हीच आपली राष्ट्रीय प्रार्थना!

    दिनांक  28-Aug-2019 19:58:46'राष्ट्र' ही संकल्पना आजकाल फारच संकुचित होत चालली आहे. सीमारेषांनी बंदिस्त व स्वल्प विचारांनी आणि मानवी संस्कृतीने परिपूर्ण एखादा जमिनीचा तुकडा म्हणजे 'राष्ट्र' नव्हे. वेदांनी राष्ट्राला विशिष्ट भूभागाच्या मर्यादेतून अलिप्त केले आहे.


मानवी जीवनात प्रार्थनेला सर्वाधिक महत्त्व आहे. एखादा भक्त, उपासक किंवा याचक आपले इप्सित साधण्याकरिता परमेश्वराकडे आर्त विनवणी करतो अथवा पवित्र भावनेने याचना करतो, ती प्रार्थना उचित मानली जाते. प्रकटपणे शुद्ध अंत:करणाने केलेली प्रार्थना ही निश्चितच यशस्वी ठरते. आपल्या प्रार्थनेमागचा उद्देश केवळ स्वार्थापोटी असता कामा नये. समाज, राष्ट्र व वैश्विक सुख-समृद्धीची भावना त्यामागे असेल म्हणजेच परोपकाराची उदात्त कामना त्यामागे असेल, तर ती प्रार्थना खरोखरच सर्वोत्तम मानली जाते. आजकाल केल्या जाणाऱ्या प्रार्थना या पूर्णांशाने सर्वकाल नि:स्वार्थ वृत्तीतून दिसून येत नाहीत. ज्याच्याकडे प्रार्थना केली जाते, त्या शक्तीतदेखील आपल्या प्रिय याचकांचे हित व कल्याण साधण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. म्हणूनच याचक जितका तळमळीचा, तितकाच तो पूर्ण करणारादेखील बलशाली असला पाहिजे. वैदिक राष्ट्रीय प्रार्थनेत केवळ आपल्या देशातच नव्हे तर समग्र भूमंडळाचे संपूर्ण कल्याण साधण्याचे सामर्थ्य आहे, जे की खालील मंत्राच्या द्वारे अभिव्यक्त होते -

 

आ ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी

जायतामा राष्ट्रे राजन्य:।

शूर इषव्योऽतिव्याधी

महारथो जायतां दोग्ध्री ।

धेनुर्वोढाऽनड्वानाशु: सप्ति

पुरान्धिर्योषा जिष्णू रथेष्ठा: ।

सभेयो युवास्य यजमानस्य

वीरो जायतां निकामे निकामे ।

: पर्जन्यो वर्षतु फलवत्यो न औषधय: पच्यन्तां योगक्षमे न: कल्पताम्॥

(यजुर्वेद २२/२२)

 

अन्वयार्थ

 

(हे ब्रह्मन्) हे सर्वदृष्टीने महान परमेश्वरा! (राष्ट्रे) आमच्या राष्ट्रामध्ये (ब्रह्मवर्चसी) विद्या व ब्रह्मतेजाने युक्त (ब्राह्मण) वेद व ईश्वराला जाणणारे विद्वान (आ, जायताम्) चहुबाजूंना निर्माण होवोत.(शूर:) शूर वीर (इषव्य:) बाण वगैरे शस्त्रास्त्रे चालविणारे उत्तम असे(अतिव्याधी) शत्रूंना संपविणाऱ्या कठोर स्वभावाचे (महारथ:) महारथी असे (राजन्य:) राष्ट्रहितकारी क्षत्रिय राजपुत्र (आ, जायताम्) चहुबाजूंनी उत्पन्न होवोत. तसेच आमच्या राष्ट्रात (दोग्ध्री) दूध देणाऱ्या (धेनु:) गायी, (अनड्वान) मोठमोठे बैल, (आशु:) शीघ्रगतीने धावणारे (सप्ति:) घोडे, त्याचबरोबर (पुरन्धि:) सर्व व्यवहारांना धारण करणाऱ्या बुद्धिमती (योषा) स्त्रिया, (अस्य यजमानस्य) या राष्ट्राच्या यजमानरूपी राजाचा (जिष्णु:) शत्रूंना जिंकणारा (सभेय:) सभेमध्ये उत्तम असा (युवा) तरुण युवक (वीर:) वीरपुरुष, पुत्र (आजायताम्) सर्व दृष्टीने जन्माला येवो. तसेच (न:) आम्हा सर्वांच्या (निकामे, निकामे) सर्व इच्छांनी परिपूर्ण अशा कामनांनुसार (पर्जन्य:) मेघदेवता (वर्षतु) बरसत राहो. (ओषधय:) औषधी वनस्पती (फलवत्य:) मोठ्या प्रमाणात फलीभूत होऊन (पच्यन्ताम्) त्या परिपक्व होणाऱ्या ठरोत. अशा प्रकारे (न:) आम्हा राष्ट्रवासीयांचा (योगेक्षेम:) योगक्षेम (कल्पताम्) समर्थ ठरो... पूर्ण होवो.

 

विवेचन

 

'राष्ट्र' ही संकल्पना आजकाल फारच संकुचित होत चालली आहे. सीमारेषांनी बंदिस्त व स्वल्प विचारांनी आणि मानवी संस्कृतीने परिपूर्ण एखादा जमिनीचा तुकडा म्हणजे 'राष्ट्र' नव्हे. वेदांनी राष्ट्राला विशिष्ट भूभागाच्या मर्यादेतून अलिप्त केले आहे. 'राष्ट्र' म्हणजे व्यापक असा समृद्ध विचार आणि संस्कृती होय! त्या दृष्टीने जिथे जिथे मानवाची वस्ती, तेथील भूप्रदेश म्हणजे 'राष्ट्र' होय. म्हणूनच तर समग्र 'पृथ्वी' हे राष्ट्र आहे. अथर्ववेदाच्या बाराव्या कांडातील पहिले सूक्त हे पूर्णपणे 'भूमिसूक्त' (पृथ्वीसूक्त) म्हणून ओळखले जाते. यात समस्त वसुंधरेलाच राष्ट्र मानून तिच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपदेश केला आहे. 'माता भूमि: पुत्रोऽहं पृथिव्या:।' भूमी ही माझी आई आणि मी तिचा पुत्र! असा दिव्य संदेश तेथे मिळतो. असे पृथ्वीस्वरूप राष्ट्र समृद्ध होण्याकरिता कोणकोणत्या बाबींची गरज भासते, या संदर्भात सखोल मार्गदर्शन भूमिसूक्तात झाले आहे. तसेच ऋग्वेदातील पहिल्या अध्यायातील ८० वे सूक्त हेदेखील स्वराज्याची महती सांगणारे आहे. या सूक्तात आम्ही स्वत:चे राज्य (साम्राज्य) विकसित करण्याकरिता कशा प्रकारे प्रयत्न करावा? याचे मौलिक विश्लेषण केले आहे. यजुर्वेदाची वरील राष्ट्रीय प्रार्थना किती उदात्त सर्वव्यापी व सर्वमंगलकारिणी आहे पाहा! मोठ्या यज्ञात, विशाल संमेलनात किंवा उत्सव-पर्वप्रसंगी या प्रार्थनेचे भावार्थासह आम्ही तिचे गायन करतो. त्यातील प्रत्येक मंत्रांश हा विश्वाच्या कल्याणासाठी अतिशय समर्पक असा आहेत्या महान व जगद्व्यापी परमेश्वराकडे या धरणीमातेच्या म्हणजेच भूराष्ट्राच्या मांगल्याकरिता सर्वप्रथम ज्ञानी, सर्वगुणसंपन्न, चारित्र्यवान अशा विद्वानांची मागणी केली आहे. वेदवेत्त्या व ब्रह्मवेत्त्या विचारवंतांची राष्ट्राच्या संचालनाकरिता आवश्यकता असतेे. ज्ञान देणारे सुयोग्य ब्राह्मणच नसतील, तर राष्ट्र कसे काय चालणार? म्हणूनच पहिली कामना ब्रह्मज्ञानी विद्वानांची! कारण, अशा अभ्यासू ब्रह्मतेजयुक्त तत्त्ववेत्त्यामुळे त्या राष्ट्राला सुयोग्य दिशा मिळते. विचार देणारे सर्वोत्तम प्रज्ञावंत, शिक्षक, गुरू, आचार्य आणि तपस्वी वेदज्ञ नसल्यास तेथील नागरिकांना दिशा मिळणार तर कशी? म्हणूनच सद्गुण व सदाचारसंपन्न, धर्मात्मे व उच्च कोटीचे विद्वान् ब्राह्मण हवे! अन्य एका प्रार्थनेतदेखील 'ब्राह्मणा:(सज्जना:) सन्तु निर्भया।' अशी कामना केली आहे.

 
दुसरी आकांक्षा म्हणजे आमच्या देशात शूरवीर क्षत्रिय जन्माला येवोत! 'इषु' म्हणजे तीक्ष्ण असे बाण व इतर शस्त्रास्त्रे... यांना चालविणारे प्रवीण व दक्ष असे धाडसी रणझुंजार वीर हवेत. शत्रुसैनिकांशी दोन हात करणारे 'जिंकू किंवा मरू!' ही ध्येयासक्ती बाळगणारे महारथी असल्यास ते राष्ट्र अंतर्बाह्य सुरक्षित राहील. 'राजन्य:' म्हणजेच क्षत्रिय नरवीर! देश किंवा राष्ट्राला 'क्षत्रात् त्रायन्ते।' म्हणजेच क्षतीपासून रक्षिणारे हे क्षत्रिया:! तिसरी कामना आहे ती राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची! शेती हे मुख्य कर्म असेल, तर ती भूमी सुजलाम् सुफलाम् होऊ शकते आणि तेथील जनता सुखा-समाधानाने राहू शकते. याकरिता तिसऱ्या वैश्य वर्गाकरिता साधने हवीत. म्हणूनच आमच्या देशात गाय, बैल, घोडे इ. प्राणी हवेत. पशुवर्ग हा आमचा सहकारी मित्र! पण, असा तसा नको, तर परिपूर्ण हवा! वांझ गाय, बलहीन बैल आणि अकार्यक्षम घोडे नकोत. अशांमुळे राष्ट्राची कृषी, व्यापार व उद्योग व्यवस्था कोलमडून पडते. यास्तव भरपूर दूध देणाऱ्या दुभत्या गाई, म्हशी, शेळ्या असाव्यात. ओझी वाहणारे, शेतीत राबणारे बलशाही बैल, रेडे, उंट इ. हवेत आणि आशुवेगाने धावणारे घोडे पण हवेत. या सर्व प्राण्यांवरच आमच्या देशाची कृषिव्यवस्था आणि भौतिक प्रगती आधारलेली आहेचौथी प्रार्थना म्हणजे आदर्श स्त्रियांची! ज्या राष्ट्राची स्त्रीशक्ती श्रेष्ठ विचारांना धारण करणारी, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारयुक्त पाककला व गृहव्यवस्थापनेत दक्ष, उत्तम संततीला जन्माला घालणारी बुद्धिसंपन्न असेल तर ते राष्ट्र आपोआपच विकसित होते. म्हणून स्त्रीशक्ती सर्वोत्तम हवी. पाचवी आकांक्षा आहे ती आदर्श सुपुत्रांची! वैदिक राष्ट्र व्यवस्थापनेतील मुले ही शरीर, मन, बुद्धी व आत्मबळाने परिपूर्ण असावेत. युवक हा भविष्याचा शिल्पकार, राष्ट्राचा विधाता आणि निर्माता! म्हणून त्यांच्यात सर्व क्षेत्रात विजय संपादन करण्याची आकांक्षा हवी. तो समरांगणी युद्धासाठी सदैव तत्पर रथावर आरुढ, सभा-संमेलनाच्या सुयोग्य संचालनात आणि वक्त्यांमध्ये अग्रणी व प्रबळ वक्तृत्वकौशल्य बाळगणारा असावा, तसेच तो नेहमी उत्साहशक्ती बाळगणारा आणि युवाशक्तीने परिपूर्ण व्हावा! शेवटची प्रार्थना म्हणजे पर्यावरण रक्षणाची! वेळेवर पाऊस पडो! त्यामुळे या राष्ट्राची वनराई, झाडे, औषधी वनस्पती या नेहमी हिरव्यागार होऊन त्या फळ देणाऱ्या ठरतील. यामुळे एक प्रकारे आमचा निसर्ग सर्वांकरिता नेहमी अनुकूल राहील. वरील सहा-सात बाबींची आपल्या राष्ट्रभूमीत मोठ्या प्रमाणात भरभराट होत राहिली, तर त्या-त्या राष्ट्रवासीयांचा 'योगक्षेम' निश्चितच सफल होईल, अशी ही वैश्विक सुखसमृद्धीची उदात्त आणि सर्व समावेशक मानवतावादी वैदिक प्रार्थना यशस्वी ठरो, हीच कामना...!
 

-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य