बळवंत नारायण जोग हे प्रखर हिंदुत्वाचे भाष्यकार : माधव भांडारी

    दिनांक  27-Aug-2019 15:02:33


 
 

'बळवंत नारायण जोग मार्ग, मुंबई ४०००८१'चा नामकरण सोहळा संपन्न

 
 

मुंबई : "बळवंत नारायण जोग यांनी आपल्या आयुष्यात अवलंबलेल्या मार्गामुळे तर्कशुद्ध विचार आणि प्रखर हिंदुत्वाचे भाष्यकार, अशी ओळख निर्माण केली. मुस्लीम समस्येबाबत त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे आता प्रत्यक्षात दिसत आहेत. नव्या पिढीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करायला हवा," असे मत भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले. मुलुंडमध्ये गावदेवी मंदिर ते विराज अपार्टमेंटकडे जाणार्‍या मार्गाच्या उद्घाटनाचा सोहळा मंगळवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. त्यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला.

 

या मार्गाला 'साप्ताहिक विवेक'चे माजी संपादक ज्येष्ठ विचारवंत आणि प्रखर राष्ट्रभक्त ब. ना. जोग यांचे नाव देण्यात आले. येथील चाफेकर बंधू मार्गावरील 'झुणका भाकर' केंद्रासमोरील वैती मंदिराजवळ (गावदेवी मंदिर) हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

 

त्यांच्यासह खा. मनोज कोटक, महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या, आ. तारासिंह यांच्यासह मुंबई महापालिका प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, महापालिका सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, 'साप्ताहिक विवेक'चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर आदी मान्यवर उपस्थित होते. खा. मनोज कोटक म्हणाले की, "या मार्गाला नामकरण म्हणजे ब. ना जोग यांची स्मृती आणि विचार जिवंत ठेवण्याचा एक प्रयत्न आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम करायला हवे."

 

दिलीप करंबेळकर म्हणाले की, "या मार्गाला आपण ब. ना. जोग यांचे नाव देत आहोत. ते ज्या विचाराने आयुष्यभर चालले, तो मार्ग आता महामार्ग बनला आहे, देशाचे नेतृत्व करत आहे. अवहेलना, उपेक्षा यांची तमा न बाळगता सदैव कार्यरत असणार्‍या ब. ना. जोग यांचा हा उचित सन्मान आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. स्थानिक नगरसेवक व प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून हा नामकरण सोहळा संपन्न झाला.


प्रभाकर शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, "माझ्या जीवनात प्रखर राष्ट्रवादाचे बीजारोपण करण्याचे काम ब. ना. जोग यांनी केले. त्यांची स्मृती चिरंतन राहावी, या भूमिकेतून मी या नामकरणासाठी पाठपुरावा केला." या नामकरण सोहळ्याला मुलुंड, भांडुपमधील नागरिक व ब. ना. जोग यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संतोष कुलकर्णी, शांताराम शिंदे व श्रीकांत फौजदार यांनी परिश्रम घेतले.