पुलांच्या पुनर्बांधणीसाठी २०० कोटींचा प्रस्ताव

    दिनांक  29-Aug-2019 20:49:10नाशिक : शहरातून प्रवाहित होणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला असता या पुरात बुडणाऱ्या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी २०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करण्याची तयारी महापालिका प्रशासनामार्फत केली जात आहे. कोकण व उर्वरित महाराष्ट्रासाठी शासनाच्या वतीने मंजूर केलेल्या २१०५ कोटी रुपयांच्या पूरहानी मदत निधीतून ही कामे करण्याचे प्रस्तावित आहे. यावर्षीच्या पावसात गोदावरी नदीवरील रामसेतू पूल, मिलिंदनगर, संभाजीनगर, फॉरेस्ट नर्सरी पूल तसेच आसारामबापू पूल व घारपुरे घाट येथील सिद्धेश्वर मंदिरालगतचा पूल हे सर्व पाण्याखाली गेले होते. अपवाद होळकर पूल तेवढा सुरू होता.

 

या पुलांची पुनर्बांधणी करावी तसेच केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेने दिलेल्या अहवालानुसार गोदावरी नदीपात्रातील विविध बंधारे काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आ. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तीन टप्प्यांत कामे करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

 

पहिल्या टप्प्यात गोदावरी व नंदिनी नदीवरील पुलांची पुनर्बांधणी कामांसाठी ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात सहा नवीन पुलांची उभारणी केली जाणार असून, त्यासाठीदेखील ७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तिसऱ्या टप्प्यात गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या किनारी विविध ठिकाणी गॅबियन वॉलचे बांधकाम केले जाणार असून, त्यासाठी ५० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. असा एकूण २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर केला जाणार आहे.

 

येथे होणार पूल बांधणी

 

- नंदिनी नदीवर सुला वाइन्स चौकाजवळ पूल (४.२५ कोटी)

- जेहान सर्कलकडून येणाऱ्या ३० मीटर डीपी रोडवर पूल (२१ कोटी)

- रामवाडी येथे गोदावरी नदीवर पूल बांधणे (२१ कोटी)

- वालदेवी नदीवर वडनेर येथे पूल बांधणे (११ कोटी)

- दाढेगाव येथे वालदेवी नदीवर पूल बांधणे (११ कोटी)

- नंदिनी नदीवर तुपसाखरे लॉन्स येथे पूल बांधणे (५ कोटी)