'राष्ट्र प्रथम' : यशाचे मूळ!

    दिनांक  04-Aug-2019 21:21:59


 


"भाजप हा पक्ष कोणा कुटुंबाच्या वारशातून नव्हे तर विचारधारेतून मोठा झालेला पक्ष आहे. हा पक्ष कष्टाने संघटन जोडून उभारला गेलाय, केवळ ठिकठिकाणचे नेते जोडून एकत्र केला गेलेला नाही." भारतीय राजकारण आणि या राजकारणात मोदी-भाजप का यशस्वी ठरतात, याचे उत्तर मोदींच्याच या दोन वाक्यांत दडलेले आहे.


११ डिसेंबर, २०१८. देशातील पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल या दिवशी जाहीर झाले आणि यापैकी भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखली जाणारी महत्त्वाची तीन राज्ये भाजपने गमावली. राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश ही ती तीन राज्ये. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला बसलेला हा धक्का आणि काँग्रेसला मिळालेली उसंत पाहून अनेक अतिउत्साही राजकीय विश्लेषक, पत्रकार मंडळी २०१९ लोकसभा निवडणुकीचाही निकाल त्याचवेळी वर्तवू लागले. नेहरू-गांधी घराण्याची चौथी पिढी अर्थात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आता पंतप्रधान होणार आणि नरेंद्र मोदी यांची सत्ता जाणार... पुढे २३ मे, २०१९ रोजी वास्तवात काय घडले, हे आपणास ठाऊक आहेच. हे असे का झाले असावे? इतक्या अनुभवी, ज्येष्ठ वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या पत्रकार, राजकीय पंडितांचे अंदाज कसे काय चुकावेत? याचे कारण म्हणजे, त्यांच्यासाठी लढाई २०१४ मध्ये सुरू झाली होती. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मातृसंस्था मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रात सत्तेत आले होते. परंतु, ही लढाई २०१४ पासून सुरू झालेली नव्हतीच मुळी. शिवाय, पक्ष आणि विशिष्ट निवडणुकांपुरतीही नव्हती. खरी लढाई सुरू झाली होती ती १९२५ पासून! तीन-तीन बंदी, कारावास, आणीबाणीतील अनन्वित छळ, शिवाय हिंदुत्ववादी म्हणून वाट्याला आलेली उपेक्षा, काँग्रेसी वर्चस्वाच्या काळात 'जनसंघवाले' म्हणून वाट्याला आलेली कुचेष्टा वगैरे वगैरे सर्व काही सोसून जो पक्ष उभा राहिला, नुसता उभाच राहिला नाही तर सलग दोन निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत आला. आता तर हा पक्ष कायमस्वरूपी सत्ताधारीच झाला आहे की काय, अशी शंका येण्याइतपत परिस्थिती आहे. हे सगळं का घडले असावे? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या प्रश्नाचे उत्तर नुकतेच दिले आहे. भाजप खासदारांच्या प्रशिक्षण वर्गात बोलताना मोदी म्हणाले की, "भाजप हा पक्ष कोणा कुटुंबाच्या वारशातून नव्हे तर विचारधारेतून मोठा झालेला पक्ष आहे. हा पक्ष कष्टाने संघटन जोडून उभारला गेलाय, केवळ ठिकठिकाणचे नेते जोडून एकत्र केला गेलेला नाही." भारतीय राजकारण आणि या राजकारणात मोदी-भाजप का यशस्वी ठरतात, याचे उत्तर मोदींच्याच या दोन वाक्यांत दडलेले आहे.

 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने जेव्हा पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले, त्यानंतर आपल्या खासदारांना संबोधित करतानाही मोदी हेच म्हणाले होते. आज जे यश आपण पाहतो आहोत त्यामागे आपण नाही तर आपली विचारधारा आहे आणि त्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून, सर्वस्व अर्पण करून पक्षासाठी गेली कित्येक दशके राबणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, हे त्यादिवशी मोदी सांगत होते. स्वतःच्या पक्षाबद्दल बोलताना या नेत्याच्या अश्रूचा बांध फुटला होता. तेव्हापासून आजतागायत मोदी सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांसमोर, खासदारांसमोर हेच सांगत आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातील भाषणे बघा किंवा गांधी कुटुंबातील कुणाचीही भाषणे बघा. पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी काय केले, या नेहरू-गांधी घराण्याचे देशासाठी योगदान किती महान याच मुद्द्यांनी या भाषणांचा निम्मा भाग भरलेला असे. उरलेला भाग अर्थातच, मोदी, भाजप, रा. स्व. संघ आदींवर टीका करण्यात. राहुल गांधी तर अनेकदा माझ्या आज्जी आणि वडिलांनी देशासाठी कसे स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले, हे सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतातच. हेच सारे काँग्रेसच्या अन्य नेत्यांमध्येही झिरपले आहेच. म्हणून तर आज काँग्रेसचा अध्यक्ष कोण यासाठी आता लोक प्रियांका गांधींचे नाव पुढे करत आहेत. शेवटी गांधी घराणेच. काँग्रेस आणि गांधी घराणे सातत्याने का अपयशी ठरत आहे आणि का लोक सातत्याने त्यांना नाकारत आहेत, याचे उत्तरही यामध्येच दडलेले आहे.

 

एकाच देशातील, एकाच संसदीय लोकशाहीतील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांची राजकीय संस्कृती आणि विचारधारा किती भिन्न स्वरूपाची आहे, याचे दर्शन ही उदाहरणं पाहून घडते. एका पक्षाने एका निवडणुकीत अवघे दोन खासदार मिळवले. पुढच्या ३० वर्षांत हा पक्ष स्पष्ट बहुमतासह सत्तेत आला होता. दुसऱ्या पक्षाने एकेकाळी चारशेहून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर पुढच्या ३० वर्षांनंतर हा पक्ष पन्नासच्याही खाली आला होता. आज प्रथमस्थानी आलेला पक्ष विचारधारेशी एकनिष्ठ राहिला. अटलजी संसदेत म्हणालेच होते, 'सरकारे आएगी-जाएगी, 'पार्टीयां बनेगी-बिगडेगी, लेकीन ये देश रहना चाहिए.' हा विचारच भाजपच्या आजवरच्या साऱ्या प्रवासाचा मूळ गाभा आहे. त्याचे बीज अस्सल आहे. संघ परिवाराच्या संस्काराचे, राष्ट्रवादाने भरलेल्या विचारधारेचे. मुख्य म्हणजे, या पक्षाच्या प्रमुख नेत्याला या गोष्टीची जाणीव आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही तो याचा विसर पडू देत नाही. भाजपमध्ये अन्य पक्षांतून मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असलेले नेते, कार्यकर्ते, हा सध्या एक मोठा चर्चेचा विषय आहे. त्याबद्दल उलटसुलट मतमतांतरेदेखील व्यक्त होत आहेत. परंतु, गेल्या पाच-सहा वर्षांत भाजपमध्ये बाहेरून आलेले नेते पाहिले तर ते कधीकाळी दुसऱ्या पक्षात होते यावर आपला विश्वास बसणार नाही. इतक्या या सर्व व्यक्ती भाजपमध्ये सामावून घेतल्या गेल्यात, पक्षाच्या कार्याशैलीशी त्या एकरूप झाल्यात. याचे मूळ मोदी सांगतात त्याप्रमाणे त्या विचारधारेत आहे. म्हणून तर भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वारेमाप असली तरी भाजप सोडून अन्य पक्षांत जाणाऱ्यांची संख्या कायमच अत्यल्प होती. केवळ आज भाजप सत्तेत आहे म्हणूनच नाही, तर भाजपचे दोन खासदार आले तेव्हाही. 'नेशन फर्स्ट, देन पार्टी अ‍ॅण्ड देन मायसेल्फ' असे लिहिलेले फलक भाजपच्या जवळपास सर्व कार्यालयांत दर्शनी भागांत लावलेले असतात. या वाक्याला जागलेल्या असंख्य नेत्यांचा वारसा भाजपला लाभलेला आहे. अगदी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्यायांपासून. याच उलट इतर पक्षात काय परिस्थिती आहे, हे आपण पाहतो आहोतच. राष्ट्र घडते ते नेतृत्वामुळे आणि नेतृत्व घडते ते विचारधारेमुळे. नेत्याला जेव्हा आपल्या मुळांची जाणीव असते आणि त्यातून निर्धारित केलेले उद्दिष्टही स्पष्ट असते, तेव्हा त्या राष्ट्राची वाटचाल ही वैभवाकडेच होत असते. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपलीही वाटचाल याच मार्गाने होते आहे, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नसावी.