मुंबईकरांसाठी खुशखबर; पावसाचा जोर झाला कमी

05 Aug 2019 16:35:05




मुंबई : मागील आठ दिवसांपासून पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाल्याची माहिती स्कायमेटने दिली. स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबई व उपनगरांमध्ये येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी राहणार असून पुढील काही दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता नाही. त्यासोबतच येत्या काही दिवसांत पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून येणार असल्याचे स्कायमेटने सांगितले. त्यामुळे आता मुंबईकरांना पावसांपासून दिलासा मिळू शकतो.

 

पुढील आठ दिवस देशभरात मान्सून सक्रिय

 

देशभरात आणखी एक आठवडा मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला. मध्य, पूर्व आणि उत्तर भारतातील बर्‍याच भागांत चांगला पाऊस पडेल. मागील आठवड्यात मान्सूनने अपेक्षेनुसार कामगिरी केली असून मध्य भारतात सर्वाधिक पाऊस झाला. वडोदरा, सूरत, पुणे, नाशिक आणि मुंबई यासारख्या अनेक ठिकाणी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असल्याचे स्कायमेटने सांगितले.

 

नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर पाण्यात

 

नाशिक शहरात मागील २१ तासांत १३५ मिमी इतका मुसळधार पाऊस पडल्याने नाशिकचे प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर पाण्याने भरले असून मंदिराच्या आवारात पाणी शिरले आहे. शहरात गेल्या ४८ तासांपासून पाऊस सुरूच आहे आणि त्यामुळे बर्‍याच भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Powered By Sangraha 9.0