सुळेबाई, तुम्ही आहात कुठे?

    दिनांक  06-Aug-2019 22:45:08   


 


"फारूख अब्दुल्ला कुठे आहेत?" सुप्रिया सुळेंनी संसदेत प्रश्न विचारला. आता अर्थातच स्वातंत्र्य असल्यामुळे कुणी, कुठे, काय विचारावे याचे स्वातंत्र्य आहेच. पण, विषय काय, आपण बोलतो काय? याचा जराही संबंध न लावता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फारूख अब्दुल्लांबद्दल विचारावे, याचे आश्चर्य वाटते. कारण, महाराष्ट्रात त्यांच्या पिताश्रींची सत्ता असताना आणि दशकभर स्वतःही सत्तास्थानी असताना या व्यक्तीने राज्यातल्या गरीबाचीही कधी चौकशी केली नाही. (आता सत्ता गेल्यावर पुतना मावशीचे अश्रू टपकवत लोकांची चौकशी करतात, ही गोष्ट वेगळी) तर, महाराष्ट्रात पूर-दुष्काळ, भूकंप, दंगली वगैरे वगैरे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आल्यावर सुळेबाईंनी कधीही इतक्या पोटतिडकीने जनतेची चौकशी केली नव्हती की, 'बाबा रे तुम्ही जगला का मेलात?' नाही म्हणायला निवडणूक काळात कुणाला तरी धमकावण्यासाठी यांचे नाव गाजत होते. असो. तर विषयांतर झाले की, त्यांना फारूख अब्दुल्लांची आठवण झाली. सगळ्या सगळ्या भारतीयांना ३७० कलम हटवले याचा आनंद आहे. देशभरातील प्रत्येक नागरिक आपआपल्या परीने आनंद व्यक्त करतोय. चर्चा करतोय. सगळीकडेच ३७० कलमाची चर्चा आहे. पाकिस्तान म्हणू नका, चीन म्हणू नका, श्रीलंका म्हणू नका अगदी अमेरिकेमध्ये पण या कलमाची जादू पसरली आहे. त्यामुळे अर्थातच भारतीय संसदेमध्येही ही चर्चा चालणारच चालणार. यावेळी उपस्थित खासदार या एक तर ३७० कलमाच्या समर्थनार्थ तरी बोलले किंवा विरोधात तरी बोलले. तर असे ३७० कलम सगळ्यांच्याच ओठावर आणि मनात होते. मात्र, असे सगळे असताना यांना आठवले कोण तर फारूख अब्दुल्ला. त्यांचा आवाज म्हणे यांना ऐकायचा होता. स्वतःच्या मतदार संघातील लोकांचा आवाज ऐकायची मारामार, मात्र फुटीरतावादी मत मांडणाऱ्यांचा आवाज ऐकण्याची यांना तीव्र इच्छा. काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतेचा नंगानाच चालू असताना फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि गिलानी वगैरेंनी काय दिवे लावले हे तमाम भारतीयांना माहिती आहे. पण, सुळेबाईंना लोकभावनेशी काय देणेघेणे. दुर्दैव आहे. विरोधासाठी विरोध करताना महाराष्ट्रातून प्रतिनिधीत्व करताना पवाराच्या लेकीने आपले 'खायचे सुळे वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे' हे जगजाहीर केले. अब्दुल्ला कुठे आहेत विचारण्यापेक्षा आपण कुठे आहोत, याचा विचार केला असता तर?

 

धनाजी राव.. मुर्दाबाद!

 

काहीही म्हणा, काही चित्रपट गीते स्थलकालाच्या पलीकडची असतात. दशक लोटू द्या, पण ती कुठे ना कुठे तरी अगदी फिट बसतात. त्याशिवाय का महेश कोठारे यांच्या चित्रपटातील एक गीत आजही स्थलकाल अगदी व्यक्तिविशेषच्या मर्यादा ओलांडून एका माणसाबाबतच लिहिले की काय असे वाटते. कोणते गीत म्हणता? हो तेच गीत-

धनाजी राव मुर्दाबाद.. मालकशाही मुर्दाबाद

धनाजी वाकडे या जरा इकडे

आता धनाजी कोण? ते मुर्दाबाद का? तर हे जे धनाजी वाकडे का? तर या सगळ्याचे उत्तर आहे, श्वान नामक प्राण्याचे शेपूट नळीत घाला की चुलीत घाला, ते वाकडे ते वाकडेच. तसेच या धनाजींचेपण आहे. त्यामुळे नेता बनण्यासाठी यांची सगळी कारस्थाने वाकडीच! यांना बीडबाहेर कुणी ओळखते का? गोपीनाथ मुंडे यांचा खाल्ल्या मिठाला आणि दिलेल्या सन्मानाला विसरणारा पुतण्या म्हणून बीडबाहेरची जनता ओळखतही असेल. तर असे हे धनाजी सध्या सॉलिड गोंधळात आहेत. काय करणार? काकांच्या मुलीकडून सारखी मात मिळते, लोकांची मतं मिळत नाही. त्यातच जेे घड्याळ हातात बांधले, त्याचे तर केव्हाच बारा वाजलेले. 'मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा' म्हणत स्वगृही भाजपमध्ये परतायची वाटही बिकटच. त्यामुळे सध्या 'जैसे थे' परिस्थितीमध्ये त्यांना थातूरमातूर आरोप करत तोंड वाजवावेच लागते. त्यातच ते स्वतःला 'मोठा नेता' मानत असल्यामुळे स्वत:ची स्पर्धा ते मुख्यमंत्र्यांशीच करतात. नव्हे नव्हे स्पर्धा नव्हे, तर ते स्वतःला अति अति लोकप्रिय महामहीम मुख्यमंत्रीच समजतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश यात्रा' निघाली तर हेही 'शिवस्वराज्य यात्रा' करायला मोकळे. कॉपी कॅटलाही कॉपी करावेसे वाटेल इतकी ते मुख्यमंत्र्याची कॉपी करत असतात. असो, तर त्यांना मुख्यमंत्र्यांची यात्रा चालू वाटते. वाटणारच, चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक. आपण जसे असतो, तसे जग दिसते म्हणतात. त्यामुळे धनाजींना असे वाटणारच. मूळचा स्वभाव जाईल कसा? सवभावातच असे असल्यामुळे ते काय करणार? स्वभावाला औषध आहे का? त्यामुळे धनाजी वाकडेच चालले, ते चालू द्या.