'सर्वच क्षेत्रात मंदी नाही !' एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांचा दावा

    दिनांक  26-Aug-2019 10:57:15वाहन उद्योग मंदीत येण्याचे 'हे' आहे कारणमुंबई : 'जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असेल तर भारतावर त्याचा परिणाम होणे सहाजिक आहे. वाहन उद्योगात सध्या मंदीचे वातावरण आहे. मात्र, त्यामुळे सर्व क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याचे म्हणणे चुकीचे आहे,' असे मत स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी व्यक्त केले. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक असल्याने जागतिक पातळीवर घडामोडी घडल्या तर त्याचा परिणाम होणे सहाजिक आहे, असेही ते म्हणाले.

 

'केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ३२ घोषणा केल्या आहेत. या उपाययोजना देशाला सद्यस्थितीतून बाहेर काढण्यास उपयोगी ठरतील. देशातील बॅंकिंग आणि कर रचनेत पुढील काळात उद्भवणाऱ्या अडचणी दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

 

वाहन उद्योग मंदीत येण्याचे 'हे'ही आहे कारण

 

वाहन खरेदी करण्यापेक्षा ग्राहक ओला, उबेरमधूव फिरण्यास पसंती देत असल्याने काहीसा फरक पडला आहे. हा एक जागतिक कल असून त्याला भारतही अपवाद नाही,' असेही रजनीश कुमार म्हणाले. देशात चारचाकी वाहने खरेदी करणे आणि त्याचा देखभाल खर्च उचलण्यापेक्षा तिऱ्हाईत कंपनीकडून कार भाड्याने घेण्याचे व्यवसायही गेल्या काही वर्षांमध्ये तेजीत दिसून आले. हा कल जागतिक असल्याने सदृश्य परिणाम भारतातही होत आहेत.

 

'दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेला चालना मिळणार'

भारतीय अर्थव्यवस्था ही 'कॅश इकोनॉमी' म्हणून ओळखली जाते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळातही आलेल्या मंदीत याच कारणामुळे भारतीय अर्थव्यवस्था टीकून होती. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांचा थेट जरी परिणाम होत असला तरीही आगामी सणासुदीच्या काळात विविध क्षेत्रांतील मागणी वाढण्याची शक्यता, कुमार यांनी व्यक्त केली. त्यामुळे चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा दावा त्यांनी केला. देशाच्या आर्थिक स्थितीत बदल घडवण्यासाठी पुढील काळात केंद्र सरकारकडून खर्च वाढवण्यात येणार असून त्याचाही सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, असे ते म्हणाले.