म्हणजे आपला माल खराब आहे का?

    दिनांक  30-Aug-2019 21:25:18   व्यावसायिक उत्पादनात आकर्षक वेष्टनाच्या आत कसे उत्पादन असेल, हे सांगणे नक्कीच अवघड आहे. आतील मालाचा कोणताही अनुभव खरेदी करणाऱ्या ग्राहकाला नसतो. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, हे सूत्र राजकीय व्यक्तींना लागू होऊ शकते का, समाजजीवनात वावरत असताना राजकीय नेत्यांची ओळख सर्वसामान्य जनतेला होत असतेच. त्यामुळे त्या मालाची गुणवत्ता नक्कीच समोर येत असते. व्यक्तीला 'माल' म्हणण्याची किंवा तशी उपमा देण्याची रीत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्माण केली. सुळे या नुकत्याच नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी इतर पक्षांतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यासंबंधी बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले की, "आता पॅकेजिंग बदलले म्हणून आतला माल बदलणार आहे का?" सुळे यांच्या या वक्तव्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, तुमच्याकडे असणारा माल (राजकीय नेते) हा खराब होता किंवा आहे, हे आपणस मान्य आहे काय? माल बदलणार आहे का? या शब्दाचा नेमका अर्थ हा नकारात्मक होत असल्याचेदेखील सुळे यांच्या यावेळी लक्षात आले नाही, हेच यावरून दिसून येते. त्यामुळे, तुम्ही (राष्ट्रवादी काँग्रेसने) आजवर खराब मालच विविध घोषणा, आश्वासने यांचे वेष्टन करून आणि त्यावर विविध पदांची रिबीन लावून राजकीय क्षेत्रात घाऊक दरात उपलब्ध करून दिला काय, असा सवाल यानिमित्ताने समोर येत आहे. यावेळी सुळे यांनी छगन भुजबळ यांना त्यांच्या अटक काळात नाशिककरांनी साथ दिली, अशी बतावणीदेखील केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते म्हणजे नाशिक नव्हे, हे सुळे विसरल्या आणि भुजबळ यांना जर नाशिककरांनी साथ दिली असती, आणि त्यांचा व्यवहार हा गैर नाही, हे नाशिककर नागरिकांनी मनोमन जाणले असते तर, लोकसभा निवडणुकीत प्रती भुजबळ समीर यांना पराभवाची चव चाखावी लागली नसती, हे सुळे यांनी लक्षात घेणे आवश्यक होते.

 

आता कसला मिळणार आधार?

 

'बुडत्याला काडीचा आधार' अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. पण, ती काडीच प्रवाहाबरोबर वाहून गेली तर, मग कसला आधार मिळणार, हे काही आजवर समोर आलेले नाही. अशीच स्थिती सध्या नाशिकमध्ये महराष्ट्राचे नवनिर्माणाचे शड्डू ठोकणाऱ्या मनसे नामक पक्षाची झाली आहे. तीन आमदार, महापालिकेची एकहाती सत्ता मनसेला सुतासारखे सरळ करण्यासाठी नाशिककर नागरिकांनी दिली होती. मात्र, सुताची भाषा करणाऱ्या राजकारणामुळे नाशिकच्या औद्योगिक, नागरी, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत सुतकासारखा काळ नाशिकवर आला आणि त्यामुळे सुजाण नाशिककरांनी एका हाताने दिलेली सत्ता दुसऱ्या हाताने काढून घेतली. तेव्हापासून मनसे नाशिकमध्ये अस्तित्वाच्या शोधात आहे. मनसेचा नाशिकमधील आधार असणारे जे काही मोजके कार्यकर्ते आहेत, त्यात प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले एक आहेत. मात्र, तेदेखील आता मनसेच्या इंजिनमधून पायउतार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तविली जात आहे. नुकतीच मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे नाशिक दौऱ्यावर आले होते. उद्देश तोच होता, जो सध्या मनसेचा आहे. पक्षावरील मरगळ झटकणे आणि विधानसभेची चाचपणी करणे. यावेळी आयोजित बैठकीस राहुल ढिकले यांनी दांडी मारली. तसेच, गेल्या एक वर्षापासून ढिकले नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून तयारी करत आहेत. त्यांचे तसे फलकदेखील रिक्षांवर लावलेले दिसून येतात. मात्र, त्यावरून राज यांचे छायाचित्र आणि पक्षाचे नाव गायब झाले आहे. त्यामुळे शहरात मनसेचा असणारा काडीचा आधारदेखील आता वाहून जातोय की काय अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, ढिकले हे भाजप आणि शिवसेना यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असून ढिकले दुसऱ्या बैठकीला असल्याने या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, ते आमच्या संपर्कात आहेत, अशी प्रतिक्रिया देशपांडे या दौऱ्यात द्यायला विसरलेले नाहीत. ज्या शहराने भरभरून मतदान केले, त्याच शहरात आपले अस्तित्व शोधण्यासाठी आणि उणेपुरे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी मनसेची सध्या धडपड सुरू आहे. मनमानी कारभार, नागरिकांना गृहीत धरणे, कृती न करता बोलण्यास प्राधान्य देणे आणि केवळ करिष्मा हाच फॅक्टर लक्षात घेणे. या विचारमूल्यांची किंमत आज मनसे नाशिकमध्ये चुकवत आहे.