'चेक' इट आऊट!

    दिनांक  29-Aug-2019 21:47:49   चेक अर्थात धनादेशाचा वापर हा काही अनुभवी जनांच्या दृष्टीने सोपा आणि वर्षानुवर्षाच्या कामकाजाचा भाग असला, तरीही आजच्या तरुण पिढीचा धनादेशाशी फारसा संबंध येत नाही. पण, काही आर्थिक व्यवहारांसाठी मात्र धनादेशाचीच मागणी केली जाते. त्यामुळे धनादेशाचा एकूणच वापर, प्रकार, नियमावली इत्यादींची खासकरुन तरुणांसाठी माहिती देणारा हा लेख...


भारतीयांना आता पैसे देण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी म्हणा बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पैसे रोखही देता येतात, पण रोखीच्या व्यवहारांवरही काही मर्यादा आहेत.डेबिट व क्रेडिट कार्ड्सचाही आपण वापर करतो. हल्ली तर 'पेटीएम', गुगल-पे, भीम अ‍ॅप वगैरे मोबाईल अ‍ॅप्सवरुनही सहज आर्थिक व्यवहार केले जातात. पण, नवीन पर्याय आज बहुसंख्येने उपलब्ध असले तरी धनादेशाचा वापर आजही फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. आर्थिक व्यवहारांसाठी एवढे डिजिटल पर्याय उपलब्धहोऊनही धनादेश वापरण्याचे प्रमाण २०१२ ते २०१७ या कालावधीत फक्त १०.८ टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालात उपलब्ध आहे. व्यापारी व छोटे व्यावसायिक आपले व्यवहार धनादेशाद्वारेच करतात. ज्येष्ठ नागरिकही आजही धनादेशचाच वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. कारण, त्यांना मोबाईल आधारित अ‍ॅप वापरणे किंवा डिजिटल पद्धतीने पेमेन्ट करणे सहजासहजी शक्य होत नाही. शैक्षणिक संस्था, कंपन्या, विमा कंपन्या, विम्याचे दावे संमत करणाऱ्या टीपीए कंपन्या व अन्य विविध ठिकाणी त्यांच्याकडून कोणाला जर पेमेन्ट करायचे असेल तर त्याचा/तिचा 'कॅन्सल्ड' धनादेश मागितला जातो.

 

डिजिटल चेक

 

हल्ली सर्व बँकांतर्फे ग्राहकांना 'सीटीएस' (चेक ट्रन्क्शन सिस्टिम) 'डिजिटल चेक'च दिले जातात. या धनादेशामुळे 'चेक क्लिअरिंग' प्रक्रिया कमी वेळेत होते. कलेक्शन शुल्क आकारले जात नाही. धनादेश पडताळणी प्रक्रिया सुलभरीत्या होते. 'क्लिअरिंग' प्रक्रियेत 'सीटीएस' धनादेशाचाच वापर करावा लागतो. स्वत:च्या खात्यातील कॅश काढण्यासाठी 'नॉन-सीटीएस' धनादेश वापरता येतो, पण बँकांनी 'नॉन-सीटीएस' धनादेशची छपाई बंद केली आहे. पूर्वी छापलेले धनादेश जेग्राहकांकडे आहेत, ते वापरून झाल्यानंतर 'नॉन-सीटीएस' धनादेशचे अस्तित्व संपेल. 'सीटीएस' धनादेशांवर बँकेचे बोधचिन्ह 'अल्ट्रा व्हायोलेट' शाईने छापलेले असते. तसेच 'पेन्टोग्राफ'ही छापलेला असतो. तुम्ही या धनादेशाची रंगीत फोटोकॉपी काढली, तर त्यावर तुम्हाला व्हॉइड (VOID) ही अक्षरे दिसतील. तुम्ही जेव्हा कोणालाही देण्यासाठी लिहून ज्या ठिकाणी धनादेश फाडतात तेथे 'सीटीएस २०१०' असे छापलेले असते. जेथे तुम्ही आकड्यात रक्कम लिहिता तेथे 'रूप्पी'चे सिम्बॉल छापलेले असते. खाली सही करण्यासाठी जागा असते. गडद रंगाच्या शाईने धनादेश लिहावा व सही करावी. फिक्कट रंगाच्या शाईने योग्य स्कॅन होत नाही.

 

धनादेशाचे प्रकार

 

क्रॉस्ड चेक (Crossed Cheque) - ज्याच्या नावे धनादेश दिला आहे, त्याच्या खात्यात पैसे जावेत, यासाठी धनादेश'क्रॉस्ड' करावा लागतो. धनादेशच्या डाव्या हाताकडील वरील भागाच्या कोपऱ्यात तिरप्या एक किंवा दोन रेषा काढाव्यात. असे केल्यावर तो धनादेश 'क्रॉस्ड' असल्याचे समजते. या दोन रेषांच्या मध्ये ग्राहक 'अकाऊंट पेई,' 'पेईज अकाऊंट,' 'नॉन निगोशिएबल' अशा सूचना (कोणतीही एक) देऊ शकतात, पण सूचना न देता केवळ रेषा काढल्या तरी तो धनादेश 'क्रॉस्ड' म्हणून गणला जातो.

 

बेअरर चेक

 

या धनादेशाचे पैसे जो कोणी हा धनादेश घेऊन येईल, त्याला मिळू शकतात. फक्त पैसे घेताना त्याला धनादेशाच्या मागे सही करावी लागते. या धनादेशाबाबत फार सुरक्षितता बाळगावी लागते. जर धनादेश कुठेतरी पडला, गहाळ झाला व तो कोणाला तरी मिळाला, तर ती व्यक्ती बँकेत जाऊन पैसे घेऊ शकते.

 

ऑर्डर चेक

 

या प्रकारात विशिष्ट व्यक्तीलाच पेमेन्ट केले जाते, तसेच प्रत्येक धनादेशावर उजव्या बाजूस 'बेअरर' हा शब्द असतो, त्यावर रेघ मारावी लागते. ही रेघ मारणे म्हणजे चेक 'बेअरर' नसून 'ऑर्डर' होतो. 'बेअरर' शब्दावर रेघ मारल्यानंतर त्यावर 'ऑर्डर' लिहिले अथवा नाही लिहिले तरी चालते. ग्राहक धनादेश 'क्रॉस्ड' व 'ऑर्डर' दोन्ही करू शकतात वा नुसता 'बेअरर' ठेवू शकता. 'बेअरर' व 'ऑर्डर' धनादेश 'ओपन चेक' म्हणून ओळखले जातात. धनादेश 'क्रॉस्ड' केलेला नसेल, पण 'ऑर्डर' केलेला आहे, तर ज्याच्या नावे हा धनादेश काढण्यात आला आहे, त्याला काऊंटरवर पैसे मिळू शकतात. फक्त त्या पैशाची मागणी करणाऱ्याला आपली ओळख पटवून द्यावी लागते.

 

लूज चेक (Loose Cheque)

 

तुम्ही नवीन चेकबुकसाठी मागणी करता तेव्हा तुम्हाला नवीन चेकबुक मिळायला किमान पाच दिवस लागतात. कारण, हल्ली चेकबुकवर ग्राहकाचे नाव छापलेले असते. या मध्यंतरीच्या काळात तुम्हाला जर धनादेशाची गरज पडली, तर तुम्ही बँकेकडे एक 'लूज चेक' मागू शकता. यासाठी शुल्क आकारले जाते. उदाहरण द्यायचे तर 'आयसीआयसीआय' बँक प्रत्येक 'लूज चेक'साठी २५ रुपये शुल्क आकारते.

 

धनादेशच्या वापराबद्दल घ्यायची काळजी

 

धनादेश कोणाला दिला, किती रकमेचा दिला, कोणत्या तारखेला दिला, धनादेशचाक्रमांक हा तपशील लिहिण्याची सोय चेकबुकमध्ये आहे. त्याचा योग्य वापर करावा. नवीन चेकबुक आल्यानंतर त्यात असलेला प्रत्येक चेक मोजा. चेकबुकवर जेवढी चेकची संख्या लिहिली आहे, तेवढे चेक आहेत याची खात्री करा. चेक कमी असल्यास बँकेत लगेच कळवा. चेकबुक सुरक्षित ठिकाणी ठेवा. कधीही कोरे चेक सही करून ठेवू नका. चेकवर रक्कम आकड्यात किंवा शब्दात लिहायला आकडे तसेच शब्द जवळजवळ लिहा शब्द व आकडे लिहून पूर्ण झाले की लगेच तेथे आडवी ओळ आखा, तर तुमचा एखाद्या चेक किंवा बुक हरविले तर बँकेस तात्काळ 'स्टॉप पेमेंट'च्या सूचना द्या.

 

धनादेश न वठल्यास काय करावे?

 

भारतात धनादेशाद्वारे व्यवहार १८८१च्या 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट' कायद्याने चालतात. तसेच याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचेही काही नियम आहेत. धनादेश न वठण्याची बरीच कारणे आहेत. धनादेशावर ज्याने सही केली आहे, ती सही जर बँकेच्या रेकॉर्डवर असलेल्या सहीशी जुळत नसेल, तर असा चेक बँक 'क्लिअर' करीत नाहीत. धनादेशावर असलेल्या रकमेइतकी शिल्लक जर खात्यात नसेल, तर धनादेश नक्कीच वठत नाही. धनादेश वठला नाही, तर ज्या बँकेचा धनादेशआहे, ती बँक आपल्या ग्राहकाला शुल्क आकारते आणि धनादेशाच्या आधारे ज्या बँकेत तो भरला आहे, ती बँक धनादेश भरणाऱ्याला शुल्क आकारते. धनादेशदेणाऱ्याच्या व घेणाऱ्याच्या 'के्रडिट स्कोअर'वर परिणाम होऊ शकतो. पैसे नसल्यामुळे जर धनादेश वठलेला नसेल, तर 'के्रडिट स्कोअर'वर परिणाम होतो. जर फसविण्याच्या उद्देशाने धनादेश दिलेला असेल, तर अशा धनादेश देणाऱ्यावर फौजदारी कारवाई होऊशकते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट कायद्याच्या 'कलम १३८' नुसार तसेच 'इंडियन पिनल कोड १९६०'च्या 'कलम ४१७' व 'कलम ४२०' अन्वये कारवाई होऊ शकते. त्यामुळे खात्यात पैसे नसताना कुणालाही धनादेश देऊन फसवू नका. हा गुन्हा करणाऱ्याला दोन वर्ष कारावासाची व धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून भरण्याची शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा टाळायची असेल, तर ज्याचा धनादेश पैशांच्या कमतरतेमुळे वठलेला नाही, अशा व्यक्तीने तीन महिन्यांच्या आत जर दुसरा धनादेश दिला व तो जर वठला, तर मात्र शिक्षेतून सुटका होऊ शकते. जर एखाद्या खातेदाराचे धनादेशवरचेवर 'क्लिअर' होत नसती तर अशांना खातेदाराची बँक चेकबुक देण्याचे बंद करू शकते. पण, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जर एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचे धनादेश जर चारहून अधिक वेळा वठले नाही, तर बँक अशा खातेदारांना चेकबुक देणे बंद करू शकते.

 

धनादेशवठणार किंवा वठणार नाही, हे प्रश्नचिन्ह असते म्हणून काही ठिकाणी 'पे ऑर्डर' (बँकर्स चेक) तसेच 'डिमांड ड्राफ्ट'च स्वीकारले जातात. 'पे ऑर्डर' शहरातल्या शहरातील व्यवहारांसाठी असतात, तर 'डिमांड ड्राप्ट' भारतातील कुठल्याही भागातील व्यवहारांसाठी असतात. यात 'पे ऑर्डर' किंवा 'डिमांड ड्राफ्ट' ज्या रकमेचा असतो तितकी रक्कम तो देणाऱ्या बँकेत मिळालेली असते. त्यामुळे हे पैशांअभावी किंवा कशाच्याही अभावी वठले नाहीत, असे होत नाहीत. हे घेण्यासाठी घेणाऱ्याला बँकेला कमिशन द्यावे लागते. याशिवाय कमी रक्कम असेल तर 'एनईएफटी'ने व जास्त रक्कम असेल तर 'आरटीजीएस'ने पैसे पाठविता येतात. हे व्यवहार रिझर्व्ह बँकेमार्फत बँका-बँकांत होतात आणि अतिशय सुरक्षित आहेत. या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारू नये, असा फतवाही रिझर्व्ह बँकेने काढला आहे.