बदलापुरातील जलप्रलय आणि रा. स्व. संघाचे मदतकार्य

    दिनांक  03-Aug-2019 18:54:36
आपत्ती नैसर्गिक असो वा मानवी
, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक सदैव मदतीसाठी तत्पर असतात. याचाच प्रत्यय दि. २६-२७ जुलै रोजी झालेल्या बदलापूरमधील मुसळधार पावसादरम्यानही आला. त्यावेळी स्वयंसेवकांनी राबविलेल्या मदतकार्याची माहिती देणारा हा लेख...

शुक्रवार, दि. २६ जुलैपासूनच तसा पाऊस सुरू झाला होता. पण, त्यावेळी पूरपरिस्थितीची काही चर्चा नव्हती आणि तसे दुपारपर्यंत वातावरणही नव्हते. पण, जसजशी रात्र व्हायला लागली, तसतसा पावसाचा जोर अधिकच वाढला आणि ऑफिसमधून परतणार्‍या चाकरमान्यांकडून लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत, असे संदेश यायला लागले आणि पावसाच्या रौद्ररूपाची कल्पना यायला लागली. साधारण मध्यरात्रीपासून बदलापूर पश्चिम येथील सखल भागात पाणी साचायला लागले आणि पहाटे पहाटे महालक्ष्मी एक्सप्रेस काही तासांपासून अडकली आहे, असे काही स्वयंसेवकांनी सांगितले. तोपर्यंत दूरचित्रवाणीवर ही बातमी आली. रात्री साडे नऊ-दहापासून अंबरनाथ ते बदलापूरमध्ये अडकलेली लोकलही सकाळी ४ च्या सुमारास बदलापूरला पोहोचली. वरील सर्व परिस्थितीचा अंदाज आल्यावर सकाळी ८ च्या सुमारास बदलापूर स्टेशन येथे भेटावे, असे निरोप पाठवून सर्व स्वयंसेवक तेथे जमा झाले.


एक्सप्रेस अडकली होती, पण तिथपर्यंत कोणी जाऊ शकत नव्हते. कारण पाण्याची पातळी आणि प्रवाह जास्त होता. पहाटेपासूनच पोलीस, स्थानिक सरकारी प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले होते. काही वेळातच परिस्थितीचा अंदाज घेऊन हेलिकॉप्टर (हवाईमार्गे) घेऊन एनडीआरएफ आणि नेव्हीची टीम तेथे दाखल झाली आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याची योजना आखून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इतक्या वेळेपासून अडकलेल्या प्रवाशांसाठी रा. स्व. संघ जनकल्याण समिती समाजाबरोबर प्रत्यक्ष मदतकार्याची योजना आखून कामाला जुंपली.


सगळ्यात प्रथम अडकलेल्या प्रवाशांना थांबण्यासाठी सरकारी प्रतिनिधींनी जवळच हॉल उपलब्ध करून घेतला. स्वयंसेवकांनी आलेल्या प्रवाशांसाठी स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन सगळ्यांना पाणी पुरवण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर प्रत्येक प्रवाशाच्या न्याहारीची व्यवस्था करण्यात आली. एकूण दोन तुकड्यांमध्ये स्वयंसेवकांची विभागणी करण्यात आली होती. एक तुकडी प्रत्यक्ष घटनास्थळी व्यवस्था करण्यात गुंतली होती आणि दुसरी तुकडी शहरामध्ये कार्यरत होती.

शहरातील तुकडीला जसे घटनास्थळावरून निरोप येत होते, तसे ती त्याच्या पूर्ततेसाठी शहरातून मदत गोळा करत होती. सर्व प्रवाशांसाठी पाणी आणि न्याहारी (Food Packets) गोळा करणे अत्यंत आवश्यक होते. कमीत कमी वेळात न्याहारी जमा करणे आणि घटनास्थळी पोहोचविणे, हे काम शहरातील तुकडी (टीम) करत होती. शहरातील स्वयंसेवकांनी आवाहन केल्यावर तासाभरात घराघरातून पोळ्या जमा करण्यात आल्या. त्याचबरोबर कोरडी आणि Food Packets प्रवाशांना देण्यासाठी तयार करण्यात आले व प्रत्येक प्रवाशाला आपुलकीच्या भावनेतून साहाय्य करण्यासाठी समाज संघाबरोबर उभा राहिला. हे सगळे चालू असताना स्थानिक गावकरी, आजूबाजूला राहणारे रहिवाशीसुद्धा स्वतःहून मदत करत होते. कोणी चहा, बिस्किटे देत होते, तर काही लोक केळी आणि न्याहारी आणून देत होते.


शहरी भागातून चहा, न्याहारी (Food Packtets), पाणी याची व्यवस्था लावल्यानंतर पुढील प्रश्न होता की, प्रवाशांचा पुढील प्रवास कसा होईल? मग स्थानिक आणि शहरातील लोकांशी बोलून बसेस आणि स्वयंसेवकांच्या गाड्यांची व्यवस्था केली. घटनास्थळी चहा, नाश्ता झाल्यानंतर प्रवाशांच्या गरजेनुसार त्यांंना बस आणि कारने बदलापूर किंवा कल्याण स्टेशनवर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. अशाप्रकारे सर्व प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार बदलापूर किंवा कल्याण स्टेशनला सोडण्यात आले. बसेसची व्यवस्था योगी अरविंद गुरुकुल, गुरुकुल इंटरनॅशनल, स्थानिक संस्था, पोलीस आणि महामंडळाने केली. साधारण संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही सर्व व्यवस्था चालू होती. नौदलाची शेवटची बोट आल्यानंतर सगळ्यांना (पोलीस, एनडीआरएफ, नेव्ही, प्रशासन) चहा, नाश्ता, जेवण आवश्यकतेनुसार देऊन स्वयंसेवक पुढील मदतकार्यासाठी बदलापूर पश्चिमेला पोहोचले. तोपर्यंत शनिवारचे संध्याकाळचे ६ वाजले होते.

बदलापूर पश्चिमेला काही सखल भागांमध्ये ५ फुटांपासून १५ फुटांपर्यंत पाणी साचले होते. तळमजल्यावरचे रहिवाशी पहिल्या किंवा दुसर्‍या मजल्यावर राहायला गेले. बहुतेक सर्वच भागांत पाण्याची उंची वाढल्यामुळे कोणालाच जाता येत नव्हते. पुढील कार्ययोजनेची छोटीशी बैठक झाली व पुढे काय करता येईल, याबाबतचा निर्णय झाला.

शुक्रवार २६ जुलै रोजी रात्रीपासून पश्चिमेला लाईट नसल्यामुळे अनेक जणांचे भ्रमणध्वनी बंद झाले होते आणि लाईटही येतील, याची शक्यता नव्हती. ज्या भागांमध्ये कमी पाणी होते, तेथेच काही करणे शक्य होते.

परत एकदा स्वयंसेवकांना व समाजाला आवाहन करून रात्रीसाठी पाणी, मेणबत्त्या आणि आगपेटी जमवण्याची व्यवस्था करण्यात आली. वरील साहित्य जमा झाल्यावर कमी पाणी असलेल्या भागात स्वयंसेवक घरांमध्ये ३ ते ४ फूट पाण्यातून वाट काढत रात्री १२ वाजेपर्यंत पाणी, मेणबत्त्या आणि आगपेट्यांचे वाटप करत होते. प्रत्येक घरात किमान दोन मेणबत्त्या व एक आगपेटी असे वाटप करण्यात आले.

दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवार, २८ जुलै रोजी सकाळपासून प्रभात शाखेतील काही स्वयंसेवक पाणी किती ओसरले, याचा अंदाज घेऊन आले आणि पुढील योजना आखण्यात आली. फिरत असताना लक्षात आले की, नदीच्या जवळ ज्या चाळी आहेत, तेथील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरातील सर्व सामान ओले झाले होते व रविवारी सकाळी पाणी ओसरल्यावर लोकांनी आपापल्या घरी येऊन साफसफाईची सुरुवात केली होती.

अशा सर्व चाळींमध्ये स्वयंसेवक जाऊन आले व घरांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्याचे ठरवण्यात आले. नेहमीच्या झटपट रचनेचा उपयोग करून दुपारी १२.३० पर्यंत पोळ्या आणि भाजी जमा करण्यात आले. वस्तीमध्ये दुपारी प्रत्येकाला जेवण दिले गेले. पोळी भाजीनंतर सगळ्यांना खिचडीचेही वाटप करण्यात आले. लहान मुलांना न्याहारी म्हणून बिस्किटेही देण्यात आली. जेवणाबरोबरच प्यायच्या पाण्याच्या बाटल्या, लाईट नसल्यामुळे परत मेणबत्त्या, आगपेटीही पुरविण्यात आले.

पूरग्रस्त स्थिर व्हायला अजून वेळ लागणार होता. म्हणून पुढील योजना आखण्यात आली. स्वयंसेवकांनी अधिकाधिक लोकांना संपर्क करून कोरडे धान्य देण्याचे आवाहन केले. त्यांनासुद्धा उत्तम प्रतिसाद देत सांगितल्याप्रमाणे तांदूळ, डाळ, तेल, फोडणीचे साहित्य, मेणबत्त्या आणि आगपेटी अशी पाकिटे सोमवार, २९ जुलै सकाळी ११ पर्यंत जमा करण्यात आली. अशी जमा झालेली पाकिटे, पूरग्रस्तांना दुपारी वाटण्यात आली. तोपर्यंत प्रशासनाची यंत्रणा कार्यान्वित झाली होती.

अशाच प्रकारे उल्हासनगरमधील स्वयंसेवकांनी म्हारळ गावातील पूरग्रस्तांची दोन्ही दिवस व्यवस्था केली होती. या सर्व मदतकार्यात स्वयंसेवक तर अग्रेसर होतेच, पण समाजसुद्धा मदतीसाठी खारीचा वाटा उचलत होता. साधारण १५०० पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यात आली आणि सेवेसाठी उल्हासनगर (म्हारल) आणि बदलापूरमध्ये साधारण ७० कार्यकर्ते सक्रीय होते.

अनेक जण संघातील स्वयंसेवकांना काय मदत पाहिजे, आम्ही काय करू शकतो याची विचारपूस करून मदतकार्यात सहभागी होत होते. अर्थातच स्थानिक आमदार, प्रशासकीय यंत्रणा यांच्या सहकार्याने पूरग्रस्तांना पूर्वपदावर आणण्यासाठी समाज प्रयत्न करत होता आणि हळूहळू सर्व परत पूर्वपदावर येत आहे.

अभिजित चांदेकर