वाचव रे देवा, अल्ला, येशू

    दिनांक  04-Aug-2019 21:35:49   दशकांपासून निर्माण केलेल्या संस्था ते मोडत आहेत. काय करावे? दशकभर आपलेच राज्य होते. आपण 'राजकुमार' नव्हे तर 'पातशाहा-बादशाहा' वगैरेचे फिलिंग मला होते. दशकाचं काय घेऊन बसलात? पाच-सहा वर्षांपूर्वी पण 'हम करे सो कायदा' होते. प्रत्यक्ष मौनी अंकलच्या हातातील कागद मी टराटरा फाडले होते. तेवढी पॉवरच होती माझ्याकडे. पण हाय रे देवा, हाय रे अल्ला, हाय रे येशू, (आम्ही सेक्युलर असल्यामुळे सगळ्यांची नाव घ्यावीच लागतात) आता सगळेच बदलले. ते आम्ही निर्माण केलेले सगळे मोडत आहे. गांधी-नेहरू खानदानाचा मी एकमेव कुलदीपक. काही वर्षांपूर्वी नव्हे, तर काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचा 'यंग,' 'चार्मिंग,' 'डॅशिंग' वगैरे अध्यक्ष होऊ घातलेला नेता मीच होतो. 'तसे आमचे ठरले होते.' माझ्यासमोर कुणी उभे राहू शकत होते का? पण माझ्या अध्यक्षपदाची खुर्ची त्यांनी मोडून टाकली. माझी अध्यक्ष संस्था मोडून टाकली त्यांनी. हे बघून ताईबाईंनी अध्यक्ष होण्याची घाई केली होती. तसे झाले असते तर? मग पुढे-मागे माझा पत्ता कायमचाच कट झाला असता. त्यामुळे मी माझ्या नेहमीच्या हुशारीने आधीच डिक्लेअर केले की, गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष असावा. त्यामुळे ताईबाई अध्यक्ष होऊच शकत नाही. आता यावर नतद्रष्ट लोक बोलतात की, माझ्याकडे आणि ताईबाईंकडे असे काय आहे की पंतप्रधान व्हावे? काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावे? वेडे आहेत ते. त्यांना दिसत नाही का? की ताईबाईंकडे आमच्या आजीसारखे नाक आहे आणि माझ्याकडे माझ्या बाबांसारखी गालावरची खळी आहे. अजून काय हवे देश चालवायला आणि पक्ष चालवायला. हो. विषयांतर होते आहे. तर मी काय म्हणतोय की, ते भाजपवाले आम्ही दशकांपासून निर्माण केलेल्या संस्था मोडत आहेत. आता हेच पाहा ना, काश्मीरमध्ये दशकांपासून काय अगदी देश स्वतंत्र झाल्यापासून दहशतवाद्यांचे संस्थान कसे सुखाने नांदत होते. पण हे भाजपवाले 'नमोकाका', त्यांचे ते दोस्त 'अमितकाका' आले आणि त्यांनी काश्मीरमधील दहशतवादाचे संस्थान मोडीत काढण्यास सुरुवात केली. आमच्या पणजोबांपासून ती संस्था काश्मीरमध्ये होती ना... याचा तरी विचार भाजपवाल्यांनी करायचा. पण नाही आमच्या कारकिर्दीतल्या सगळ्या संस्था मोडीतच काढायच्यात त्यांना. वाचव रे देवा, अल्ला, येशू...

 

डिलिव्हरी बॉयचे दु:ख

 

विक्रोळी... पूर्व द्रुतगती मार्ग, सर्व्हिस रोड, धो धो पाऊस... रस्त्यावर शुकशुकाट. अधूनमधून वेगाने जाणारी वाहने. त्यावेळी 'रेड चिली' हॉटेलचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेले अन्न घेऊन जात होता. तिथे बसलेल्या गर्दुल्यांनी त्याला लुटले, त्याचा खून केला. नशेत असताना त्यांना भान तर नसणारच. पण एक गरीब मुलगा जीवानिशी गेला. ऊन-वारा-पाऊस, अगदी घरातून बाहेर पडण्याची परिस्थिती नसतानाही एका फोनवर अन्न घेऊन येणारे हे बॉय. अर्थात, घरी अठरा विश्वे दारिद्य्र असेल किंवा विकासाचा कोणताच मार्ग नसेल म्हणून ते हे काम करत असतात. तर हा डिलिव्हरी बॉय असाच दुसर्‍याची भूक भागवण्यासाठी भर पावसात गेला आणि मेला. त्याला किती पगार असेल? त्याला काय सुविधा असतील? त्याच्यावर अवलंबून असलेले कोण कोण असेल? त्याच्यावर अवलंबून असलेले इथे असतील की मुलखात असतील? त्यांना माहिती पडले असेल का? की आपला मुलगा असा हकनाक मेला आहे. भयानक फार भयानक. नशेखोर राक्षसांना सजा व्हायलाच हवी. डिलिव्हरी बॉय, कुरिअर बॉय, सेल्सगर्ल, सेल्सबॉय यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरच आहे. यांचा विचार करताना मॉल किंवा विंडो शॉपिंग, खाद्यपदार्थांच्या दुकांनाची आठवण झाली. थोडीफार शिकलेली मुले-मुली तिथे कामाला. आठ आठ तास उभे राहून त्यांना काम करायचे असते. आजारी असूद्या, घरचे कोणी मरूद्या, मुंबईत किंवा देशात कुठे आग लागो का पूर येवो, त्यांना आठ तास उभे राहून कस्टमर सर्व्हिस द्यायचीच असते. त्यांनी बसू नये, असा नियमच आहे. छे! किती ही असंवेदनशीलता. वाईट तर याचेच वाटते की, मॉल आणि आणि अशा विंडो शॉपिंगला किंवा खाद्यपदार्थांच्या दुकानात सगळेच जातात. पण पाय मोडेपर्यंत उभे राहून कृत्रिम हसणार्‍या कर्मचार्‍यांची कुणालाही दया येत नाही. असो, तर मुद्दा आहे त्या डिलिव्हरी बॉयचा आणि त्याच्यासारख्या असंख्य असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेचा. नशेखोर राक्षसांचा, समाजकटंकांचा सगळ्यात जास्त धोका या असंघटित कामगारांना असतो. कारण, या कामगारांच्या कामाची नियमावली नसते, असली तरी ती हे कर्मचारी 'माणूस' आहे या दृष्टिकोनातील नसते. त्यांच्या मजबुरीचा फायदा सगळेच घेतात. हकनाक मेलेल्या निष्पाप डिलिव्हरी बॉयच्या मरणाचे दु:ख शब्दातीत आहे. नशाबाज हल्लेखोरांना सजा व्हायलाच हवी.