कलम ३७० प्रकरणी आज महत्वाचा दिवस : सर्व याचिकांवर होणार आज सुनावणी

28 Aug 2019 15:32:23


 


नवी दिल्ली : मोदी २.० सरकारचा सर्वात महत्वपूर्ण निर्णय मानल्या जाणाऱ्या कलम ३७० प्रकरणाचा आज महत्वाचा दिवस आहे. या प्रकरणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर बुधवारी सुनावणी होणार आहे. आत्तापर्यंत या संबंधात एकूण १४ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकारला यासाठी वेळ द्यायला हवा, असे सांगत न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती.

 

दरम्यान, याचिकाकर्त्यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार मोहम्मद अकबर लोन व हसनैन मसुदी, वकील शाकीर शब्बीर, अॅड. मनोहरलाल शर्मा आदींचा सामावेश आहे. 'काश्मीर टाइम्सच्या संपादक अनुराधा भसीन, पत्रकार राधा कुमार, दिल्ली जामिया विद्यापीठाचे विधी पदवीधर मोहम्मद अलीम यांनीही याचिका दाखल केली आहे. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कोणताही आदेश देण्याचे टाळले होते. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होईपर्यत सरकारला वेळ दिला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मोदी सरकारने काश्मीर प्रश्नावर मंत्रिमंडळ समिती नेमली आहे. यात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, थावरचंद गेहलोत, डॉ. जितेंद्र सिंह, नरेंद्र तोमर, धर्मेंद्र प्रधान आदींचा सामावेश आहे. या मंत्रिमंडळातर्फे काश्मीरच्या विकासाबद्दल निर्णय घेण्यात येईल.

Powered By Sangraha 9.0