'पापलेट'चे भवितव्य काय ?

    दिनांक  26-Aug-2019 12:46:21

 

पावसाळ्यातील मत्स्यबंदीचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे मासेमारीला सुरुवात झाली आहे. पापलेट हा मासा चवीला रुचकर असल्याने त्याला मोठी मागणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या अनिर्बंध मासेमारीमुळे त्याच्या प्रजोत्पादनावर परिणाम होत आहे. या परिणामांबाबत सांगत आहेत, ज्येष्ठ सागरी संशोधक डॉ. विनय देशमुख

 
 
मत्स्यप्रेमी खवय्यांमध्ये अतिशय आवडीचा ’पापलेट’ मानाचे स्थान मिळवून आहे. म्हणूनच त्यांची युरोप, अमेरिका, सिंगापूर व दुबईला निर्यात होते आणि आपल्या देशाला मौल्यवान परकीय चलन मिळवून देतो. परंतु, दिवसागणिक हा मासा महाग, दुर्मीळ आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडेनासा झाला आहे. मासळी बाजारात चक्कर टाकली, तर मोठ्या आकाराच्या पापलेटपेक्षा त्यांची लहान आकाराची पिल्ले किंवा ज्यांना ‘कावली भिलं’ म्हणतात, तीच जास्त दिसतात. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, हा बहुमूल्य मासा दिवसेंदिवस समुद्रात कमी सापडत असून त्याची विशेषतः महाराष्ट्रातील मासेमारी संकटात सापडली आहे. पापलेट दुर्मीळ का होत चालला आहे ? बाजारात लहान पापलेटचे प्रमाण जास्त का झाले आहे ?
 

आणि पुढे येणार्‍या भविष्यात ही मासेमारी टिकेल की नाही ? याची चिंता मच्छीमारांना सतत भेडसावत आहे. ही बिकट परिस्थिती का उद्भवली याचे उत्तर पापलेटचे उत्पादन, मासेमारीच्या पद्धती व मत्स्यजीवशास्त्राच्या आधारे समजून घेतले, तर आपल्याला भविष्यात त्यावर उपाययोजना करता येतील.

महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात पापलेटचे सरासरी वार्षिक उत्पादन 6 हजार, 320 टन होते. मात्र, 1983 साली आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 19 हजार टन उत्पादन आपल्याला मिळाले. त्यानंतर ते हळूहळू कमी होत गेले. गेल्या दहा वर्षात तर ते धक्कादायकरीत्या रोडावत गेले आहे. 2010 साली पापलेटचे उत्पादन 3 हजार टनांपेक्षाही कमी झाले. म्हणजेच सरासरी वार्षिक उत्पादनापेक्षाही 50 टक्क्यांनी ते कमी झाले होते. ही बाब फारच गंभीर असून जर पापलेटची सद्यस्थितीतील मासेमारी अशीच चालू राहिली तर पुढच्या 15 ते 20 वर्षात हा मासा समुद्रातून नामशेष होईल. त्यामुळे ‘डोल’ व ‘दालदा’ जाळ्याने पापलेट पकडणार्‍या मच्छीमारांवर उपाशी राहण्याची वेळ येईल.

 

पापलेटच्या मासेमारीच्या तीन मुख्य पद्धती आहेत. ‘दालदा,’ ‘डोल’ व ‘ट्रॉलिंग.’ या व्यतिरिक्त इतर जाळ्यात पापलेटचे प्रमाण नगण्य असते. ‘दालदा’ जाळीने पापलेट पकडण्याची सर्वात जुनी व परंपरागत पद्धत. हे जाळे पाण्याच्या पृष्ठभागावर लावले तर त्याला ‘तरती’ आणि समुद्र तळाजवळ लावले तर ‘बुडी’ असेही म्हणतात. जाळ्याचे आस वीतभर रुंद (10-14 सेंमी) इतके मोठे असते. पाण्यात जाळे न दिसल्यामुळे आरपार जाण्याच्या प्रयत्नात पापलेट जाळ्याच्या आसात अडकतो आणि ठराविक आकाराचे पापलेट यात पकडले जातात. आपल्या पूर्वजांनी 10-14 सेंमी या मोठ्या आसांची जाळी बनवली. कारण, लहान पिल्ले जाळ्यातून आरपार निसटून जावीत आणि फार मोठ्या आकाराचे पापलेट जाळ्यांच्या आसात शिरू नयेत. पिल्ले तसेच गाभोळी असलेले मोठे पापलेट पकडले जाऊ नयेत म्हणून ही जाळी शास्त्रीयदृष्ट्या शाश्वत मासेमारीसाठी योग्य आकाराचे पापलेट पकडण्यास सर्वोत्तम अशी आहेत.

‘डोल’ किंवा ‘कव’ जाळ्यांतदेखील पापलेट मिळते. बोंबील, करंदी व जवळ्यासाठी वापरले जाणारे हे जाळे एका प्रचंड आकाराच्या निमुळत्या पिशवीप्रमाणे असते. भरती-ओहोटीच्या प्रवाहामुळे पाण्यात तोंड उघडून सरळ आडवे राहते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर येणारे मासे यात पकडले जातात. प्रवाहाच्या जोरामुळे मासे परत फिरू शकत नाहीत व शेवटच्या भागात म्हणजे खोळ्यात ते अडकून पकडले जातात. याच जाळ्याला भलेमोठे फायबरचे बोये लावून व जाळ्याची लांबी कमी करून वसई-अर्नाळा येथील मच्छीमारांनी ‘कर्ली-डोल’ हे जाळे खास पापलेट पकडण्यासाठी तयार केली आहेत. या जाळ्याच्या वापराला साधारणपणे 1980 साली मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्यानंतर लगेचच म्हणजे 1983 साली पापलेटचे विक्रमी उत्पादन (19 हजार, 405 टन) झाले. या नंतरच्या काळात ज्या बोटीवरून दोन ते तीन जाळी 16 ते 18 वाव खोल पाण्यात वापरली जात असत, तेथे मच्छीमार हव्यासापोटी 16 ते 18 जाळी वापरू लागले. पाण्यातून जाळी खेचून काढताना बोटीचा आकार कमी पडू लागला. तेव्हा डोलीच्या छोट्या बोटीऐवजी मागच्या बाजूला डेक असलेले पडाव किंवा गलबतासारखे मोठे बलाव तयार करण्यात येऊ लागले. तसेच लाकडी फाटा वापरून जाळी लावायची जुनी पद्धत मागे पडून यंत्राद्वारे पाइप मारायची पद्धत अंमलात आणली गेली. भरती आणि ओहोटीच्या मधल्या अवधीत लवकरात लवकर जाळी खेचता यावी म्हणून इंजिनाला ड्रम-विंच जोडून जाळी खेचण्याची यांत्रिक पद्धत विकसित करण्यात आली. त्यामुळे गेली दहा वर्षे प्रत्येक बलावातून 27 ते 30 जाळी वापरली जात आहेत. वसई, उत्तन व अर्नाळा भागात आधी जिथे 200-250 बोटीतून 600 ते 900 जाळी वापरली जायची तिथे आता दहा ते पंधरा हजार ‘कर्ली डोल’ जाळी पापलेट पकडण्यासाठी वापरात येऊ लागली. जाळी लावण्यासाठी जागा अपुरी पडल्यामुळे मच्छीमार थेट गुजरातमधून जाफराबादपर्यंत जाऊ लागले आहेत.

 

‘कर्ली-डोल’ जाळ्या भरती व ओहोटीला दोन्हीवेळा वापरल्या जातात. या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या मासेमारीमुळे पापलेटच्या नैसर्गिक साठ्यांवर अनिष्ट परिणाम होऊ लागला. याचा परिणाम लगेचच दिसून आला आणि पापलेटचे वार्षिक उत्पादन घटले. 1983 मध्ये सर्वोच्च असलेले 19 हजार टन उत्पादन लगेचच दुसर्‍या वर्षी 16 हजार टन, 1985 मध्ये 8 हजार टन आणि 1986 च्या सुमारास 6 हजार टनांवर घसरले. 1994-95 नंतर ते क़्वचितच 5 हजार टनांवर गेले आणि 2008 नंतर 3 हजार टनांवर घसरले. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त (51 टक्के) पापलेट डोल जाळ्याने पकडले गेले आणि परंपरागत ‘दालदा’ जाळ्याची शाश्वत मासेमारी मागे पडली. ट्रॉलरच्या साहाय्यानेदेखील पापलेट पकडले जातात, पण ट्रॉल जाळे मुख्यत्वे तळाशी राहणार्‍या कोलंबी, ढोमे, शिंगाडे, बळा, नळ व माकूळ अशा समुद्रतळाशी असणार्‍या माशांसाठी वापरतात. पर्ससीन या जाळ्यात पापलेट पकडले जात नाहीत. परंतु, पाण्याच्या पृष्ठभागावर असणार्‍या हलवा माशांची टक्केवारी पर्ससीन जाळ्यात जास्त असते. या व्यतिरिक्त खाडी आणि किनार्‍यावर लावण्यात येणार्‍या ‘बोक्षी’ जाळ्यातही पापलेट सापडते. पण त्याचे प्रमाण नगण्य असते.

 

पापलेटच्या मासेमारीचा हंगाम महाराष्ट्रात पावसाळा संपता संपता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरू होतो. तो नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत चालू राहतो. परंतु, गेली काही वर्षे हा हंगाम एखाद महिनाच टिकत आहे. कारण, ज्या प्रमाणात पापलेटच्या नव्या पिढीची मासेमारी क्षेत्रात भरती व्हावी लागते ती रोडावली आहे. शिवाय लहान कावली-भिले पकडल्यामुळे त्यांना अंडी घालण्याइतपत समुद्रांत नैसर्गिकरीत्या मोठे होऊ दिले जात नाही. त्यामुळे पापलेटची पुढच्या हंगामातील पिढीची संख्या कमी-कमी होत चालली आहे. एप्रिल-मे दरम्यान ‘डोल’ जाळ्यात छोटी भिले पकडली जातात. त्यांची संख्या आणि टक्केवारी पहिली तर ती धक्कादायक आहे. अंडी घालण्याच्या वयात न आलेल्या छोट्या पापलेटचे प्रमाण ‘कर्ली’ डोलीत 84 टक्के असून त्यांची दरवर्षीची सरासरी संख्या 77-90 लक्ष इतकी प्रचंड आहे. म्हणजे दरवर्षी मच्छीमार 70 ते 90 लाख अपरिपक्व छोटी कावली-भिले मारतात. यावरून असे दिसते की, ‘कर्ली -डोल’ जाळे पापलेटसाठी अतिशय नुकसानकारक आहे. ही छोटी पिल्ले वाढू न दिल्यामुळे ती अंडी देण्याइतपत मोठी होण्याच्या आधीच पकडली जातात. त्यामुळे अंडी घालणार्‍या पापलेटची संख्या रोडावते आणि त्याचा परिणाम पापलेटच्या पुढल्या पिढीवर होतो. अंडी घालणारी पुढची पिढीच नष्ट झाल्याने पापलेटचा नैसर्गिक साठा कमी कमी होत आहे. परिणामी, समुद्रातील मोठ्या पापलेटची संख्या कमी होते आहे.

 

आपल्या समुद्रातील पापलेटचा अंडी घालण्याचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात आणि ऑगस्ट ते सप्टेंबर असा दोन वेळा असतो. यातील पहिला हंगाम अतिशय महत्त्वाचा असतो. कारण, अंड्यातून बाहेर पडणार्‍या पिल्लांचे जगण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. उलट दुसरा हंगाम पावसाळ्याच्या शेवटी ऐन मासेमारीच्या काळात येत असल्यामुळे उपयुक्त ठरत नाही. पापलेट सुमारे 221 मिमी लांबीचा (335 ग्राम) झाला की प्रथमच वयात येतो व एक वर्षाचा झाला की, 25 हजार व दोन वर्षाचा होईपर्यंत एक लाखपर्यंत अंडी देतो. पिल्ले फेब्रुवारी ते मेमध्ये दिसू लागतात. याच काळात कच्छ ते मुंबईतील समुद्र-प्रवाहात फेरबदल होतात. जो प्रवाह दक्षिणोत्तर वाहत असतो, तो पश्चिम किनार्‍याने उलट फिरतो आणि पावसाळ्यात दक्षिणेकडे (दक्षिणोत्तर) जोराने वाहू लागतो. मधल्या फेब्रुवारी-एप्रिल काळात प्रवाह संथपणे वाहतो, या प्रवाह बदलाचा फायदा पापलेटची पिल्ले घेतात. त्यांचे प्रवाहांमुळे फेब्रुवारी-एप्रिल काळात भरकटणे थांबते आणि खाण्यासाठी भरपूर उसंत मिळते. कारण, याच कालावधीत जवळा, जे त्यांचे मुख्य अन्न आहे, ते समुद्रात भरपूर उपलब्ध असते. म्हणून त्यांची भरभर वाढ होते. तसेच अन्न भरपूर असल्यामुळे नैसर्गिक मृत्यू सर्वात कमी होतो. संख्यात्मक वाढ होते. पापलेटची पिल्ले खूप खादाड असतात आणि समुद्राच्या पृष्ठभागावर प्राणीप्लवक, जवळा व कोलिम इत्यादी खाद्य खाण्यास सतत वर येतात. अशा पृष्ठभागावर येण्यामुळे पिल्लांच्या झुंडी पाण्यात वरच्या थरात लावलेल्या ‘कर्ली -डोल’ जाळ्यात फेब्रुवारी ते एप्रिल या काळात सहज पकडल्या जाऊन बळी पडतात. त्यामुळे या हंगामात ‘कर्ली-डोल’ जाळे न वापरणे इष्ट !

 

वरीलसर्व माहिती पाहिल्यास असे दिसून येते की, पापलेटचे समुद्रांतील साठे धोक्याच्या पातळीपेक्षा कमी झाले आहेत. आक्रसलेला मासेमारीचा हंगाम, पापलेटचे कमी-कमी होत जाणारे आकारमान व सरासरी वजन असे दर्शवते की, पापलेटचा साठा दोन कारणांनी कमी झाला आहे. एक म्हणजे अतोनात अनिर्बंध मासेमारी व दुसरा किनारपट्टीवरील प्रदूषण. यातील प्रदूषणाच्या माहितीचे अद्याप निश्चित विश्लेषण झालेले नाही. अतोनात मासेमारीचे दोन तोटे होतात. एक, पापलेटची वाढच होऊ दिली नाही. म्हणजे मासा वाढण्याआधीच पकडला तर त्यांचे वजन व आकारमान कमी भरते. म्हणजेच, प्रत्येक पापलेटचे वजन वाढल्यामुळे एकत्रित उत्पादन घटले आहे. दुसरा परिणाम, त्यांच्या कमी झालेल्या संख्येमुळे दरवर्षी मासेमारी क्षेत्रात नवीन भरती होणार्‍या माशांची घट. ही घट इतक्या जलदगतीने होते की, पापलेटचे उत्पादन घातांकीय वेगाने कमी होत आहे. बहुसंख्य छोटी पापलेटची पिल्ले त्यांची वाढ होण्याआधी एप्रिल-मेमध्ये पकडल्यामुळे अंडी देण्याआधीच मारली जातात. त्यामुळे पुढील पिढी तयार होत नाही आणि दरवर्षी त्यांचे उत्पादन कमी होत गेले आहेवरील सर्व विश्लेषण शास्त्रीय संशोधनातून मिळवले असून त्यापासून मच्छीमारांनी काही धडा घ्यावा. आपण आज जे आहे ते टिकवले तरच उद्याच्या पिढ्यांना त्याचा उपभोग घेता येईल. आपण दर्याचे राजे आहोत. तेव्हा एखाद्या जाणत्या राजासारखी सार्‍या दर्याच्या दौलतीची आपणच निगा घ्यायला नको का?

(लेखक ज्येष्ठ सागरी संशोधक असून केंद्रीय मात्स्यिकी संशोधन संस्थेचे निवृत्त प्रधान वैज्ञानिक आहेत.)

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat