गणपती बाप्पा निघाले काश्मीरला

    दिनांक  28-Aug-2019 11:44:39

कलम ३७० रद्द झाल्यांनतर आता जम्मू-काश्मीरमधील जीवन पूर्ववत होत आहे. अशातच त्याभागातील नागरिकांमध्ये बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली असल्याचे दिसून येते. पाकिस्तानच्या सीमाभागातील कुरापती कलम ३७० रद्द केल्यापासून वाढल्या आहेत. त्यामुळे सीमाभागात वारंवार त्यांच्या कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. अशात आता त्याभागात साजरा होणार गणेशोत्सव भारतीय सैन्याबरोबरच नागरिकांचेही मनोबल वाढविणारा ठरणार आहे.

 

जम्मू काश्मीर सीमेवरील 'बॉर्डरचा राजा' म्हणून ओळखली जाणारी बाप्पाची मूर्ती जल्लोषात काश्मीरकडे रवाना करण्यात आली. हा बाप्पा रेल्वेने काश्मीरकडे रवाना करण्यात आला आहे. गणेशमूर्तीच्या प्रस्थानापूर्वी कलाकारांनी बॉर्डरचा राजा चालला काश्मीरला असे सांगणारी भव्य रांगोळी रेखाटली. यामध्ये भारताचा नकाशा रेखाटला होता.


 

'शिवदुर्गा भैरव ट्रस्ट'कडून दरवर्षी पूंछ याठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. गेल्या १० वर्षांपासून याठिकाणी गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. किरण ईशर यांनी मुंबईतून गणपतीच्या ३ मूर्ती घेतल्या आहेत. बाप्पाची मूर्ती काश्मीरला पोहोचताच भारतीय सैन्याच्या कडेकोट सुरक्षेत ती पूंछकडे पाठवली जाते. सीमेवरील सैन्याचे मनोबल आणि धैर्य वाढविण्यासाठी दरवर्षी याठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. यामुळे याठिकाणी असणारे नागरिकही १० दिवस जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात.


 

महाराष्ट्रासह देशभरात गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. देशात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतो. आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून येत्या सोमवारी बाप्पाचे आगमन होणार आहे. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती तणावग्रस्त असली तरीही याठिकाणीही गणेशोत्सवाची आतुरता असल्याचे दिसून येते.