गणेशभक्त ‘टोलमुक्त’

    दिनांक  27-Aug-2019 10:08:14 

गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांना टोल माफ 

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांना दि. ३०ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिलीगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी सोमवारी घेतला. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी. पी. जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गाचे देशपांडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


चंद्रकांतदादा पाटील म्हणाले
, “यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ कामे सुरू असून, ती तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार्‍या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरू असून, जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तिथे आवश्यकतेनुसार रोड स्ट्रीप्स, सूचना करणारे फलक, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतिरोधक लावण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.