यांची ‘चाक’च मुळी वाकडी!

    दिनांक  28-Aug-2019 21:32:35   "मुख्यमंत्र्यांना जर आघाडी सरकारच्या काळात पोलिओ डोस मिळाला नसता तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते," असे अभद्र विधान केले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी. हे ऐकून एकाच वेळी मनात अनेक प्रश्न उभे राहिले. पहिला प्रश्न - ७० वर्षांत लोकशाही होती ना? लोकांचे लोकांसाठीचे सरकार होते ना? मग आघाडी सरकारने लोकांसाठी ज्या काही योजना केल्या असतील, त्या पक्षाच्या खिशातून केल्या होत्या का? काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार संविधानावर चालायचे की, मनात येईल तसे सरंजामशाहीने चालायचे? तसेच आघाडी सरकार हे लोकशाहीतूनच जन्माला आले होते. मात्र, रूपाली चाकणकरांना वाटले की, आघाडी सरकार म्हणजे सरंजामशाहीच होती. त्यामुळे लोकांना पल्स पोलिओचा डोस दिला म्हणजे आघाडी सरकारने फार मोठे उपकार केले, हा त्यांचा भ्रम. कदाचित रूपाली यांना हे ठाऊक नसावे की जनतेला सुविधा देणे, हे कोणत्याही सरकारचे कामच असते, ते उपकार नसतात. दुसरे असे की, रूपाली यांच्या वक्तव्यावरून वाटते की, दिव्यांग व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात कमालीची नकारात्मक तिरस्काराची भावना आहे. असो, पल्स पोलिओ मिळाला नाही म्हणून दुर्दैवाने जे दिव्यांग होतात, ते रूपाली यांच्या मते वेडेवाकडे असतात. छे, ही कुठली विकृत मानसिकता? इतक्या शून्य संवेदनशीलतेची व्यक्ती राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आहेत? शोषित, वंचित आणि परिस्थितीने गांजलेल्या लोकांचे दु:ख या काय समजणार? शरीराने वेडेवाकडे असणे, हे तिरस्करणीय आहे का? अर्थात, इथेही प्रश्नच आहे की, रूपाली यांचे म्हणणे इतके मनावर घ्यावे का? पण, असेही वाटते की म्हातारी मेली याचे दु:ख नाही तर काळ सोकावतोय. आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास आहे. मात्र, घाणेरडे बोलून आपण ‘नेते’ होऊ असे मानणारे उथळ लोक राजकारणात गर्दी करत आहेत. या अशा वरचा मजला रिकामा असणाऱ्या अर्थात अकलेचे वांदेे असणाऱ्या किंवा दुर्दैवाने अद्वातद्वा बोलण्याचेच संस्कार झालेल्यांकडून सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा ठेवूच शकत नाही. मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार काढले, याहीपेक्षा पोलिओग्रस्तांसाठी विकृत विधान केले, याबद्दल रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर निषेध!

 

फुलांचा हार की हार?

 

यात्रा-आंदोलनामध्ये भगवा झेंडा वापरा, असा आदेश म्हणे या पक्षाचे काकाराजे अजित पवार यांनी दिला आहे. आता यावर काकाराजेंचेही जे राजेकाका आहेत, त्यांच्याकडून याबाबत काही इशारा, सूचक विधान आलेले नाही. त्यामुळे कळव्याचे राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही तळ्यात-मळ्यात. नाव जितेंद्र असले म्हणून त्यांनी इंद्रिये थोडीच जिंकली आहेत. त्यांना वाटते आहे, आता काय करावे? आंदोलनात भगवे झेंडे घ्यावेत, तर मग मुंब्रा-कौसा भागात काळे झेंडे दिसतील. मग त्यांना खुश करण्यासाठी हिरवा झेंडाही घ्यावा लागेल. पण, मग प्रकाश आंबेडकर लोकांना सांगत सुटतील, ‘बघा, बघा मी म्हणालो नव्हतो का की राष्ट्रवादी जातीयवादी पक्ष आहे.’ हे सगळे टाळण्यासाठी मग निळा झेंडाही घ्यावा लागेल. भगवा, निळा, हिरवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा सगळेच खुश. यावर काही राष्ट्रवादीच्या बुद्धिवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे भगवा तर शिवसेनेचा झेंडा. मग सगळ्यांनाच खुश करायचे आहे तर मनसेचा पंचरंगी झेंडापण घेऊया. हो सगळ्यात बेस्ट भाजपचा झेंडा घ्यायलाच हवा. कारण, त्यांना निवडणुकीमध्ये इतक्या लोकांनी मतं दिली की, त्यांची एकहाती सत्ता आली. भाजपला मत देणाऱ्या अंधभक्तांना फसवूया. आपण आंदोलनात भाजपचा झेंडा पण घेऊया. असो, एकंदर राष्ट्रवादी पक्षाला या कापडाचोपडांचे फार आकर्षण. कधी पुणेरी पगडी, कधी रा. स्व. संघाचा गणवेश यावरच कित्येक वर्ष या पक्षाचे राजकारण सुरू होते. आता यात झेंडाही आला आहे. आंदोलन मोर्चामध्ये भगवा झेंडा घेऊन पक्षाची मानसिकता बदलली असती तर? छे, भगवा रंग त्यागाचे आणि शौर्याचेही प्रतीक. हा त्याग, हे शौर्य सत्ताकारणासाठी सगळ्या प्रकारची लांडीलबाडी करणाऱ्या सत्तापिपासूंना जमेल का? बाकी लोक शहाणे झाले आहेत. अतिरेकी इशरत जहाँचे पालकत्व घेणारे कोण होते आणि मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर हिंदू वस्त्यांचेच नाव घेऊ नका, एखाद्या मुस्लीम वस्तीचेही नाव घ्या, असे आग्रहाने सुचवणारे कोण होते, हे लोक जाणतात. त्यामुळे कोणताही झेंडा घ्या, प्राप्त होणार हारच. पक्षात बरेच वाचाळवीर असल्याने आता हार म्हणजे फुलांचा हार की जिंकण्याच्या विरोधातली हार प्राप्त होईल, यावर चर्चा सुरू आहे म्हणे.