'लक्ष्मी बॉम्ब' च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल

26 Aug 2019 17:37:09


 

राघव लॉरेन्स दिग्दर्शित 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रकाशित झाले आहे. अक्षयकुमार एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटामध्ये कियारा अडवाणी आणि अक्षयकुमार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 'लक्ष्मी बॉम्ब' पुढील वर्षी २२ मे ला म्हणजेच ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे देखील आज जाहीर करण्यात आले आहे. या पूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ५ जून रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता ही बदललेली तारीख जाहीर करण्यात आली.

'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'कंचाना' या चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटाची कथा फरहाद सामजी यांनी लिहिली आहे. या चित्रपटात बऱ्याच काळानंतर आर. माधवन देखील या चित्रपटाच्या माध्यमातून पुनर्पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला एप्रिल महिन्यातच सुरुवात झाली आहे. हा चित्रपट एक विनोदी भयपट असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

या चित्रपटात अक्षयकुमार एका तृतीयपंथियाची भूमिका साकारणार असून कियारा अडवाणी त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा असून विशेष म्हणजे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन चित्रपटात एका विनोदी भुताच्या पात्रात समोर येणार असल्याचीदेखील शक्यता व्यक्त होत आहे.

Powered By Sangraha 9.0