राज ठाकरे यांच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या

    दिनांक  27-Aug-2019 13:41:14नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक, अशी ओळख असलेले नांदेड मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव (४६) यांनी आत्महत्या केली आहे. विद्यार्थी काळापासून ते राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. राज ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापित केला, त्यावेळी संभाजी जाधवही शिवसेनेतून मनसेत आले होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यावेळी ते काम पाहत होते. शेतकरी असलेले संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढले होते. याच नैराश्यातून त्यांनी आपले आयुष्य संपवले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


नांदेडच्या डौर गावचे रहिवासी असलेले संभाजी जाधव यांची गावातच वडिलोपार्जित जमीन आणि शेती होती. ते शहरातील तरोडा नाका परिसरात राहत. तरोडा नाका परिसरातील राहत्या घरातच मंगळवारी मध्यरात्री त्यांनी गळफास घेतला. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सततच्या दुष्काळाने शेतीवरील कर्ज दिवसेंदिवस वाढत गेले. याच नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर एका कार्यकर्त्यानेदेखील आत्महत्या केली होती.