ढगफुटीने मुंबईकरांची दैना, मुंबई व उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

03 Aug 2019 14:00:35


 

मुंबई : मुंबईत शुक्रवार रात्रीपासून शनिवार दुपारपर्यंत आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईकरांची दैना उडाली. अनेक सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी घराघरात पाणी घुसले. जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबई थिजल्यासारखी झाली होती. रेल्वेवाहतूकही धीमेगती झाली होती. मध्य-हार्बरची वाहतूक काही मिनिटे थांबली होती. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली आणि मुंबईकरांना हायसे वाटले. रेल्वे वाहतूकही सुरळीत झाली. मात्र पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

 

मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज शनिवार, दि. ३ ऑगस्ट रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी जाहीर केले.

 
 

अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन बोरीकर यांनी केले.


याशिवाय मुंबई शहर जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मुंबई शहर जिल्ह्यातील शाळाकनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी जाहीर केले आहे.

 

अतिउंच लाटा

 

दुपारी पावणेदोन वाजता समुद्राला मोठी भरती आणि जोडीला अतिजोरदार पाऊस व सोसाट्याचा वारा असल्याने ४.९० मीटरच्या सर्वात उंच लाटा उसळत होत्या. लाटा पाहायला बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र, महापालिकेचे कर्मचारी व पोलिसांनी त्यांना चौपाटीच्या कठड्यापर्यंत येऊ दिले नाही. महापालिकेनेही नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन केले होते.

 

चौघे वाहून गेले

 

नवी मुंबईतील खारघर येथे पांडवकड्याच्या धबधब्याच्या प्रवाहात डुंबण्यासाठी उतरलेल्यांपैकी चौघे वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागल्याचे समजते, तर ठाणे येथे शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला आहे.

 
Powered By Sangraha 9.0