महाराष्ट्रभर जोरदार पावसाची हजेरी

03 Aug 2019 11:10:45


येत्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र - गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. उद्यापासून ६ तारखेपर्यंत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र - गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर व उपनगरांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुणे आणि आसपासच्या परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात काल अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला, नांदेड जिल्ह्यात काल दुपारपासून संततधार सुरू असून पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यासह बहुतांश भागात काल जोरदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल हजेरी लावली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही काल सकाळपासून दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Powered By Sangraha 9.0