विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत

    दिनांक  03-Aug-2019 18:17:19   


 


प्रतीकशास्त्र आणि चिह्न
, त्याचे संकेत ही फार मजेशीर गोष्ट आहे. प्रतीक-चिह्न एकाच वेळी दोन कामे करताना दिसतात. ती काहीतरी दडवून ठेवतात आणि त्याचवेळी तीच प्रतीके-चिह्न काहीतरी खुलासासुद्धा करत असतात, अव्यक्त स्थितीतसुद्धा व्यक्त होत असतात. बोलताना आपल्या तोंडातून निर्माण होणारा आवाज- उद्गार, शब्द या संबोधनाने ओळखला जातो. अशा असंख्य उद्गारांचे म्हणजे शब्दांचे एक वाक्य तयार होते आणि ते वाक्य आपल्याला काही निश्चित संकेत देत असते आणि अर्थ सूचित करत असते. असे शब्दसुद्धा प्रतीकशास्त्र म्हणजेच चिह्न संस्कृतीचा एक भाग आहेत.

एखादी वस्तू, एखाद्या विषयाला योजलेल्या संज्ञा (noun) असो किंवा कुठल्याही कृती आणि क्रियेला अर्थासह संबोधित करणारे क्रियापद (Verb) असो, कुठल्याही संदर्भासाठी वापरले जाणारे विशेषण (Adjective) अथवा व्यंजन (preposition) असो, ही सर्व गर्भित अर्थ स्पष्ट करणारी भाषेतील रूपके - प्रतीके आहेत. आरोह-अवरोह, विरामचिह्न या सर्वांच्या एकत्रित वापराने अशा शब्दांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होतो. ही प्रतीकशास्त्राची आणि चिह्न संकेतांची मांडणी आपल्या व्यक्तपणे उच्चारलेल्या शब्दापासून सुरू होते. दैनंदिन वास्तव-लौकिक सत्य आणि अलौकिक ज्ञान याचा अभ्यास, आवर्तन, अध्यापन हे सर्व या शब्दांच्या वापरातूनच शक्य होतात.

गंमत अशी की, ही चिह्न म्हणजेच काही वस्तू, काही शब्द, काही वाक्य, काही विषय आणि त्यामागोमाग येणारे त्याचे संकेत हे आपल्या बालवयापासून आपल्याबरोबर आपल्या स्मृतींचा भाग होऊन जातात. शाळेत असताना एखाद्या स्पर्धेत मिळालेले पहिले बक्षीस, आजोबांनी स्वतः वापरलेला आणि आपल्याला भेट दिलेला क्रिकेटचा लाल चेंडू, एखाद्या मुलीच्या आईने स्वतः शिवलेली आणि नवरात्रीच्या गरब्याच्या वेळी घातलेली पहिली चणिया चोळी. ही सारी प्रतीकेच होऊन जातात. त्या त्या क्षणांशी आपल्याला आजीवन बांधून ठेवतात.

प्रत्येक देश, प्रत्येक धर्म, प्रत्येक संघटना, प्रत्येक उद्योग आपली स्वतःची प्रतीके आणि चिह्ने निर्माण करतात, स्वीकारतात. अशा एका शब्दाचे अथवा शब्दसमूहाचे प्रतीक, एखाद्या वास्तूच्या-इमारतीच्या कमानकलेतील अथवा आरेखित स्वरूपातील आणि परिधान संस्कृतीतील प्रतीक-चिह्नांचा अभ्यास, आपल्याला त्या प्रतीकांच्या मूळ संकल्पनेपर्यंत घेऊन जातो. चिह्ननिमित्त - निमित्त चिह्नया साप्ताहिक लेखमालेतून गेले वर्षभर, आपण अशाच सर्वसमावेशक प्रतीकशास्त्राचा आणि सर्वव्यापी चिह्न संस्कृतीचा आढावा घेतला आहे. गंमत बघा...सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी या निव्वळ दोन संज्ञा - दोन शब्द, या प्रतीके आणि चिह्नसंकेतांचे प्राचीन - वैश्विक स्वरूप स्पष्ट करतात.


आपल्या याच अभ्यासात आपण काही इस्लामिक स्थापत्याचा-प्रथा-परंपरांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. प्रेषित मोहंमद यांनी पहिल्या प्रार्थनास्थळाची निर्मिती केली. असे प्रार्थनास्थळ समाजमंदिर, न्यायालय, शाळा अशा अनेक व्यवस्थांसाठी वापरले जाते. १५ व्या शतकात याच्या स्थापत्याचे निश्चित रूप स्वीकारले गेले.

प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये, त्रिकोण या भूमितीय आकृतीला स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानले गेले. त्याप्रमाणेच इस्लाम धर्मसंकेतानुसार मशिदीचे कळस आणि मिनार यांना काही अर्थसंकेत आहेत. (चित्र क्र. १) मशिदीचा कळस स्त्रीच्या वक्षस्थळाच्या आकाराचा संकेत देतो. इस्लाम धर्मप्रणालीत हे शिखर, विश्वातील स्त्रीतत्त्वाचे आणि तिच्यातील मातृत्वाचे प्रतीक आहे. या कळसाच्या सभोवती नेहमी उंच मिनारांची रचना केलेली असते. या मिनाराचे शीर्ष नेहमी मिनाराच्या व्यासापेक्षा थोडेसे जास्त रुंद असते. हे उंच मिनार, इस्लाम धर्मप्रणालीनुसार पुरुषाचे जननक्षम लिंग म्हणजेच पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानले गेले.

मशिदीच्या कळसावर टोकदार आरीवर बसवलेला चांदतारा नेहमी दिसतो. हे इस्लाम धर्मप्रणालीतील दुसरे सर्वपरिचित प्रतीक आहे. दररोज उगवणारा सूर्यतारा, मानवी इतिहासात शक्ती-सामर्थ्य-अधिकार याचे आणि पुरुषत्वाचे प्रतीक म्हणून स्वीकारला गेला आहे. याचबरोबर चंद्र, प्रजननक्षमतेचे आणि स्त्रीत्वाचे प्रतीक म्हणून स्वीकारला गेला आहे. या दोघांचे अस्तित्व खगोलात असले तरी उत्क्रांती काळापासून मानवी अस्तित्वावर यांचा प्रभाव फार मोठा आहे.


इस्लाम धर्म संकल्पनेची स्थापना ज्या भूप्रदेशात झाली तेथील वाळवंटी वातावरणातील पुरुष, स्वतंत्र आणि आक्रमक वृत्तीचा, बलदंड, रांगड्या शरीरयष्टीचा, आत्मविश्वासाने स्पर्धाशील असल्याने बंडखोर अशा व्यक्तिमत्त्वाचा मात्र फार भावनाशील नसलेला असा होता आणि अजूनही आहे. येथील नागरिकांसाठी, प्रकाशाने जग उजळून टाकणारा सूर्य फार उष्ण तापमान निर्माण करणारा, तरीही दैनंदिन जीवनमान कष्टमय करणारा होता. मात्र, त्याचवेळी तो जीवनदातासुद्धा होता. या प्रदेशातील पुरुषांचे व्यक्तिमत्त्व आणि सूर्याचे असे जाणवणारे गुणधर्म यामुळे, इस्लाम धर्मप्रणालीत सूर्य पुरुष तत्त्वाचे प्रतीक म्हणून स्वीकृत झाला.

या प्रदेशातली स्त्री, दैनंदिन जीवनातील प्रत्येक गरजांसाठी पुरुषावर अवलंबून होती. मात्र, ही स्त्री सुंदर आणि निरागस होती, शांत, निष्क्रिय आणि सहनशील असूनही संवेदनशील होती आणि पुरुषांच्या पूर्ण अधीन होती. चंद्राची पृथ्वी प्रदक्षिणा, सूर्याच्या खगोलातील भ्रमंतीवर अवलंबून असलेली आहे. हे चंद्राचे एक प्रकारचे अवलंबित्व आहे. सूर्यप्रकाश सौम्यपणे परावर्तित करणारा चंद्र सूर्याइतका सक्रिय नाही. मात्र, हा चंद्र पृथ्वीवरील समुद्राची भरती-ओहोटी नियंत्रित करतो. स्त्रीच्या रजोधर्माचा म्हणजे मासिक पाळीचा कालावधी २५ ते ३४ दिवसांचा असतो, तर चंद्राच्या एका पृथ्वीप्रदक्षिणेचा कालावधी साधारण २८ दिवसांचा असतो. इस्लामिक पंचांग आणि व्रत-वैकल्ये चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर बेतलेले असतात. चंद्राला मानवी मनाचा कारक म्हटले जाते. या सर्व खगोलीय गुणधर्मांमुळे, चंद्राला इस्लाम धर्मप्रणालीनुसार स्त्रीतत्त्वाचे प्रतीक मानले गेले.

इस्लाम धर्मप्रणालीतील या सूर्य-चंद्र रुपकांना जरी पुरुष आणि स्त्री तत्त्वाचे प्रतीक मानले गेले, तरी चांदतारा हे प्रतीक, तुर्कस्तानातील ओटोमान साम्राज्याच्या इस्लामची धर्मप्रणाली स्वीकारलेल्या राज्यकर्त्यांनी साधारण एकोणिसाव्या शतकात स्वीकारले होते. साधारण विसाव्या शतकाच्या मध्यावर हा चांदतारा जगभरातील इस्लामी श्रद्धेचे प्रतीक बनला. या चांदतार्‍याचे चिह्नसंकेत फार विलक्षण आणि फार गहन आहेत. खगोल विज्ञानानुसार चंद्रग्रहणाच्या स्थितीत पौर्णिमेचा चंद्र-पृथ्वी आणि सूर्य एका रेषेत येतात त्यावेळीच चंद्रग्रहण होते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्यामुळे पूर्ण चंद्रावर पृथ्वीची छाया पडते. मात्र, इस्लामिक चांदतार्‍याची मांडणी वेगळी आहे आणि म्हणून त्याचे संकेत वेगळे आहेत.


 

वरील चित्र क्र. २ मध्ये दिसणारे काळे चिह्न हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे. दर्शकाला दिसावे म्हणून पांढर्‍या कागदाच्या पार्श्वभूमीवर चंद्राचे हे प्रतीक काळ्या रंगात आहे. यातील पंचकोनी चांदणी हे अल्लाहचे म्हणजेच पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. (चित्र क्र. ३) अल्लाह हा शब्द अलइलअहअसा आहे. या एकेका अक्षराचा विस्तार, पंचमहाभूते या संकल्पनेतील एकेका तत्त्वाचा संकेत आहे. यातील पहिले अक्षर म्हणजे आब- पाणी. यातील दुसरे अक्षर म्हणजे लब - भूमी. तिसरे अक्षर म्हणजे इला’-पाणी. यातील पाचवे अक्षर म्हणजे आसमान-आकाश. यातील सहावे शेवटचे अक्षर म्हणजे हरक-अग्नी.


 

इस्लामिक धर्मप्रणालीत चंद्र हा स्त्रीतत्त्वाचे प्रतीक आहे. पौर्णिमेच्या चंद्रावरील म्हणजेच स्त्रीतत्त्वाच्या प्रतीकावर ग्रहण स्थितीतील पंचकोनी तारा हा त्या तत्त्वाला झाकून टाकतो आहे. (चित्र क्र.३) हा पंचकोनी तारा, सर्वशक्तिमान ईश्वर-अल्ला म्हणजेच सूर्याचे अर्थात पुरुषतत्त्वाचे प्रतीक आहे. खगोलीय विज्ञानानुसार चंद्र कधीही सूर्याच्या छायेने झाकला जात नाही. त्यामुळेच चांदतार्‍याचे हे चिह्न, वास्तवाच्या आणि निसर्गक्रमाच्या विरोधी संकेतांचे प्रतीक आहे. इस्लामी धर्मप्रणालीतील पुरुषाच्या स्त्रीवरील स्वामित्वाचे, हक्काचे, अधिकाराचे प्रतीक आहे.

पंचकोनी तार्‍याच्या मांडणीनुसार प्रतीकशास्त्रात त्याचे विविध अर्थसंकेत सूचित केले आहेत. चित्र क्र. ३ मधील चांदणीचे टोक वरच्या बाजूला आहे. चित्र क्र. ४ मधील चांदणीचे टोक उलट्या बाजूला म्हणजे खाली आहे. अशी उलटी पंचकोनी चांदणी दुष्ट प्रवृत्तीचे संकेत देते म्हणजेच सैतानाचे प्रतीक मानले जाते.

इस्लाम धर्मप्रणालीतील पुरुषी वर्चस्वाचे संकेत स्त्रियांच्या परिधानातसुद्धा दिसून येतात. या धर्मप्रणालीत परंपरेने, स्त्रियांनी आपला देह पूर्ण झाकून घेणे अनिवार्य असते आणि शरियाकायद्यानुसार बंधनकारक असते. या परिधान परंपरेचा अवमान शिक्षेस पात्र असतो. इस्लाम धर्मप्रणालीतील पंथ-संप्रदायानुसार, त्यांच्या निवासी प्रदेशागणिक या मुस्लीम स्त्रियांच्या परिधानाचे विविध प्रकार आहेत. चित्र क्र. ५ मध्येे तोंड मोकळे ठेवणारा हिजाब आहे. चित्र क्र. ६ मध्ये फक्त डोळे दिसतील, असा नकाब आहे. चित्र क्र. ७ मध्ये चेहर्‍यासह संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा आहे.

वस्तूकला - प्रतीके आणि चिह्ने - परिधान या सर्व माध्यमातून इस्लामिक चिह्नसंकेतांचा होणारा हा परिचय फार अनोखा आहे, हे निश्चित...!!

७४००१७३६३७