कृष्णाची 'सायकलस्वारी' काश्मीर ते कन्याकुमारी

    दिनांक  30-Aug-2019 20:40:04   


 


महाभारतात भगवान कृष्णाने अर्जुनासाठी पथदर्शकाची भूमिका बजावल्याने पांडवांनी विजय साजरा केला. गत ७० वर्षांचा काश्मीर प्रश्न कलम ३७०आणि ३५ एरद्द झाल्याने आणि काश्मीर भारताचा खऱ्या अर्थाने अभिन्न अंग बनल्याचा आनंद आता कृष्णा तनपुरे साजरा करणार आहे. महाभारतातील कृष्ण रथाचा सारथी होता. हा कृष्णा सायकलचा सारथी बनून आपला प्रवास करणार आहे. अभाविपचा कार्यकर्ता असणारा आणि रा. स्व. संघाच्या संस्कारांचा अभिमान बाळगणारा कृष्णा तनपुरेविषयी..

कृष्णा भाऊराव तनपुरे राहणार येवला तालुक्यातील आडगाव रेपाळचा रहिवासी. कृष्णाचे कुटुंब हे वडील भाऊराव बाबुराव तनपुरे व आई निर्मला तनपुरे, आजी-आजोबा व भाऊ असे सहा सदस्यांचे. सामान्य शेतकरी कुटुंब आणि हलाखीची परिस्थिती अशा स्थितीत कृष्णाचे शिक्षण आणि बालपण गेले. लहनग्या वयातच कृष्णाला आपल्या गावापलीकडील जगाचे अचाटआकर्षण होते. त्यामुळे सामान्यज्ञानाचे प्रश्न विचारणे आणि त्यांची उत्तरे शोधणे हेच त्याचे आवडीचे काम. कृष्णाचे बालपण हे गावातच गेले आणि नंतर लासलगाव महाविद्यालयामध्ये त्याने प्रवेश घेतला आणि तेथूनच कृष्णाच्या क्रीडाप्रवासाला सुरुवात झाली. सतराव्या वर्षी कृष्णाचे वजन फक्त ३० किलो होते. शरीरयष्टी अत्यंत कमजोर होती. त्यामुळे आरोग्य धनसंपदाहवी, याची त्याला जाणीव होऊ लागली.

 

२०१६ चे रिओ ऑलिम्पिकबघितल्यापासून अजूनच त्याला प्रेरणा मिळाली आणि त्याने ट्रायथलोन या खेळासाठी तयारी सुरू केली. या खेळ प्रकारात पोहणे, सायकलिंग आणि धावणे असे तीन प्रकार असतात. हे सर्व करताना कृष्णाने नाशिकला काही दिवस सराव केला आणि त्यानंतर पुणे येथे तो गेला. पुण्यात सुरुवातीला एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम केले आणि रात्री हॉटेलमध्ये काम करून पोहण्याच्या कोर्ससाठी पैसे जमवले. आणि त्यानंतर त्याने पोहण्याचा कोर्स करून तिथे दोन महिने विनामूल्य सरावासाठी कामही केले. ते काम करत असताना त्याला डिकॅथलॉनया स्पोर्ट् स कंपनीबद्दल समजले. कृष्णाची परिस्थिती बघून या कंपनीने त्याला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. या कंपनीमार्फत कृष्णाला वापरण्यासाठी एक बेसिक सायकल मिळाली, जिच्यावर तो दररोज ५० किमी व सुट्टीच्या दिवशी १०० ते १५० किमी सायकलिंग करू लागला. हे करत असताना त्याचे वर्षभरात १५ ते १८ हजार किमीपर्यंत सायकलिंग पूर्ण झाले. कृष्णाची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे त्याला स्वतः काम करून उराशी बाळगलेल्या स्वप्नांना गाठायचे होते आणि त्यासाठी त्याची अविरत मेहनत सुरू आहे.

 

संसदेने कलम ३७०आणि ३५ एरद्द करून काश्मीरला भारताचा एक अविभाज्य आणि एकसंघ भाग बनविल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कृष्णा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करणार आहे. देशप्रेम आणि अभिमान ठायी ठायी भरलेल्या कृष्णासाठी देशच सर्वस्व आहे. विविधतेने नटलेल्या भारताचा अभ्यास करण्यासाठी आणि भारतीय तरुणांनी देशासाठी व समाजासाठी योगदान देण्याची ऊर्मी उराशी बाळगावी हादेखील संदेश तो या प्रवासातून देणार आहे. भारतीय युवकांत क्रीडाकौशल्य आहेच. त्यामुळे भारतीय युवकांनी क्रीडा क्षेत्रात आपले योगदान देत भारतासाठी अनेक पदकांची कमाई करावी, असे आवाहनदेखील या प्रवासात कृष्णा भारतीय युवकांना करणार आहे. काश्मीर स्वतंत्र झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कृष्णा लाल चौक, श्रीनगर येथून तिरंगा फडकवून या रॅलीची सुरुवात करणार आहे व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

 

कृष्णाचा प्रवास जम्मू-काश्मीर पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू या राज्यातून होणार आहे. या मोहिमेदरम्यान त्याला झेलम, चेनाब, तावी, सतलज, यमुना, चंबळ, नर्मदा, पेनगंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यादेखील पार कराव्या लागणार आहेत. तर हिमालय, विद्यांचल, सातपुडा या पर्वतरांगासुद्धा त्याच्या प्रवासमार्गात येणार आहेत. १ ऑक्टोबर, २०१९ रोजी कृष्णा त्याच्या या रॅलीला सुरुवात करणार आहे. लाल चौक, श्रीनगर येथून उधमपूर, पठाणकोट, दशुआ, होशियारपूर, अंबाला, दिल्ली बायपास, आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, सागर, छिंदवाड, नागपूर, आदिलाबाद, कामारेड्डी, हैदराबाद, कुर्नूल, अनंतपूर, बंगळुरू, कृष्णागिरी, सेलम, मदुराई तिरूनेलवेली मार्गे विवेकानंद स्मारक कन्याकुमारीपर्यंतचा हा प्रवास असणार आहे. या प्रवसासाठी कृष्णा रोड बाईक सायकलचा वापर करणार आहे. त्यासाठी मित्र किंवा एखाद्या कंपनीकडून अशी सायकल प्राप्त होते का, याच्या प्रयत्नात सध्या कृष्णा आहे. तसेच, यासाठी तो स्वतः एका कंपनीमध्ये काम करून थोडे पैसे जमवत आहे. मित्र परिवाराकडून काही पैसे त्याला मिळणार आहेत. कोणी इच्छुक असल्यास त्यांनीदेखील मदत करावी अशी त्याची इच्छा आहे.

 

कलम ३७०आणि ३५ एरद्द करून काश्मीर स्वतंत्र केल्याची भावना कृष्णा मोठ्या आनंदाने व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने आज काश्मीर स्वतंत्र झाला असून एकसंघ भारत, एक विधान, एक घटना, एक निशाण व तेथील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असल्याची भावना तो व्यक्त करतो. यामुळे दहशदवाद व त्यापासून होणारा त्रास कमी होईल. आता तेथे खऱ्या अर्थाने काश्मीरमध्ये तिरंगा फडकत असल्याची भावना व्यक्त करताना कृष्णा केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो. या रॅलीसाठी कृष्णाला खऱ्या अर्थाने डिकॅथलॉंन कंपनी व डिकॅथलॉंन समूहाची मदत झाली आहे. त्याला या रॅलीच्या तयारीसाठी सायकल तेथून मिळाली तसेच सचिन, बिपीन व सिद्धेश या तीन मित्रांची साथ मिळाली व मार्गदर्शन मिळाले. कृष्णाला त्याचे जिम ट्रेनर अनिरुद्ध बोराडे मार्गदर्शन करत आहे. त्याचे कोच चंदन सिंहदेखील त्यास मोफत मार्गदर्शन करत आहे. सर्वात महत्त्वाचे त्याचे आई व वडील वेळोवेळी या उपक्रमासाठी त्याला साथ देत असल्याचे कृष्णा आवर्जून नमूद करतो.

 

कृष्णाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराकडून देशभक्तीची वेळोवेळी प्रेरणा मिळत गेली आहे. रा. स्व. संघ परिवाराची देशभक्ती, देशहित जोपासण्यास दिलेले प्राधान्य हे बहुमोल असल्याचे तो सांगतो. देशासाठी योगदान देण्याची शिकवण अभाविप आणि रा. स्व. संघ परिवाराकडून मिळाल्याचे सांगताना कृष्णाचा उर अभिमानाने भरून येतो. युवकांनी ध्येयपूर्तीची आस बाळगल्यास आणि त्या दिशेने अविरत मेहनत घेतल्यास असणाऱ्या भौतिक आणि प्रापंचिक अडचणी या सहज दूर करता येतात, हेच कृष्णा तनपुरेने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. महाभारतकाळात ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवान कृष्णानी रथाचे सारथ्य स्वीकारत उपदेश केला, आज आपल्या सायकलचे सारथ्य करत कृष्णा भारतीय युवकांना जागे होण्याचा आणि आपल्यातील सुप्त गुणांचा विकास करण्याचा आणि राष्ट्रहीत जोपासण्याचा संदेश या प्रवासात देणार आहे. त्याच्या या प्रवासासाठी दै. मुंबई तरुण भारतच्या खूप शुभेच्छा... !