मन सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथिवीमोलाची

    दिनांक  26-Aug-2019 22:17:35   उज्ज्वला पवार यांची गोष्ट म्हणावी तर स्त्रीशक्तीची आहे, म्हणावी तर मानवाच्या आंतरिक शक्तीच्या कर्तृत्वाची. चारचौघींसारखे असलेल्या आयुष्यात उज्ज्वला यांनी असामान्यत्व निर्माण केले.


उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै:।

 

याचा अर्थ असा की, कोणतेही काम कष्टानेच सफल होते. नुसते मनोरथ करून काम सफल होत नाही. नुकतेच हे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे उद्धृत केले. हा कार्यक्रम दूरदर्शनवर पाहताना दादरच्या उज्ज्वला पवार यांचे मन भूतकाळात गेले. त्यांचे वडील सुप्रसिद्ध जादूगार द्वारकानाथ तायडे हे संस्कृत सुभाषित सारखे म्हणायचे. १९६० सालच्या चार वर्षाच्या उज्ज्वलालाही ते सुभाषित सांगायचे. मात्र, उज्ज्वला यांच्या आयुष्यात या सुभाषिताशिवाय पर्याय उरलाच नाही. सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्टच्या विश्वस्त आणि सचिव, तसेच संस्कृत भाषा संस्थेच्या उपाध्यक्षा, देववाणी मंदिरम् संस्थेच्या पदाधिकारी आहेत. तसेच सारस्वत बँकेच्या महिला तक्रार निवारण कक्षामध्ये स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी म्हणूनही त्या जबाबदारी सांभाळत आहेत. उज्ज्वला यांच्या आयुष्याचा पट उलगडताना मात्र वाटत राहते की, 'उद्यमेन हि सिध्यन्ति' या मंत्राचा जप करत उज्ज्वला जगत आहेत.

 

मूळ पिंपळगाव बसंवत नाशिकचे द्वारकानाथ तायडे आणि विजया तायडे हे कुटुंब कामानिमित्त द्वारकानाथ मुंबईतील दादर येथे आले. सुशिक्षित पण दारिद्—यामुळे शहाणपणाला मात खावी लागे. केवळ त्यासाठीच जात्याच हुशार आणि तल्लख बुद्धीचे असलेल्या द्वारकानाथ हे जादू शिकले. पण, जादूचे खेळ करून घरखर्च कधीही सुटला नाही. त्यामुळे मग ते छोटी-मोठी नोकरी करू लागले. पण, त्यामुळे घर-संसार कसा चालणार? उज्ज्वला त्यावेळी आठ वर्षांच्या असतील. आर्थिक तंगीमुळे घरखर्चाची समस्या होतीच, त्याशिवाय द्वारकानाथ यांना आणखीन सात भावंडांची जबाबदारीही होती. त्यांचाही खर्च होता. गावी मनीऑर्डर पाठवल्यानंतर चार-पाच दिवस पुरतील इतकेच पैसे उरत. त्याचवेळी तायडेंच्या घरी एक पाहुणाा फार लांबून प्रवास करून आला. त्याला पैसे हवे होते. द्वारकानाथ यांनी घरखर्चासाठी ठेवलेले पैसे काढून दिले. विजयाबाईंना वाईट वाटले. आता पाच दिवस कसे जातील? छोटी उज्ज्वलाही हे पाहत होती. मात्र, द्वारकानाथ म्हणाले, "तो इतक्या लांबून प्रवास करून आला होता. मदतीसाठी पुन्हा त्याला प्रवास करायला लावू? त्याला गरज होती. आपले निभेल कसेही." यावर विजयाबाई शांत राहिल्या. पण, या प्रसंगामुळे गरजूंच्या मदतीला नेहमी उभे राहायलाच हवे, हा संस्कार उज्ज्वला यांच्या मनावर कोरला गेला.

 

१९७०चे ते दशक होते. वडिलांचे परिचित डॉ. शिवराम आठवले यांनी एक स्वयंसेवी संस्था काढली. द्वारकानाथ यांनी ऐपतीप्रमाणे योगदान दिले. पण, महाविद्यालयात जाणाऱ्या उज्ज्वलाने विचारले, "या ट्रस्टचे कार्य काय?" डॉ. आठवले म्हणाले, "झोपडपट्टीतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मदत करणार." यावर उज्ज्वला म्हणाल्या, "मुलांचे पायाभूत शिक्षणच पक्के नाही, तर शिष्यवृत्तीची परीक्षा कसे देतील?" यावर डॉ. आठवले म्हणाले, "असले कोरडे सल्ले खूप जण देतात. यासाठी काही काम करणार का नाही? मुलांचे पायाभूत शिक्षण कच्चे असले तर तू शिकव त्यांना." उज्ज्वला यांच्या वडिलांनीही "हो, उज्ज्वला, तू या मुलांना शिकवायला हवेस," असे म्हटले. त्या दिवसापासून उज्ज्वला दादरच्या सेवा वस्तीतील मुलांना शिकवू लागल्यापुढे उज्ज्वला यांचा विवाह अनिल पवार यांच्याशी झाला. ते उद्योगपती. तसे चांगलेच चालले होते. पण, नियतीला 'उद्यमेन हि सिध्यन्ति' हा विचार सिद्ध करायचा होता. त्यामुळेच की काय, अनिल यांच्या व्यवसायातील भागीदाराने विश्वासघात केला. अनिल यांच्या नकळत कंपनीतले उत्पादन विकले. उद्योग उभा करताना बँकेचे कर्ज काढले होते. बँकेचे हप्ते भरणे जमले नाही म्हणूनबँकेने कंपनीच्या गाळ्याला सिल ठोकले. गाळ्यामध्ये कंपनीची अवाढव्य किंमतीची यंत्रणा अक्षरश: गंजून गेली आणि निकामी झाली. होत्याचे नव्हते झाले. विनाकारण कुचेष्टा आणि अपमान सहन करावा लागला. उज्ज्वला यांनी ठरवले ही परिस्थिती बदलायलाच हवी. त्यांनी घरात खाजगी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत शिकवणी घ्यायच्या. मधल्या वेळात सेवावस्तीतील मुलांनाही त्या शिकवायच्या. अनिल छोटी-मोठी कामे करू लागले. या कालावधीत उज्ज्वला यांनी एक दिवसही विश्रांती घेतली नाही. याच काळात उज्ज्वला यांचा संपर्क झोपडपट्टीतील गरीब पालकांशी आला. त्यांचे जगणे त्यांनी जवळून पाहिले. दुसरीकडे त्यांनी समाजातील सकारात्मक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. या मुलाखतींवरच 'स्फुर्तीचे धबधबे' हे पुस्तक प्रकाशित झाले. कितीतरी वर्षांनी पूर्ण कर्ज फिटले आणि २० वर्षांत अनिल यांनी पुण्याला नवा उद्योग सुरू केला. पुन्हा एकदा 'अच्छे दिन' आले होते. उज्ज्वला यांनी मग वयाच्या ५९व्या वर्षी कला शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांना संस्कृतमध्ये तीन सुवर्णपदके मिळाली. वयाच्या या टप्प्यात त्यांचे हे यश महत्त्वपूर्ण आहे.

 

सगळे आलबेल सुरू होते. पण, अचानक मोजून पाच वर्षांत उज्ज्वला यांचे आई-वडील, सासू-सासरे आणि पती यांचे निधन झाले. पाच वर्षांत जवळचे सात नातेवाईक वारले. उज्ज्वला यांना हा धक्का सहन करणे जड गेले. प्रचंड निराशेत त्या गेल्या. यातून बाहेर कसे पडणार? मार्ग सुचत नव्हता. पण, याचवेळी त्यांच्या वडिलांनी लहानपणी शिकवलेले सुभाषित त्यांच्या मनात रूंजी घालत असे... 'उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै:' मग उज्ज्वला यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. वंचित, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून द्याचे हेच त्यांनी ध्येय ठेवले. लोकसंपर्क आणि नि:स्वार्थी भाव यामुळे त्यांच्या कार्यात लोक सहभागी होतात. 'सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट'च्या माध्यमातून दरवर्षी आठ-दहा लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. यामध्ये उज्ज्वला यांचे योगदान महत्त्वाचे आहे. उज्ज्वला हे कार्य कसे करू शकतात, हे विचारल्यावर उज्ज्वला म्हणतात, "मन सुद्घ तुझं गोष्ट आहे पृथिवीमोलाची." शुद्ध भाव शुद्ध कार्याला पूर्णत्त्वास नेतो. दुसरे काय?