्षण केवळ त्यांच्यासाठीच महत्त्वाचा नव्हता, तर प्रतिकूल परिस्थितीला आव्हान देत परिस्थिती पालटण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी तो अभिमानाचा, आनंदाचा क्षण होता.

आता बराच काळ लोटला आहे. 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'ची ती किशारेवयीन मुले आता प्रौढ झाली आहेत. मात्र, त्यांची सामाजिक तळमळ, जाणीव तीच, तशीच आहे. आपण कष्टातून सुस्थिर झालो. आपल्या वस्तीतीलच नव्हे तर दृष्टिपथात येणाऱ्या प्रत्येक गरजूला मदत करायलाच हवी, असे त्यांचे अलिखित ध्येय. त्यातूनच मग समाजातील तळागाळातील स्तरातून आलेल्या मुलांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे कामही मंडळ करत आहे. मंडळाचे दयानंद जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या 'हागणदारी मुक्त अभियाना'च्या समितीवर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून झाली. त्या निमित्ताने त्यांना गावोगावी, खेडोपाडी आणि मुंबईतल्या वस्तीपातळीवर जाणे-येणे सुरू झाले. समाजाचे प्रश्न त्यांना माहिती नव्हते असे नाही. मात्र, पूर्वीचे प्रश्न आता नव्या कंगोऱ्यांसह बदलले होते आणि हे समजून घेणे आवश्यक होते. त्या प्रश्नांचा मागोवा घेताना दयानंद जाधव आणि मंडळालाही जाणवले की, वस्ती-वस्तीमध्ये शौचालये आहेत. पण शौचालयांची निगा कशी राखावी? त्या शौचालयांचा पर्यावरणपूरक वापर कसा करावा, याची जागृती करणे गरजेचे होते. तसेच वस्तीपातळीवरही अनेक होतकरू मुले आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण किंवा थोडी प्रेरणा दिली, तर त्यांना यश गाठणे सोपे जाते, हेही मंडळाच्या लक्षात आले. त्यातूनच दयानंद जाधव यांची गोवंडीच्या आनंदनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रवीण रुपवते या तरुणाशी संपर्क झाला. त्याच्याशी बोलताना दयानंद यांना समजले की, अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रवीणने 'युनिफाईट' खेळाचा सराव केला. सततचा सराव आणि त्या खेळाबाबत प्रचंड निष्ठा यातूनच मग प्रवीणला या खेळातील मार्ग दिसत गेले. प्रवीणला या खेळामध्ये राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक मिळाले. याच खेळामध्ये भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याची आंतरराष्ट्रीयस्तरावर निवड झाली. तो त्या स्पर्धेसाठी आगामी काळात रशियाला जाणार आहे. दयानंद आणि मित्रमंदळींना प्रवीणच्या संघर्षाचे कौतुक वाटले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपणही केवळ शौचालय बांधण्याचे स्वप्न पाहिले आणि आज सगळ्या वस्तीचीच परिस्थिती सकारात्मकरीत्या पालटली, हे या सर्वांना आठवले. त्यामुळे 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'ला वाटले की, वस्त्या-वस्त्यामंध्ये असे कितीतरी होतकरू युवक-युवती असतील, जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द घेऊन लढत असतील. ते सर्व कोणत्याही जातीधर्माचे असोत, ते आहेत तर आपल्याच संघर्षशील जातकुळातील. त्यांच्या संघर्षाला, प्रयत्नांना दाद मिळायलाच हवी. ते प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यावरही नाहीत. मात्र, त्यांना शाबसकी द्यायलाच हवी. त्यांचे कौतुक करायलाच हवे. याच विचारातून 'त्रिरत्न मंडळा'ने अशा होतकरू युवक-युवतींचा कौतुक सोहळा आयोजित केला होता.

या कार्यक्रमाबाबत दयानंद जाधव म्हणतात की, "मनात विचार आला की, अशा बिकट परिस्थितीला सामोरे जाऊन जे तरुण-तरुणी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. त्यांचा सत्कार शासन प्रतिनिधींच्या हस्ते होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाची आखणी सुरू झाली. संस्थेने असा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक करणे आणि तेही मंत्रिमहोदयांच्या हातून करणे, हे पहिल्यांदाच घडत होते. अ‍ॅड. आशिष शेलार (मंत्री शिक्षण, क्रीडा व युवक) यांची वेळ घेण्यापासून ते कार्यक्रमासाठी सभागृह मिळविण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली. प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेविका हेतल गाला, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के या सर्व आमंत्रितांपर्यंत पोहोचून त्यांना कार्यक्रमास आवर्जून बोलावण्याचे कार्य पार पाडले. हे सर्व घडले ते कार्यक्रमाच्या ७२ तास आधी. कार्यक्रमाला किती लोकं असतील? याचे काहीही गणित डोक्यात नव्हते. तरीही दि. ३१ जुलै, २०१९ साजऱ्या होणाऱ्या या कौतुक सोहळ्याची आम्ही लोकांपर्यंत कार्यक्रमपत्रिका आम्ही लोकांपर्यंत आदल्या दिवशी पोहोचवली होती. आधी सांगितल्याप्रमाणे आमचा हा कौतुक सोहळ्याचा असा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे म्हणा... आम्ही लोकांच्या उपस्थितीबाबत थोडे साशंकच होतो. पण कार्यक्रम सुरू होता होता लोकांची उपस्थिती वाढली. याप्रसंगी नवनिर्वाचित शिक्षण, क्रीडा व युवकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांचा सत्कार 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'चे अध्यक्ष दिलीप कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमात ज्यांचे कौतुक झाले ते सर्व गरीब घरांतून आपापल्या क्षेत्रात नाव मिळविणारे होतकरू खेळाडू आहेत. दिव्यांग असूनही पॅरापॉवरलिफ्टिंग या खेळात चषक, रौप्यपदक मिळविणारे प्रशांत जाधव, अथर्व आंग्रे यांनी मल्लखांब या खेळाची प्रात्यक्षिक बहरीन, सिडनी फेस्टिवल,कॉमन वेल्थ गेम-ऑस्ट्रेलिया इथे केली आहेत. ते आता मक्सिकोमध्ये मल्लखांब खेळासाठी जाणार आहेत, रोहन विजय गुरव यांनी २०१७ साली मुंबईश्री, महाराष्ट्रश्री, भारतश्री मिळविला. २०१८ साली शरीरसौष्ठव ७० किलो वजनी गटात मुंबईश्री म्हणून सुवर्णपदक मिळविले आहे. तर प्रितेश गमरे यांनी मल्लखांब या खेळाची साने गुरुजी आरोग्य मंदिर या शाळेपासून सुरवात केली होती. जिल्हा, राज्य, देश-विदेशात मल्लखांबाची प्रात्याक्षिक करीत असताना आता पुन्हा युरोपच्या दौ-यावर जात आहेत. प्राजक्ता सिद्धार्थ तांबे या शेतकरी कुटुंबातील. त्यांनी गाव, तालुका, राज्य आणि राष्ट्र पातळीवर 'ज्युनियर नॅशनल बेंचप्रेस' पॉवरलिफ्टिंग खेळात प्रथम क्रमांक पटकावला. प्रतीक्षा बबन गायकवाड या गाव, तालुका, राज्य आणि राष्ट्र पातळीवर पदकांची लयलूट करताना सिनिअर पॉवरलिफ्टिंग खेळाडू म्हणून आज भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. अक्षय शेट्टी यांची धावपटू म्हणून भारताचे प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. धृमिळ विलास मटकर यांनी शालेय जीवनापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आज आयपीएल सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. प्रवीण रुपवते यांना युनिफाईट खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास रशियामध्ये आमंत्रित केले आहे. सोहेल खत्री हे आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू म्हणून अबुधाबी येथे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. याचवेळी सांताक्रुझ खोतवाडी गोविंदा पथकाचे आणि जयभवानी क्रीडामंडळाचा विशेष समाजकार्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी सर्वांचा अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्या खेळाडूंची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशा मुलांचे आर्थिक मदतीचे निवेदन स्वीकारून शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के या स्वत: कबड्डीपटू आहेत. त्यांनी शासनाकडून कसा सत्कार करण्यात आला याचे वर्णन केले. त्या म्हणाल्या की, शासनाच्या क्रिडाविषयक धोरणांचा उपयोग तुमच्यासारख्या होतकरू खेळांडूसाठी कसा करता येईल, यावर माझा कटाक्ष असेल. या कौतुकसोहळ्याचे सूत्रसंचालन हरीश पंड्या यांनी केले. तसेच उपस्थित पाहुण्यांचे आभारप्रदर्शन आणि कार्यक्रमाचा समारोप संस्थेचे कार्याध्यक्ष दयानंद जाधव यांनी केले. 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'चे काम बहुआयामाने सुरू आहे. मात्र, सर्व कामाचा केंद्रबिंदू आहे समाजोत्थान. वर्तमानकाळात समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर काम करणाऱ्यांमध्ये सामाजिक संस्थांची दीपशिखा म्हणून 'त्रिरत्न प्रेरणा मंडळ' आहे, हे मात्र नक्की.

(संपर्क : दयानंद जाधव-7738788850