बंगळुरू : इस्रोच्या वैज्ञानिकांनी शुक्रवारी चांद्रयान-२ च्या चौथ्या कक्षेचाही यशस्वीपणे विस्तार केला. चंद्राकडे जात असलेल्या या यानातील सर्व घटकांचे कार्य अगदी सरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती इस्रोने दिली. गेल्या महिन्यात २२ जुलै रोजी चांद्रयान चंद्राच्या दिशेने झेपावले होते. तेव्हापासून तीनवेळा यानाची कक्षा वाढविण्यात आली असून, आज चौथ्या कक्षेचाही विस्तार करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी चांद्रयान-२ च्या कक्षेत यशस्वीरित्या बदल करण्यात आला. कक्षा विस्तारित करण्याचा कालावधी ६४६ सेकंदासाठी निर्धारित करण्यात आला होता. एकूण १५ वेळा कक्षा विस्तारित करण्यात येणार असून, आता पाचवी कक्षा विस्तारित करण्याची प्रक्रिया ६ ऑगस्ट रोजी पार पडेल. दरम्यान, १४ ऑगस्टला चांद्रयान २ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.