दिलजीत दोसांज बरोबर २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'सुरमा' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एका खेळाडूच्या भूमिकेत प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी तापसी पन्नू येत आहे. 'रश्मी रॉकेट' या चित्रपटामध्ये एका धावपटूची भूमिका ती साकारणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आणि सोशल मीडियावर त्याविषयी प्रचंड चर्चा सुरु झाली.
या मोशन पोस्टर मधील तापसीचा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल असा आहे. तिच्या गळ्याभोवतीचा टॅटू, चोकरचे गळ्यातले, कुरळे केस आणि तिच्या डोळ्यातील तेज हे पाहून प्रेक्षक तिच्याकडे आकर्षित झाले आहेत. या मोशन पोस्टरसाठीचे संगीत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक लेस्ली लुईस यांनी दिले आहे.
'रश्मी रॉकेट' या चित्रपटाविषयी आणखी गोष्टी उघड करण्यात आल्या नसल्या तरी या मोशन पोस्टरवरून चित्रपटाची कथा थोड्या फार प्रमाणात उलगडली आहे. एका छोट्या गावातील मुलगी, जी एक महान धावपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. आता तिचे हे स्वप्न पूर्ण होते का? त्या प्रवासात तिला किती संघर्ष करावा लागतो? हे पाहणे खूपच औत्सुक्याचे असेल.